Home बातम्या सर्व जागा लढवण्याचीही राष्ट्रवादीची तयारी : जुझे

सर्व जागा लढवण्याचीही राष्ट्रवादीची तयारी : जुझे

0

कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस युती केंद्रीय पातळीवर झालेली असून गोव्यातही ती होणार आहे. स्थानिक नेत्यांना त्यासंबंधी बोलण्याचा कोणताच अधिकार नाही. आगामी विधानसभा निवडणुकीत जागांवरून स्थानिक पातळीवर बोलणी करणे शक्य आहे. गोव्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षही मजबूत असून तोही सर्व जागा लढवू शकतो असे महसूलमंत्री जुझे फिलीप डिसोझा यांनी पत्रकारांशी बोलताना काल सांगितले.

ऑक्सफर्ड मरीन कार्गो प्रॉडक्शनतर्फे ‘चाहते’ या हिंदी सीडीचे विमोचन डिसोझा यांच्या हस्ते झाले. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना कॉंग्रेस प्रवक्ते माविन गुदिन्हो यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसशी युती न करता सर्व जागा कॉंग्रेसने लढवाव्यात असे जाहीर वक्तव्य केले होते, त्याबाबत प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी वरील उत्तर दिले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचा आधी एकच उमेदवार विजयी झाला होता. गेल्या निवडणुकीत तीन जागा मिळाल्या. या निवडणुकीत किमान सहा जागांवर विजय मिळवता येईल असे जुझे फिलीप डिसोझा यांनी सांगितले. खुद्द माविन गुदिन्हो दाबोळीतून निवडणूक लढविणार असल्याने कुठ्ठाळीच्या जागेवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा दावा आहे. कॉंग्रेसचा हट्टच असेल तर गोव्यातील सर्वच जागा राष्ट्रवादी कॉंग्रेस स्वतंत्रपणे लढवायला तयार आहे. तशी शक्ती राष्ट्रवादीपाशी आहे, असे डिसोझा उद्गारले.