– प्रमोद आचार्य
२००७ सालच्या जून महिन्यातील एक दुपार. गोवा विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झालेले. कॉंग्रेस-राष्ट्रवादीची युती पुन्हा सत्तारूढ होणार हे स्पष्ट झालेले. दोन दिवसांआधीपर्यंत भाजपाच सत्तेवर येणार असे वाटत असताना कॉंग्रेस-राष्ट्रवादीने मुसंडी मारलेली. निकाल धक्कादायक होते आणि अचंबित करणारे. प्रादेशिक आराखड्याच्या आंदोलनाचे घोंगडे घेऊन सत्ताधारी पक्ष निवडणुकीला सामोरा गेलेला. प्रचंड जनक्षोभ होता. पण त्याचे रूपांतर मतांत वा सत्तांतरामध्ये झाले नाही.
निकाल आले आणि सकाळपासून ओसाड पडलेल्या कॉंग्रेस हाउसमध्ये रेलचेल सुरू झाली. विजयाची अपेक्षा बाळगून सकाळपासून गर्दी केलेले भाजपा मुख्यालय मात्र ओस पडू लागले.
मी भाजपा मुख्यालयात गेलो. संपूर्ण कार्यालयात भयाण शांतता पसरलेली.
‘‘मनोहर पर्रीकर आहेत का?’’- मी विचारले.
‘‘आतमध्ये आहेत,’’ रिसेप्शनिस्टने सांगितले.
आतल्या खोलीत ते एकटेच बसलेले. मला बघून जरासे हसले. ‘‘ये ना. बस. काय म्हणतोस?’’
‘‘म्हटलं जास्त निराश होऊ नका. हे राजकारण आहे. भविष्यात काय दडलंय कुणास ठाऊक.’’- मी.
‘‘नाही. निराश वगैरे होत नाही. पण मनाला लागतं. एक गोष्ट मी नेहमीच ध्यानात ठेवतो. झशेश्रिश ुळश्रश्र लश र्ीपसीरींशर्षीश्र; ीींळश्रश्र र्श्रेींश ींहशा. ही गोष्ट ध्यानात ठेवून मी राजकारण करतो.’’- पर्रीकर.
२०१२ च्या मार्च महिन्यातील एक सकाळ. मी पर्रीकरना भेटलो. हॉटेल मांडवीतील एका रुममध्ये ते एकटेच बसलेले. गोव्याच्या जनतेने कौल दिलेला. गोव्याच्या इतिहासातील सर्व रेकॉड्र्स मोडणारे मतदान झालेले. निकालही आलेले. भाजपा-मगो युतीला पूर्ण बहुमत मिळालेले. एकट्या भाजपाला साधं बहुमत प्राप्त झालेलं. पर्रीकरांचा मोबाईल अभिनंदनपर संदेश घेऊन सतत खणाणत होता.
‘‘मी मोबाईल बंद करतो, नाहीतर तुझ्याशी बोलायलासुद्धा मला भेटणार नाही.’’- पर्रीकर.
‘‘असू द्या. लोकं उत्साहानं फोन करतात. तुम्ही फोन बंद केला तर ती हिरमुसतील.’’- मी.
‘‘तुला माझ्याशी बोलायचंय की नाही? मग पाच मिनिटं तरी फोन बंद करतो.’’- टिपीकल पर्रीकर.
आमच्या गप्पा सुरू झाल्या. मी त्यांना २००७ सालच्या भाजपा मुख्यालयातील त्या प्रसंगाची आठवण करून दिली. म्हणाले, ‘‘ते वाक्य मी कधीच विसरू शकणार नाही. मी लोकांवर प्रेम करत राहिलो आणि आज त्यांनी दुप्पटीने परतफेड केली. छेु ख ुळश्रश्र रिू ींहशा लरलज्ञ ळप र्ाीश्रींळश्रिशी.’’
हे असं का घडलं? २००७ ते २०१२ या कालावधीत कोणती स्थित्यंतरे घडली की ज्यामुळे गोव्याच्या राजकारणाने संपूर्ण वेगळी दिशा धरली?
निवडणुकीच्या दोन आठवडे आधी मी ‘नवप्रभा’मध्येच फॅमिली राजवर लेख लिहिलेला. त्यात काही प्रश्न उपस्थित केलेले. सगळ्यांत महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे, आलेमांव, राणे, मोन्सेरात, मडकईकर, ढवळीकर, नाईक यांच्या घराणेशाहीला पराभूत करण्याची धमक आपल्यात आहे का?
मला वाटते आज या प्रश्नाचे उत्तर आपल्या सगळ्यांना मिळालेले आहे. चारही आलेमांव पराभूत झालेत. मडकईकर, नाईकांची घराणेशाही भुईसपाट झालेली आहे. मोन्सेरात, राणेंच्या घराणेशाहीला जनतेने विरोधी बाकांवर ढकलून दिलेय. ढवळीकरांचे म्हणाल तर भाजपाला स्पष्ट बहुमत देऊन फक्त ढवळीकरबंधूंची अरेरावी सरकारात खपवून घेतली जाणार नाही याची दक्षता जनतेने घेतलीय.
