गोवा शिपयार्डला ‘हॉवरक्रॉफ्ट’ निर्मितीचा मान

0
88
गोवा शिपयार्डची पाहणी करताना केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर. सोबत दक्षिण गोवा खासदार नरेंद्र सावईकर. (छाया: प्रदीप नाईक)

शिपयार्डला ङ्गअच्छे दिनफ; आर्थिक संकट दूर करणार
गोवा शिपयार्डकडे यापुढे जहाजबांधणीबरोबरच ‘हॉवरक्रॉफ्ट’ निर्मितीचीही जबाबदारी सोपवणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केले. ते काल गोवा शिपयार्डने आयोजित केलेल्या सत्कार समारंभात बोलत होते.आर्थिक संकटात सापडलेल्या गोवा शिपयार्डला गतवैभव मिळवून देण्याबरोबरच नवनवीन प्रकल्पांचे काम सोपवले जाईल. गोवा शिपयार्डकडे कुशल मनुष्यबळ, तांत्रिक या अनुकूल बाबी असतानाही गेल्या काही वर्षात जहाजबांधणीचे एकही कंत्राट मिळाले नाही, ही दुख:द बाब असल्यााचे प्रतिपादन पर्रीकरांनी केले. यामुळे गोवा शिपयार्डचे आर्थिक उत्पन्न एक हजार २६ कोटी रुपयांवरून ५०६ कोटी रुपयांवर घसरले. यापुढे गोवा शिपयार्डला ‘मेक इन इंडिया’ योजनेअंतर्गत नवनवीन प्रकल्प उपलब्ध करून देणार असल्याचे श्री. पर्रीकर म्हणाले. आगामी एक वर्षाच्या काळात गोवा शिपयार्डला दोन हजार कोटी रुपयांपर्यंतची कामे देणार असल्याचे त्यांनी सांगितले. गोवा शिपयार्डने आपला विस्तार प्रकल्प लवकर पूर्ण करावा, जेणेकरून त्यांच्या सर्व अडचणी दूर होतील असा सल्लाही त्यांनी दिला. संरक्षण खात्याकडून कंत्राटे देताना पूर्ण पारदर्शक प्रक्रिया राबविली जाईल, जेणेकरून योग्य ती कामे वेळेत पूर्ण होतील. केंद्रीय संरक्षणमंत्री म्हणून संरक्षण खात्याच्या एखाद्या विभागाला श्री. पर्रीकर यांची ही पहिलीच भेट होती.
गोव्याच्या विकासासाठी संरक्षण खात्याकडून सर्वतोपरी मदत करण्याची तयारी असल्याचे प्रतिपादन श्री. पर्रीकर यांनी यावेळी केले. गोवा शिपयार्डचे चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर रिअर ऍडमीरल शेखर मित्तल यांनी संरक्षणमंत्र्यांनी गोवा शिपयार्डला भेट देऊन समस्या जाणून घेतल्याबद्दल आभार व्यक्त केले. कार्यक्रमाला मिलिंद नाईक, एलिना साल्ढाणा, कार्लोस आल्मेदा यांची उपस्थिती होती.
हॉवरक्राफ्ट
हॉवरक्राफ्ट हे लढाऊ विमान आणीबाणीच्या प्रसंगी वापरण्यात येते. जमीन, पाणी व बर्फावर हे विमान उतरू शकते. पाण्यात २०० मीटर खोल तर आकाशात ६०० मीटर उंच उडण्याची याची क्षमता आहे. अशा प्रकारच्या हॉवरक्राफ्टची निर्मिती आता गोवा शिपयार्डमध्येही करण्यात येणार आहे.