– दिलीप देशपांडे
गोव्यात प्रथमच भारतीय जनता पक्षाला निर्विवाद बहुमत मिळाले आहे. यामध्ये महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचा निश्चितच हातभार आहे. २००७ आणि आताच्या निवडणूक निकालांचा तुलनात्मक अभ्यास केल्यास ही गोष्ट स्पष्ट होते. गेल्या खेपेला भाजपा उमेदवारांचा पराभव हा मगोला पडलेल्या मतांमुळे झाला होता. या खेपेला या दोन्ही पक्षांत युती झाल्याने एकीचे बळ वाढले आणि त्याचा फायदा दोन्ही पक्षांना झाला.
अशीच मतविभागणी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यात होण्याची शक्यता आहे हे जाणूनच या दोन्ही पक्षांनी आघाडी केली; परंतु त्याचा लाभ या पक्षांना मिळाला नाही हे स्पष्ट आहे.
युतीला फायदा आणि आघाडीला नुकसान, असे का? याला अनेक कारणे आहेत. भाजपा- मगो युती व्हावी असे सामान्य नागरिकांचे मत होते. ते दोन्ही पक्षांच्या पुढार्यांना कळले. त्यांनी ते अमलात आणले अन् त्याचाच फायदा झाला. उलट कॉंग्रेस-राष्ट्रवादी यांची आघाडी असूनदेखील सामान्य जनतेला ती पटली नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसने उमेदवारी वाटपात जे ‘अर्थकारण’ केले ते लोकांना रुचले नाही. या पक्षातील प्रामाणिक आणि स्वच्छ उमेदवारांना उमेदवारी देण्याचे डावलून उद्योगपतीने आपल्या मर्जीप्रमाणे तिकिटे वाटली आणि त्याचा परिणाम म्हणून या पक्षाला अपयश आले.
कॉंग्रेसच्या पराभवाच्या कारणांत फॅमिली राज, महागाई, भ्रष्टाचार, प्रादेशिक आराखडा यांचा उल्लेख करावा लागेल. याशिवाय कुशासन, अकार्यक्षमता हे मुद्दे आहेतच. कॉंग्रेसने जी मस्ती आणि मग्रुरी उमेदवारी वाटप करताना दाखवली आणि दिल्लीपासून गल्लीपर्यंतच्या कॉंग्रेसी पुढार्यांनी जे त्याचे समर्थन केले, त्याचा फार मोठा परिणाम या पक्षाला भोगावा लागला. विजय मिळवणारे उमेदवार म्हणून ज्यांना उभे केले त्यांच्याचमुळे कॉंग्रेसला घोर पराभव पाहावा लागला.
कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांनी गोमंतकीय जनतेला गृहीत धरून जे राजकारण केले, त्यापेक्षा अधिक राजकारण डॉक्टर विली डिसौझा यांनी तृणमूल कॉंग्रेसला गोव्यात आणून केले. कोणतेही राजकीय वा सामाजिक काम नसताना या पक्षाद्वारे विलींनी स्वार्थाचे राजकारण केले. गोमंतकीय जनतेने अशा पक्षाला अजिबात थारा दिला नाही, ही चांगलीच बाब म्हणावी लागेल.
गोव्यात कॉंग्रेस आमदारांचा आकडा दहाच्या घरातसुद्धा पोचला नाही. यावरून जनता या पक्षाला आणि त्याच्या स्वार्थी, मतलबी, भ्रष्ट राजकारणाला किती कंटाळलेली होती, हेच स्पष्ट होते. कॉंग्रेसने उमेदवारी वाटप करताना घोडचूक नव्हे तर ऐतिहासिक चूक केलीय. ही चूक सुधारण्याची संधी या पक्षाला लवकर मिळेल याची शक्यता नाही.
कॉंग्रेसमधले विश्वजित राणे यांचे राजकारणदेखील त्यांच्या अंगलट आलेले दिसते. त्यांनी सुचवलेले उमेदवार पडले. किंबहुना त्यांनी ज्यांचा प्रचार केला ते सगळेच पडले. स्वतः तेसुद्धा खूपच कमी मताधिक्क्याने विजयी झाले. याचा त्यांनी गंभीरपणे विचार करायला हवा. गोमंतकीय जनता स्वार्थी राजकारणापेक्षा उदारमतवादी आहे, हे कॉंग्रेसी नेत्यांनी लक्षात ठेवले पाहिजे.
‘फॅमिली राज’चा जवळजवळ पाडाव या निवडणुकीत झाला तरी काही कुटुंबे विजयी झाली. तरीसुद्धा सत्तरी-वाळपईतील जनता अजून साम्राज्यशाहीचे ओझे वाहते आहे असे म्हणावे लागेल. ज्येष्ठ राण्यांचे कर्तृत्व आहे म्हणूनच पुत्राचा विजय झाला. त्यांना जनता जवळ करते ही त्यांची पुण्याई आहे. पण ही पुण्याई सदासर्वकाळ मिळणार नाही हे लक्षात ठेवले पाहिजे. बाबूश पती-पत्नीचा विजय हा अपवाद म्हणावा लागेल. भाजपाच्या लाटेत सांताक्रुझ- ताळगाव मतदारसंघात कमळ फुलले असते तर गोव्याचे राजकारण खर्या अर्थाने स्वच्छ झाले असते. तसली ही ‘स्वच्छता’ लवकरच पंत घडवून आणतील अशी अपेक्षा बाळगण्यास हरकत नाही.
भारतीय जनता पक्ष आणि मगो युतीने उमेदवारी देताना ख्रिश्चन उमेदवारांना सामावून घेतले, त्याचा यथायोग्य परिणाम दिसून आला आहे. भाजपाची ‘जातीयवादी’ पक्ष अशी हेटाळणी काहीजण करतात ती या निवडणुकीत धुवून निघाली आहे. हाच प्रयोग राष्ट्रीय पातळीवर केला तर पर्रीकरांनी गोव्यात घडविलेला चमत्कार देशात पाहायला मिळेल.
मनोहर पर्रीकर आणि भाजपा हे एकच आहेत. त्यामुळे भाजपाचा विजय हा त्यांचा विजय आहे. भारतीय जनता पक्षाने नवीन चेहरे दिले, त्यामुळे विजयात भर पडली आहे.
अपक्ष उमेदवार ही एक समस्या आहे. जे अपक्ष निवडणुकीत उभे होते, ते त्यांना हव्या त्या पक्षाने उमेदवारी दिली नाही म्हणून. काही अपक्षांना भाजपाचा पाठिंबा होता. अर्थात युतीला बहुमत मिळाल्यामुळे अपक्षांचा त्रास सत्ताधारी पक्षाला होणार नाही. गोवा विकास पार्टीचे दोन उमेदवार निवडून आले. त्यांनीही युतीला पाठिंबा दिला तर ती चांगलीच बाब ठरेल.
पंतांनी सूडाचे राजकारण करणार नाही असे सांगितले आहे. ही चांगलीच भूमिका आहे. परंतु २००४ च्या पराभवानंतर कॉंग्रेसने पर्रीकर आणि त्यांच्या पाठिराख्यांना कसे नागवले, हे विसरू नये. राजकारणात कोणी कायमचा शत्रू नसतो आणि मित्रही नसतो. परंतु जे इतिहास विसरतात त्यांना भविष्यकाळ नसतो हे लक्षात ठेवून वागले पाहिजे.