गेल्या महिन्यात 12 जूनला झालेल्या अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेच्या चौकशीचा प्रथमदर्शी अहवाल उड्डाणावेळी इंधनपुरवठ्याचे स्वीचेस बंद झाल्यानेच दोन्ही इंजिने बंद पडल्याचे कारण सूचित करतो आहे. जरी अहवालात स्पष्टपणे म्हटलेले नसले, तरी एका वैमानिकानेच हे स्वीच बंद केले असेच ह्यातून सूचित करण्याचा प्रयत्न स्पष्ट दिसतो. कोणत्याही सबळ पुराव्याविना आणि केवळ कॉकपिटमधील दोन्ही वैमानिकांतील संभाषणाच्या जोरावर एका वैमानिकानेच हे स्वीच उड्डाणावेळी बंद केले होते असे अप्रत्यक्षपणे का होईना सूचित करणे हा निव्वळ वाह्यातपणा आहे. विमान वाहतूक कंपनीला आणि विमान निर्मात्या कंपनीला क्लीन चीट देण्यासाठीच वैमानिकांच्या माथी तर ह्या दुर्घटनेचे खापर फोडले जाणार नाही ना असा प्रश्न त्यामुळे निर्माण झाला आहे. सदर अहमदाबाद – गॅटविक लंडन विमानाचे दोन्ही वैमानिक अत्यंत अनुभवी होते. उड्डाणावेळी सहवैमानिकाची भूमिका बजावणारे सुमित सबरवाल हे 56 वर्षीय वैमानिक तब्बल साडे पंधरा हजार तास विमान चालवण्याचा अनुभव गाठीशी असलेले अत्यंत अनुभवी वैमानिक होते. त्यापैकी साडेआठ हजार तास तर त्यांना ड्रीमलायनर विमान चालवण्याचा अनुभव होता. उड्डाणावेळी प्रत्यक्ष विमान चालवणारे 32 वर्षीय वैमानिक क्लाईव्ह कुंदेर ह्यांना देखील साडेतीन हजार तास विमानोड्डाणांचा अनुभव होता आणि त्यापैकी अकराशे तास त्यांनी हेच ड्रीमलायनर विमान चालवलेले होते. अनुभवी वैमानिकाच्या देखरेखीखाली सहवैमानिकाने विमानाची सूत्रे हाती घेणे हेदेखील प्रथेनुसारच होते. दोघेही वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्त होते, दोघांचीही मद्यसेवनासंबंधीची ब्रिदॲनलायझर चाचणी विमानात बसण्यापूर्वी झालेली होती. शिवाय भर दुपारचे उड्डाण होते. सगळे काही नियमाबरहुकूम चालले होते. असे असताना उड्डाण होत असतानाच दोन्ही इंजिने क्षणार्धात बंद पडली, परंतु ती पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न वैमानिकांनी केला, ज्यात पहिले इंजिन सुरू झाले, परंतु विमानाला ते उंची देऊ शकले नाही आणि बघता बघता विमान कोसळले असे हा अहवाल सांगतो. हे इंजिन बंद करण्याचे कारण त्याला इंधन पुरवठा करणारा स्वीच बंद झाला आणि एका सेकंदाच्या अंतराने दुसरा स्वीचही बंद झाला असे अहवालात दिले गेले आहे. ह्या सिद्धान्ताच्या पुष्ट्यर्थ दोन्ही वैमानिकांदरम्यानचे कॉकपिटमधील संभाषण पुढे केले गेले आहे, ज्यात एक वैमानिक दुसऱ्याला विचारतो की तू स्वीच बंद केलास का, तर त्यावर दुसरा उत्तरतो की मी केला नाही. मग हा स्वीच कसा बंद पडला हा ह्या सगळ्यातील कळीचा मुद्दा ठरतो. तीन कारणांमुळे हा इंजिनाला इंधनपुरवठा करणारा स्वीच बंद पडू शकतो. 1. वैमानिकाच्या चुकीमुळे. 2. वैमानिकाकडून जाणूनबुजून. 3. तांत्रिक किंवा सॉफ्टवेअरमधील दोषामुळे. वैमानिकाचा धक्का लागून वगैरे हे स्वीच बंद होऊ शकत नाहीत, कारण ते बंद करण्यासाठी आधी वर खेचावे लागतात आणि नंतरच खाली ढकलता येतात. उड्डाणावेळी इंधनपुरवठ्याचे महत्त्व माहीत असताना वैमानिक जाणूनबुजून हे स्वीच बंद करण्याची तर शक्यताच नाही. केवळ काही घातपाताचा उद्देश असेल तरच असे आत्मघाती कृत्य एखादा वैमानिक करील. प्रस्तुत घटनेत दोन्ही वैमानिक मानसिकदृष्ट्या सुस्थिर होते. शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त होते, त्यांनी नशापाणी केलेले नव्हते. मग अशा स्थितीत ते हा स्वीच बंद करतीलच का? ह्या स्वीचमध्ये आपोआप बंद पडण्याचा दोष संभवतो असे 2018 मधील मार्गदर्शक सूचनांमध्ये सूचित केले गेलेले होते. परंतु हे अपवादात्मक आहे. जगभरात शेकडो ड्रीमलायनर आकाशात संचार करीत असतात. कोणत्याही विमानात हा दोष आढळलेला नाही. दुर्घटनाग्रस्त झालेल्या विमानानेही काही तासांपूर्वीच दीर्घ प्रवास केलेला होता. विमानोड्डाणावेळीही ह्या स्वीचेसमध्ये दोष असल्याचे वैमानिकांच्या निदर्शनास आले नव्हते. असे असताना एकाएकी हा स्वीच बंद कसा पडला हे कोडे आहे. सध्या बाहेर आलेला अहवाल हा प्रथमदर्शी अहवाल आहे. सविस्तर तपासाची शक्यता तो व्यक्त करतो आहे आणि त्यासाठीची दिशाही सूचित करतो आहे. परंतु ह्या दुर्घटनेमागील सत्य बाहेर यायला हवे असेल तर दुर्घटनेच्या इतर सर्व शक्यतांचाही विचार व्हायला हवा. प्रस्तुत अहवाल वैमानिकाचा दोष सिद्ध करण्याच्या दिशेने तपासाची दिशा वळवतो आहे असा आक्षेप वैमानिक संघटनेने घेतला आहे आणि तो योग्यच आहे. ह्या अहवालात सांगितले गेलेले कारण वॉशिंग्टन पोस्टने दोन दिवसांपूर्वीच प्रसिद्ध केलेल्या वृत्तात नमूद केले आहे हे कसे काय? अहवाल आधीच फुटला कसा? दोन्हीही वैमानिक आज हयात नाहीत. ते हयात नाहीत म्हणून त्यांच्या पश्चात त्यांच्या माथी खापर फोडून मोकळे होता येणार नाही. ह्या दुर्घटनेची सर्वंकष चौकशी व्हावी आणि खरे कारण सबळ पुराव्यांनिशी जनतेसमोर मांडले जावे. त्यात लपवाछपवी करू नये!