बोरीतील अपघातात सरकारी कर्मचारी ठार

0
5

टॉपकोला-बोरी येथे दुचाकीची धडक मालवाहू ट्रकला बसून झालेल्या अपघातात सतीश गावडे (42, रा. पाणीवाडा-बोरी) यांचा गोमेकॉत उपचार सुरू असताना काल मृत्यू झाला. सदर अपघात गुरुवारी सकाळी 8.20 वाजण्याच्या सुमारास घडला. या अपघातात मृत पावलेले सतीश गावडे हे फोंडा उपजिल्हाधिकारी कार्यालयाचे कर्मचारी होते. फोंडा पोलिसांनी ट्रकचालक सय्यद महमद रफिक (24, रा. नावेली-मडगाव) याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी जीए-08-यू- 7284 क्रमांकाचा मालवाहू ट्रक मडगाव येथून होंडा येथे जात होता. टॉपकोला-बोरी येथे अरुंद रस्त्यावर त्याच बाजूने जाणाऱ्या जीए-05-ई-8165 क्रमांकच्या दुचाकीची धडक ट्रकला एका बाजूने बसली. त्यात दुचाकीचालक सतीश गावडे हे गंभीर जखमी झाले. त्यांना 108 रुग्णवाहिकेतून उपजिल्हा इस्पितळात नेण्यात आले. त्यानंतर अधिक उपचारासाठी त्यांना गोमेकोत नेण्यात आले; पण गोमेकॉत उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. फोंडा पोलीस स्थानकाचे निरीक्षक तुषार लोटलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली अपघाताचा पंचनामा करण्यात आला.

सतीश गावडे यांचा अपघात झाल्याची माहिती मिळताच फोंडा उपजिल्हाधिकारी कार्यलयातील अन्य कर्मचाऱ्यांनी उपजिल्हा इस्पितळात धाव घेतली. त्यांचे गोमेकॉत उपचारादरम्यान निधन झाल्याची माहिती मिळताच कार्यालयात शोककळा पसरली. ते मनमिळावू स्वभावाचे होते. त्यांच्या अपघाती मृत्यूबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी आणि एक लहान मुलगी आहे.