धार्मिक भावना दुखावणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करणार : मुख्यमंत्री

0
6

>> श्रेया धारगळकर यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याचा कडक शब्दांत निषेध

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकून सर्वधर्मीयांच्या धार्मिक भावना दुखावणाऱ्यांविरोधात राज्य सरकार यापुढे कडक कारवाई करणार आहे. आक्षेपार्ह वक्तव्ये करून लोकांच्या धार्मिक भावना दुखावणाऱ्या समाजकंटकांची आता गय केली जाणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल साखळी येथे दिला.
श्रेया धारगळकर यांनी शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण देवस्थानचे महाजन आणि लईराई देवीचे धोंड भक्तगण यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केली होती. या प्रकरणात श्रेया धारगळकर यांना अटक झाली असून, त्यांना 4 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी काल हा इशारा दिला.

सोशल मीडियाच्या माध्यमातून उठसूठ कोणीही आपल्या मनमर्जीप्रमाणे कोणतीही वक्तव्य करतो. असे प्रकार यापुढे खपवून घेतले जाणार नाही.
राज्यातील अनेक सामाजिक संस्था (एनजीओ) चांगले कार्य करतात; परंतु काही जण आपल्याच घरातील दोन-चार जणांना घेऊन एनजीओ काढतात आणि सामाजिक कार्य करत असल्याचे भासवतात. हेच तथाकथित सामाजिक कार्यकर्ते पुढे सोशल मीडियावर धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक भावना दुखावणारी वक्तव्ये करतात. अशी बेजाबबदार वक्तव्ये करणे यापुढे महागात पडणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. श्रेया धारगळकर प्रकरणात जी कारवाई झाली, त्यावरून इतरांनी बोध घ्यावा, असा सल्लावजा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. सोशल मीडियावर मनाला वाट्टेल त्या प्रमाणे वक्तव्ये करणाऱ्यांना या कारवाईतून जरब बसेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

आपण स्वत: देवी लईराई आणि देवी शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीणचा भक्त आहे. श्रेया धारगळकर यांनी ज्या पद्धतीने देवींबाबत आणि महाजन-धोंडांबद्दल जे आक्षेपार्ह वक्तव्य केले, त्याचा आपण निषेध करतो. यापुढे राज्य सरकार अशी आक्षेपार्ह वक्तव्ये खपवून घेणार नाही. धार्मिक भावना दुखावणारी वक्तव्ये करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

श्रेया धारगळकर यांनी आक्षेपार्ह विधाने करत धार्मिक भावना दुखावल्या, शिवाय सामाजिक अशांतताही निर्माण केली. तिच्याविरोधात कारवाईबाबत पोलिसांना सूचना दिल्यानंतर कडक कारवाई झाली. तिला अटक करण्यात आली असून, 4 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. सोशल मीडियावरील आक्षेपार्ह वक्तव्यांवर अंकुश ठेवण्यासाठी सरकार आता ठोस पावले उचलणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

एनजीओंसाठी नियम, अटी ठरवणार
वैयक्तिक स्वार्थासाठी एनजीओ चालवणाऱ्यांसाठी पोलीस खाते व सोसायटी नोंदणी खात्याशी चर्चा करून नियम व अटी ठरवल्या जातील. एनजीओ स्थापन करून गरजूंना मदतीच्या नावाखाली इतर लोकांना दमदाटी करणे, पैशांची मागणी करणे अशी कृत्ये करणाऱ्यांवर सरकार कायदेशीर कारवाई करणार आहे. अशा एनजीओंविरुद्ध लोकांनी थेट पोलिसांत तक्रार नोंदवावी, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला.