‘वेबकास्ट’ द्वारे सर्वांना लाभ मिळणार
(करण समर्थ यांजकडून)
दूरदर्शनच्या माध्यमातून लवकरच देशातील पहिली माहितीपट वाहिनीसुरू होईल व त्यापूर्वी फिल्म डिव्हिजनने आजवर बनवलेले सर्व म्हणजे आठ हजार माहितीपट डिजिटाइज करून ‘वेबकास्ट’ द्वारे सर्वांना उपलब्ध करून दिले जातील अशी माहिती फिल्म डिव्हिजनचे महासंचालक ‘बंकीम’ यांनी काल दिली.
गेल्या ६० वर्षांहून अधिक काळापासून माहिती व नभोवाणी खात्याअंतर्गत कार्यरत फिल्मस् डिव्हिजनचे जनतेला माहिती आणि शिक्षण देण्याचे कार्य अव्याहतपणे सुरू आहे. बदलता काळ व तंत्रज्ञानामुळे फिल्मस् डिव्हिजन देशाच्या जडणघडणीमध्ये आजही फिल्मस् डिव्हिजनचे कार्य तेवढेच महत्त्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन फिल्मस् डिव्हिजनचे महासंचालक बंकीम यांनी येथे केले.
४२ व्या ‘इफ्फी’मध्ये फिल्मस् डिव्हिजनचे प्रमुख म्हणून उपस्थित असता काही पत्रकारांशी केलेल्या वार्तालापामध्ये बंकीम माहिती देत होते. दूरदर्शन येण्यापूर्वी देश-विदेशामध्ये घडणार्या प्रत्येक महत्त्वपूर्ण घटनांचे साक्षीदार केवळ फिल्मस् डिव्हिजनचे युनिटस् असत आणि आम्ही केलेल्या या दुर्मिळ चित्रिकरणामुळेच देशभरातील जनतेला देशाच्या कानाकोपर्यात घडणारी प्रत्येक महत्त्वपूर्ण घटना पडद्यावर पहायला मिळत होती. ‘समाचार चित्र’ या शिर्षकांनी चालणारे हे चलत् वृत्तदर्शन त्याकाळी सर्वांसाठी शिक्षण व माहितीचे एकमेव साधन होते. परंतु दूरदर्शनची स्थापना झाल्यावर वृत्तचित्रणाचे काम आमच्याकडून दूरदर्शनकडे गेले आणि काही काळापर्यंत प्रत्येक चित्रपटगृहांमध्ये चित्रपटाच्या प्रत्येक खेळापूर्वी वीस मिनिटांचे दाखविले जाणारे समाचार चित्र हे आता कायमचे पडद्याआड गेले आहे. तरीही फिल्मस् डिव्हिजनचे माहितीपट निर्मितीचे काम अव्याहतपणे सुरूच आहे, अशी माहिती देत ते पुढे म्हणाले, फिल्मस् डिव्हिजन ही देशातील एक सर्वाधिक महत्त्वाच्या संस्थांपैकी एक आहे. कारण भारतासंबंधित सुमारे आठ हजार माहितीपटांच्या निर्मितीनंतर आजही त्यांची जपवणूक करून कार्य आम्ही करत आहोत. फिल्मस् डिव्हिजनकडील सर्वच्या सर्व म्हणजे आठ हजार फिल्मस्च्या रिस्टोरेशनसह डिजिटायझेसनचे काम सुरू झालेले असून आजतागायत अर्ध्याहून अधिक फिल्मचे सदर काम पूर्ण झाले आहे. उर्वरित कामही लवकरच पूर्ण होईल, असे मत बंकीम यांनी व्यक्त केले. फिल्मस् डिव्हिजनमध्ये गेल्या तीन दशकांहून अधिक काळ कार्यरत असणार्या बंकीम यांनी आज भारताच्या फिल्म डिव्हिजनचे दुसरे महासंचालक होण्याचा मान पटकावला आहे. आजपर्यंत फिल्मस् डिव्हिजनच्या माध्यमातून केलेल्या महत्त्वपूर्ण कामाचा उल्लेख करताना, मी १५ वर्षांपूर्वीच केंद्र सरकारला फिल्म डिव्हिजनकडील प्रचंड प्रमाणात उपलब्ध असणारे वृत्तचित्र, माहितीपट, साधनसामुग्री व कुशल तंत्रज्ञांच्या सहाय्य-सहभागाने केवळ माहितीपट लघुचित्रपटांसाठी खास दूरचित्रवाहिनी सुरू करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. आताच्या केंद्रीय नभोवाणी मंत्री अंबिका सोनी यांना चित्रपट या विषयामध्ये विशेष रूची आहे आणि बहुधा त्यांच्याच पुढाकाराने येत्या नजिकच्या काळामध्ये दूरदर्शनच्या माध्यमातून देशातील पहिले माहितीपट चॅनेल सुरू होईल, अशी माहिती दिली.
साधारणपणे शासकीय सेवेमधील उच्च पदस्थ नोकरशहा हे आपल्या कार्यकक्षेबाहेर जाऊन कोणताही नवीन कार्यक्रम वा धोरण राबविण्याबाबत उत्सुक नसतात. परंतु सेवानिवृत्तीला अवघे वीस दिवस शिल्लक असतानाही सेवेच्या शेवटच्या दिवसापर्यंत त्याच जोमाने काम करण्याचा चंग बांधलेले बंकीम अंत्यत विश्वासाने सांगतात, हे माहितीपटाचे चॅनेल कधी लवकर सुरू होईल ते अजून नेमके ठाकऊ नाही, परंतु लवकरात लवकर आमच्याकडील सर्व फिल्मस् या ‘वेबकास्ट’ पद्धतीद्वारे सर्वांसाठी संग्रहीत करून जगभरातील लोकांना कुठूनही पहाता येईल, अशी सोय करण्यासाठी प्रयत्नशील आहे. यामुळे भारताच्या गेल्या साठ वर्षांच्या महत्त्वाच्या घटनांचे साक्षीदार होण्याची संधी जगातील कोणालाही अगदी घर बसल्या होऊ शकेल.
‘इफ्फी’मध्ये फिल्मस् डिव्हिजनचा नेमका सहभाग काय असे विचारले असता बंकीम स्मित हास्य करत उद्गारले, सर्वांना ताजमहाल दिसतो, ताजमहालचा पाया कोणालाही दिसत नाही किंवा कोणी पायाची दखलही घेत नाही. फिल्मस् डिव्हिजन हे इफ्फीच्या पायासारखेच आहे. ‘इफ्फी’च्या प्रिंटस् युनिट, तंत्रज्ञ युनिट, फिल्मस् को-ऑर्डिनेशन कम ट्रॅकिंगचे काम, फेस्टिवलला स्क्रिनिंगसाठी पाठवणे, प्राथमिक स्क्रिनिंगनंतर प्रत्यक्ष स्क्रिनिंगसाठी आवश्यक उपाययोजना करणे, जगभरातून सहभागी होणार्या सर्व फिल्मस् त्यांच्या देशातून बाहेर पडल्यानंतर भारतात येणे, एअर पोर्टस्वरून ताब्यात घेऊन चाचणी केल्यावर महोत्सवात त्यांचे नियोजित खेळ झाल्यावर पुन्हा पॅकिंग करून संबंधितांकडे परत पाठवणे हे सर्वात महत्त्वाच्या जबाबदारीचे काम फिल्मस् डिव्हिजनचे ५० हून अधिक कुशल तंत्रज्ञ कर्मचारी करतात हे मला अभिमानाने सांगावेसे वाटते.