थोडक्यात सांगायचे झाले तर गोव्याचे राजकारण आज कुठल्याही एका फॅमिलीच्या दावणीला बांधलेले नाहीय.
विक्रमी मतदान झाल्यावर प्रुडंटने सर्व राजकारण्यांची मते जाणून घेण्याचा एक लाइव्ह प्रयत्न केलेला. त्यावेळी चर्चिलनी सांगितलेले- ‘माझा पराभव होईल असा विचार स्वप्नातसुद्धा करू नका.’ त्यांच्या आवाजात जरब होती. कुठल्याही परिस्थितीत आपला पराभव होऊच शकत नाही हा मद होता.
नंतर ती जरब दर्पोक्ती ठरली आणि तो मद आंधळा आत्मविश्वास.
गोव्याच्या जनतेने ठरवून मतदान केले. चर्चिल, ज्योकीम, वालंका आणि युरी या चारही आलेमांवना पाडलं. रवी व रितेश नाईकचा पराभव केला. धाकू मडकईकरना परतीची वाट धरायला लावली आणि जेनिफरची आघाडी फक्त १ हजार मतांवर आणून ठेवली.
स्वत:ला हॅविवेट म्हणवणारे बहुतेक लोकशाहीला शरण आले. तुम्ही लोकशाहीचा बाजार मांडून आमची मते सर्रास विकत घेऊ शकता या भ्रमात राहू नका ही गोष्ट प्रत्येक गोमंतकीयाने ठणकावून सांगितली. श्रीमंत राजकारण्यांनी म्हणे आपापल्या मतदारसंघात १०-१० कोटी रुपयेसुद्धा खर्च केले. पण पैशांचा हा महासागर त्यांच्या राजकीय कारकिर्दीची नौका तारू शकला नाही.
गेल्या कित्येक निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यावर राजकीय विश्लेषक आणि बुद्धिवादी जनसामान्यांना दोष द्यायचे. भ्रष्ट राजकारण्यांकडून पैसे कोण घेतो, कोण त्यांना निवडून आणतो, त्यांच्या भ्रष्टाचाराबद्दल बोलायचा तरी आपल्याला अधिकार आहे का? असे समर्पक प्रश्न या राज्यातील मतदाराला विचारले जायचे.
एवढे दिवस या मतदाराने मुकाटपणे हे प्रश्न सहन केले. शिशुपालाचे शंभर अपराध भरेपर्यंत वाट बघितली आणि संधी मिळताच पहिला दणका दिला. संपूर्ण राजकारण ढवळून टाकले. संस्थाने खालसा केली. प्रस्थापित निकष जमीनदोस्त करून टाकले.
फॅमिली राजच्या संदर्भांत दरवेळी प्रश्न विचारल्यावर कॉंग्रेसचे वरिष्ठ पुढारी एकच गोष्ट सांगायचे. आम्ही विनेबिलिटी बघून तिकिटं दिलीत. लोकांना हवेत असेच उमेदवार दिलेत. आता सगळं लोकांवर आहे. त्यांना स्वीकारणं- नाकारणं लोकं ठरवतील.
गेल्यावेळीही मी लिहिले होते. आपल्या मतांचा पॅटर्न बघून राजकारण्यांनी विनेबिलिटीचे निकष तयार केलेत. जोपर्यंत आपण मतदानाचा पॅटर्न बदलत नाही तोपर्यंत हे निकष बदलणार नाहीत. भ्रष्टाचार्यांना मोकाट सोडणारी विनेबिलिटीची घातक संकल्पना जर कोणी उद्ध्वस्त करू शकत असेल तर आम्ही, आणि आम्ही तेच केले.
या विक्रमी मतदानातून आणि ऐतिहासिक निकालातून आणखी एक गोष्ट स्पष्ट झाली.
दरवेळेला हे रथी-महारथी आपल्या व्होट बँकेच्या आधारावर जिंकून आल्यावर आपण त्यांच्या विजयाचं खापर त्या गरीब बिचार्या व्होट बँकेवर फोडायचो. पण आपल्यातलेच कित्येक सुशिक्षित मतदान करायचे टाळतात आणि म्हणून या व्होट बँकांचे फावते हे आपण आरामात विसरायचो. बुद्धिवादी टीका करायचे. पण सुशिक्षित मतदाराला घराबाहेर कसे काढायचे याचे उत्तर कुणाकडेच नव्हते.
८२ टक्के मतदानामुळे ना व्होट बँकेचे राजकारण चालले, ना धर्माचे, ना जातीचे, ना पंथाचे. सुजाण मतदार घराबाहेर पडला आणि कित्येक भ्रष्ट राजकारणी हद्दपार झाले.
पण आता खरे आव्हान आहे ते भाजपापुढे. २००५ सालात तत्कालीन राज्यपाल एस. सी. जमीर यांनी पर्रीकरांचे सरकार वादग्रस्तरीत्या बरखास्त केलेले. त्यानंतर आपल्याला एकदा तरी सुस्पष्ट बहुमत द्यावे आणि मुख्यमंत्री बनायची एक संधी द्यावी असे पर्रीकरांना सतत वाटायचे. आपण सत्तेवर येऊन काय करू शकतो हे दाखवण्यासाठी आपल्याला एक टर्म द्या, ही त्यांची कळकळीची विनंती होती.
