Home बातम्या पेडण्यातही चालते विदेशींची दादागिरी

पेडण्यातही चालते विदेशींची दादागिरी

0

नायजेरियन तरुणांनी जशी पर्वरी येथे दादागिरी केली, त्याचप्रमाणे पेडणे तालुक्यातील हरमल या किनारी भागातही या नायजेरियन पर्यटकांची खुलेआम दादागिरी चालू आहे. तर मोरजी किनारी रशियन पर्यटक व व्यावसायिकांची दादागिरी, स्थानिकांना मारहाण हे प्रकार आजही घडत आहेत. मागील ४ वर्षांपूर्वी तर एका रशियन नागरिकाकडून स्थानिक टॅक्सी चालकाचा खूनही झाला होता.

नायजेरियन पर्यटक जरी मोठ्या प्रमाणात हरमल किनारी भागात वास्तव्य करून असले तरी ते ड्रग्स, मादक पदार्थांची खुलेआम विक्री करत असतात. ते मुळात किनारी भागात ड्रग्स विक्रीची देवाण घेवाण करण्यासाठीच येतात. गेल्यावर्षी एका नायजेरियन पर्यटकांनी तर किनारी भागात उच्छाद मांडला होता.

रशियनांची दादागिरी

मोरजी किनारी भागात मोठ्या प्रमाणात रशियन नागरिकांचे केवळ पर्यटक म्हणून नव्हे तर बेकायदा व्यावसायिकही म्हणून ते नावारुपास येत आहेत. विठ्ठलदासवाडा, तेंबवाडा या भागात मोठ्या प्रमाणात रशियन नागरिकांचे वास्तव्य आहे.

पर्यटक व्यावसायिक बनले

रशियन नागरिक या किनारी भागात पर्यटक म्हणून आले आणि कळत नकळत इथले व्यावसायिक बनले. शॅक्सरेस्टॉरंट, गेस्ट हाऊस, दुकाने, घरे, खोल्या ही आस्थापने त्यांनी आपल्या ताब्यात घेऊन ते व्यावसायिक झाले. यासोबतच पर्यटक टॅक्सी, मोटारसायकल हेही व्यवसाय आता ते करू लागले आहेत. स्थानिकांची त्यांना साथ मिळत असल्याने व सरकारचे दुर्लक्ष होत असल्याने अशा विदेशी पर्यटकांचे आयतेच फावते. या विदेशी व्यावसायिकांनी आता किनारेही काबीज करण्यास सुरूवात केली आहे.

परवाने स्थानिकांच्या नावावर

किनारी भागातील शॅक, हॉटेल रेस्टॉरंट, टूर ट्रॅव्हल एजन्सी, सायबर कॅफे, मनी एक्चेंज ही आस्थापने जरी स्थानिकांच्या नावावर असली तरी या विदेशी नागरिकांनी ती भोडपट्टीवर घेवून स्वत: व्यवसाय करण्यावर भर दिला आहे. ज्या ठिकाणी हे रशियन हॉटेल व आस्थापने चालवतात त्या ठिकाणी त्या ठिकाणी रशियन भाषेतील फलक लावले आहेत.

पर्यटन टॅक्सी व्यवसाय

देशातील व राज्यातील महत्वाच्या पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी व सहलींसाठी पर्यटन टॅक्सी, टेंम्पो ट्रॅव्हल याही व्यवसायात हेच विदेशी नागरिक गुंतलेले आहेत. दरम्यान, गेल्यावर्षी तेंबवाडा येथे उत्तर गोवा टॅक्सी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी असाच एक विदेशी पर्यटक बेकायदा टॅक्सी व्यवसाय करत होता. त्याला पकडून पेडणे पोलिसांच्या स्वाधीन केले होते. तत्पूर्वी याच विदेशी नागरिकाने स्थानिक टॅक्सी व्यावसायिकाला धक्काबुक्की केली होती.

स्थानिकाचा खून

मागच्या ३ वर्षांपूर्वी विठ्ठलदासवाडा मोरजी येथे एका टॅक्सी चालकाला जबर मारहाण करून एका रशियन नागरिकाने स्थानिक युवकाचा खून केला होता. हा रशियन नागरिक आश्‍वे येथे रेस्टॉरंट चालवत होता.

आश्‍वेत टॅक्सी चालकाला मारहाण

गेल्या वर्षी बार्देश तालुक्यातील एका टॅक्सी चालकाने दोन रशियन महिलांचे भाडे आश्‍वे येथे आणले होते. त्यावेळी ठरवून दिलेल्या पैशाची मागणी टॅक्सी चालकाने केली असता त्या टॅक्सी चालकाला कमी पैसे दिले व टॅक्सी चालकाशी हुज्जत घालून त्याला मारहाण केली. अशा कित्येक कारणांमुळे विदेशी पर्यटकांची किनारी भागात दादागिरी चालते. किनारी भागात अधून मधून होणार्‍या पार्ट्यांतही ड्रग्स विक्रीसाठी त्यांचा मोठा वाटा असतो. सरकारने अशा दादागिरी व बेकायदा व्यवसाय करणार्‍या विदेशी नागरिकांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी मोरजीचो एकवोट संघटनेचे अध्यक्ष वसंत ऊर्फ आबा शेटगावकर यांना केली आहे.

ताम्हणकरांची पोलिसांविरुद्ध तक्रार

गुरूवारी पर्वरीत झालेल्या नायजेरियन हल्ला प्रकरणी कॉंग्रेसचे प्रवक्ते सुदीप ताम्हणकर यांनी पोलिसांच्या निष्क्रियतेेमुळे प्रकरण चिघळले असा आरोप करत अधीक्षक प्रियंका कश्यप यांनी अर्वाच्च उद्गार काढल्याबद्दल त्यांच्याविरोधीत पर्वरी पोलिसांत तक्रार नोंदवली आहे. उत्तर गोवा अधीक्षक प्रियंका कश्यप, निरीक्षक शिवराम वायंगणकर आणि इतर पोलीस अधिकार्‍यांवर आरोप करताना पोलिसांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली होती. अधीक्षक प्रियंका कश्यप यांनी यावेळी अर्वाच्च उद्गार काढले. त्या विरोधात श्री. ताम्हणकर यांनी सेक्शन १०८, १६६, २२५, २२५(अ) २६८, ३५५ आणि ५०६ कलमान्वये पर्वरी पोलिसांत तक्रार नोंदवली आहे. जर आपल्या तक्रारीची दखल घेतली गेली नाही तर राष्ट्रपती आणि केंद्रीय गृहमंत्र्यांना या तक्रारीची प्रत पाठविणार असल्याचे श्री. ताम्हणकर यांनी पत्रकारांना सांगितले.