दुखावलेले भाजप नेते मगोच्या संपर्कात

0
21

>> सुदिन ढवळीकर यांचा पत्रकार परिषदेत दावा

मयेचे भाजप आमदार प्रवीण झांट्ये यांच्यासह भाजपचे दुखावलेल्या अनेक निष्ठावंत नेते, कार्यकर्ते मगोपच्या संपर्कात आहेत, अशी माहिती मगोपचे ज्येष्ठ नेते तथा आमदार सुदिन ढवळीकर यांनी पत्रकार परिषदेत काल दिली.

भाजपने आमदारांना पळवून आपले सरकार स्थापन केले. आता, मगोपचे संभाव्य उमेदवार पळवून आगामी निवडणूक लढविण्याची तयारी भाजप करत आहे. भाजपचे चार लाख सदस्य असल्याचे सांगितले जाते. तथापि, निवडणूक लढविण्यासाठी एकही लायक उमेदवार त्यांना मिळत नसल्याने दुसर्‍या पक्षाने तयार केलेले संभाव्य उमेदवार पळविले जातात, अशी टीका ढवळीकर यांनी केली.

जागा वाटप लवकरच
मगोप आणि तृणमूल कॉंग्रेस पक्ष यांच्यातील मतदारसंघ वाटप व इतर बाबी येत्या सात-आठ दिवसांत निश्‍चित करण्यात येणार आहेत. त्यानंतर मगोपच्या उमेदवारांच्या नावांची घोषणा केली जाणार आहे, असेही ढवळीकर यांनी सांगितले. राज्यात मगोप-तृणमूल कॉंग्रेसचे सरकार सत्तेवर आल्यास कंत्राटी पद्धतीवरील कर्मचार्‍यांना नियमित केले जाणार आहे. अंगणवाडी कर्मचारी व इतर सरकारी कर्मचार्‍याच्या समस्या सोडविण्यात येतील. राज्यात केवळ १० ते २० दशलक्ष टन खनिज डंप नाही. तर, खनिज डंप १०० दशलक्ष टनाच्या आसपास आहे. खनिज डंपाच्या व्यवहारात घोटाळा होण्याची शक्यता आहे, असेही आमदार ढवळीकर यांनी सांगितले.

नोकरभरतीमध्ये गैरव्यवहार होत आहे. बांधकाम खात्यातील नोकरभरतीच्या चौकशीमध्ये गंभीरता दिसून येत नाही, असेही ढवळीकर यांनी सांगितले.

निवडणुकीच्या तोंडावर
खाण प्रश्‍न ः दीपक

सरकारकडून अनेक घोषणा केल्या जात आहेत. तथापि, त्या घोषणा जनतेपर्यंत पोहोचत नाहीत. गृहआधार, लाडली लक्ष्मी, दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेच्या लाभार्थीना वेळेवर मानधन दिले जात नाही. निवडणुकीच्या तोंडावर खनिज व्यवसाय सुरू करण्याची घोषणा केली जात आहे. सरकारी खात्यातील नोकरभरतीबाबत माहिती जाहीर करावी, अशी मागणी मगोपचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी केली.