येनकेन प्रकारेण..

0
7

स्वतःला सामाजिक कार्यकर्ती म्हणवणाऱ्या एका तरूणीने समाजमाध्यमांवर केलेल्या बेफाम शेरेबाजीमुळे आधी कुंकळ्ळीतील शांतादुर्गा कुंकळ्ळीकरणीचे आणि आता शिरगावच्या श्री लईराईचे भाविक संतप्त होऊन रस्त्यावर उतरले आहेत. आधी कुंकळ्ळीत आणि नंतर डिचोलीतही ह्यासंदर्भात सदर तरुणीविरुद्ध पोलीस तक्रारी दाखल झाल्या, दोन्ही ठिकाणी संतप्त भाविकांनी रास्ता रोको केला. आता तिला अटकही झाली आहे. आजकाल समाजमाध्यमे हा चव्हाटा बनला आहे. कोणीही यावे, कोणाविषयीही काहीही बोलावे, बरळावे असा बेबंद प्रकार सर्रास चालला आहे. खरे म्हणजे ह्या आधुनिक समाजमाध्यमांची ताकद फार मोठी आहे. वृत्तपत्रे किंवा दूरचित्रवाणी वाहिन्यांपेक्षाही त्यांची पोहोच कितीतरी पटींनी अधिक आहे. शिवाय मजकूर, ध्वनी आणि दृश्य अशा अनेक माध्यमांतून म्हणजेच मल्टीमीडियाद्वारे आपले म्हणणे लोकांपर्यंत थेट मांडण्याची आणि त्यावर हजारोंचा तात्काळ प्रतिसाद मिळण्याची सोय, ह्यामुळे गेल्या काही वर्षांत फेसबुक, व्हॉटस्‌‍ॲप आणि इतर समाजमाध्यमे प्रचंड लोकप्रिय ठरली आहेत. त्यांची ही अशी ताकद असल्यानेच अनेक देशांमध्ये ह्या माध्यमांतून जनतेमधून उठाव घडले, राजकीय सत्तांतरेही झाली. कोरोनासारख्या संकटकाळात ही माध्यमे कित्येकांचा जीव वाचवणारीही ठरली. परंतु शेवटी ही दुधारी तलवार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर जेवढा सकारात्मक आणि जनहितकारी गोष्टींसाठी करता येतो, तितकाच तो नकारात्मक आणि विद्ध्वंसक गोष्टींसाठी देखील होऊ शकतो. त्यामुळे अशी आधुनिक साधने आणि माध्यमे वापरणाऱ्यांनी जबाबदारीचे भान ठेवून ते वापरणे अपेक्षित असते. दुर्दैवाने सहजपणे आणि मोफत उपलब्ध असलेल्या ह्या माध्यमांत कोणालाही कोणाचीच आडकाठी नसल्याने बेबंदशाही फोफावलेली दिसते. अगणित आबालवृद्ध अहोरात्र ह्या माध्यमांवर पडीक असतात. तेच त्यांचे विश्व बनलेले असते. त्यामुळे तेथे होणाऱ्या टीकाटिप्पण्यांनाही फार गांभीर्याने घेतले जाते. त्यामुळे येनकेनप्रकारेण स्वतःला प्रसिद्धीच्या झोतात ठेवू पाहणाऱ्यांचे फावते. ज्या तरुणीमुळे सध्याचा विवाद निर्माण झाला आहे ती एक सामाजिक कार्यकर्ती म्हणून स्वतःला पुढे आणू पाहत असल्याचे तिचे यापूर्वीचे व्हिडिओ पाहता दिसते. विशेषतः कोरोनाकाळात गोरगरीबांना जेवण आणि अन्य मदत पुरवण्याची, गरजूंना अंत्यसंस्कारांसाठी मदत करण्याची ग्वाही देऊन काहींना तिने मदतही केल्याचे त्यात दिसते. परंतु नंतर हा सामाजिक कार्याचा सोस भलते वळण घेताना आणि अन्य सामाजिक कार्यकर्त्यांशी पंगा घेण्यापासून वादग्रस्त वक्तव्ये करण्यापर्यंत बहकलेलाही दिसतो. आज राजकारणात महिलांना मोठा वाव आहे. विधानसभेतही तेहतीस टक्के महिला आरक्षणाची तरतूद करण्यात येणार असल्याने राजकारणाचे क्षेत्रही महिलांना खुणावू लागले आहे. राजकारणात पदार्पणासाठी समाजकारण ही पहिली पायरी मानली जाते. त्यामुळे चांगले वक्तृत्व आणि नेतृत्व असलेल्या अनेक मुली, महिला ह्या क्षेत्राकडे आकृष्ट होत आहेत आणि ही चांगली बाब आहे, परंतु केवळ वक्तृत्व आणि नेतृत्वगुण असून चालत नाही. चांगले कर्तृत्वही असावे लागते. मुळात स्वतःप्रती विश्वासार्हता निर्माण करावी लागते. एक काळ होता, जेव्हा गोरगरीबांची कामे सरकारदरबारी धसास लावण्यासाठी स्वखर्चाने त्यांना तालुक्याच्या गावी घेऊन जाणाऱ्या सुहासिनी तेंडुलकरांसारख्या समाजकार्यकर्त्या गोव्यात होत्या. त्यांच्यापाशी ना पैसा होता, ना प्रसिद्धी. होती ती सामाजिक कार्याची जातिवंत कळकळ. आज समाजमाध्यमांच्या आधारे स्वतःला सामाजिक कार्यकर्ते म्हणवणाऱ्यांचा अक्षरशः सुळसुळाट झालेला आहे. यातील काहींना खरी सामाजिक कळकळ आहे आणि सरकारला पदोपदी खडसावून जाब विचारण्यात ते अग्रेसर असतात, पण अनेकजण निव्वळ खंडणीखोरही आहेत. आजकाल समाजमाध्यमांवरचा तोंडदेखला प्रतिसाद खरा मानून स्वतःविषयी भलत्या कल्पना करून घेतल्या जातात, समाजमाध्यमांवरील आपल्या अनुयायांच्या प्रचंड संख्येवर ही स्वयंघोषित पुढारी मंडळी खूष राहते, परंतु बोभाटा म्हणजे कीर्ती नव्हे हे ह्या मंडळींच्या गावी नसते. आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार लोकशाहीने ह्या देशात सर्वांना दिलेला आहे हे खरे, परंतु दुसऱ्यांच्या धार्मिक भावना दुखावण्याची मोकळीकही निश्चितच दिलेली नाही. ही जबाबदारीची जाणीव किमान सामाजिक कार्यकर्ती म्हणवणाऱ्यांपाशी तरी नक्कीच असायला हवी. बेछूट, बेफाट विधाने करून झट् प्रसिद्धी, पट् कीर्ती मिळवण्याची धडपड करणाऱ्या अशा मंडळींना समाजमाध्यमांवर नको तेवढे महत्त्वही दिले जाते. त्यातून बघता बघता असे विषय प्रमाणाबाहेर मोठे होतात. त्यातून त्यांना गरजेपेक्षा अधिक महत्त्व मिळून जाते. सध्याच्या प्रकरणात हेच तर घडले आहे!