प्रवीण आर्लेकरांनी दिला मगो पक्षाचा राजीनामा

0
19

>> उद्या करणार भाजपमध्ये प्रवेश

पेडण्यातील मगोचे संभाव्य उमेदवार प्रवीण आर्लेकर यांनी काल वर्षाच्या शेवटच्या दिवशी ३१ डिसेंबर रोजी मगो पक्षाचा राजीनामा दिला. आर्लेकर यांनी मगो पक्ष सोडल्यानंतर मगोच्या कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

मागच्या दोन वर्षांपासून आपण मगोसाठी पेडणे मतदारसंघात काम केले. मात्र ज्यावेळी मगो पक्षाने तृणमूल कॉंग्रेसशी युती केली, त्यावेळी कार्यकर्त्यांना कुणीच विश्वासात घेतले नाही. त्यामुळे मगोचे समर्थक नाराज बनले. कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन आणि त्यांचा विचार करून आपण मगो पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला असा खुलासा प्रवीण आर्लेकर यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

उद्या भाजपप्रवेश
प्रवीण आर्लेकर यांचा भाजपप्रवेश निश्‍चित झाला असून उद्या रविवार दि. २ जानेवारी रोजी ते पणजी येथे भाजपमध्ये प्रवेश करतील. यावेळी गोव्याचे भाजप निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस, पक्षाध्यक्ष सदानंद तानावडे, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उपस्थित राहणार आहेत.

सुंठीवाचून खोकला गेला ः सुदिन
सुंठीवाचून खोकला गेला अशी प्रतिक्रिया मगोपचे ज्येष्ठ नेते सुदिन ढवळीकर यांनी प्रवीण आर्लेकर यांच्या राजीनाम्यावर बोलताना व्यक्त केली. आर्लेकर यांचे तळ्यात मळ्यात चालू होते. अखेर त्यांनी मगोपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. आता मगोपच्या नवीन उमेदवाराची निवड करू असे ढवळीकर म्हणाले.