जनतेने आता निर्णायक कौल दिलाय. आता जबाबदारी आहे ती नव्या सरकारपक्षाची. कित्येक अल्पसंख्याकांना तिकिटे देऊन कुठल्याही धर्माविरुद्ध आपल्याला कसलाच रोष नाही हे सिद्ध करायचा भाजपाने प्रभावी प्रयत्न केला. त्यांना त्याची फळेही मिळाली. मात्र प्रश्न एवढ्यावर संपत नाही. कुठल्याही समाजाला भविष्यात कोणत्याही क्षणी आपल्या कारकिर्दीत असुरक्षित वा वाकडे वाटणार नाही याची दक्षता पर्रीकरांना सतत घ्यावी लागेल. यावेळेला त्यांच्याबरोबर संपूर्ण गोमंतकीय समाज राहिलाय. जनतेचा हा विश्वास त्यांना अधिक पक्का करावा लागेल. यासाठी संघपरिवारातील काही दुष्ट प्रवृत्तींना चार हात दूर ठेवावे लागेल. कदाचित संघातील काहींना हे रुचणार नाही, पचणार नाही. पण सरकार प्रभावीपणे चालवायचे असेल आणि जनतेचा विश्वास असाच ठेवायचा असेल तर हे करावेच लागेल.
गेल्या वेळी ज्या चुका झाल्या होत्या त्या परत होणार नाहीत याची शाश्वती पर्रीकरांनी प्रचार चालू असतानाच दिली होती. आता हे सरकार पुन्हा अहंकारी आणि उर्मट बनणार नाही याचीही प्राणपणाने काळजी घ्यावी लागेल.
प्रशासनाच्या बाबतीत कुणीच पर्रीकरांचा हात धरू शकत नाही. विस्कटलेली घडी पुन्हा बसवणे आणि ती घडी बसवण्यापूर्वी राज्याचा अर्थसंकल्प मांडणे हे पर्रीकरांपुढील सर्वांत मोठे आव्हान असेल. हे आव्हान ते कसे पेलतात ते बघावे लागेल.
कॉंग्रेसच्या बाबतीत सांगायचे झाले तर पक्षात पराकोटीचे बदल होणे आवश्यक आहे. यावेळेला तिकिटे देताना पक्षाने स्वत:ला राणे, मोन्सेरात, आलेमांवांच्या पायावर घालून घेतले. निष्ठावंतांना डावलले आणि काही तगड्या उमेदवारांना टुकार अशा दबावाखाली येऊन तिकीट नाकारले. परिणाम काय झाला? नरेश सावळ, विजय सरदेसाईंसारखे उमेदवार स्वबळावर जिंकून आले. जनतेने कॉंग्रेसला नाकारले नाही, झिडकारले.
कॉंग्रेसमधील लॉबीच्या राजकारणाचा पायाही जनतेने डळमळीत करून टाकला. प्रतापसिंग राणे आणि विश्वजित सोडून त्यांच्या लॉबीमधला एकही उमेदवार जिंकून आला नाही. सांताक्रुझ आणि ताळगाव मतदारसंघात जनतेने मोन्सेरातना पळता भुई थोडी करून टाकली. चारही आलेमांव आपण का पडलो याचा अजून विचार करत आहेत.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा लाजिरवाण्या पराभवानंतरही कॉंग्रेसमध्ये विरोधी पक्ष पुढारी आणि प्रदेशाध्यक्षाच्या पदासाठी लॉबिंग सुरू झालेय. अशावेळी रेड्डी, ब्रार प्रभृतींना सुटकेसचे राजकारण बाजूला ठेवून गांभीर्याने पक्षाचा विचार करावा लागेल. पक्षसंघटनेमध्ये काही आमूलाग्र बदल करावे लागतील. लॉबीच्या राजकारणाला झुगारावे लागेल आणि तथाकथित पुढार्यांच्या दबावतंत्राला पुरून पक्षाच्या जडण-घडणीच्या दृष्टिकोनातून काही ठोस पावले उचलावी लागतील.
सरकारपक्षाला जेव्हा एवढे प्रचंड बहुमत असते तेव्हा सत्ताधार्यांची गुर्मी प्रमाणापेक्षा वाढू शकते. अशावेळी प्रभावी विरोधी पक्ष असणे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि विरोधी पक्ष प्रभावी असण्यासाठी विरोधी पक्ष पुढारी तगडा असावा लागलो. आपल्याला लाल गाडीची सवय जडलीय म्हणून विरोधी पक्ष नेतेपद मागणारे कॉंग्रेसमध्ये अनेक आहेत. काहींना विरोध करणे जमणार नाही, पण ते पद हवेहवेसे वाटेल. अशा प्रवृत्तींना भीक न घालता हायकमांडला कणखर विरोधी पक्ष नेता निवडावा लागेल. हेही जर केले नाही तर कॉंग्रेसवाले स्वत:ची कबर स्वत:च खोदतील.