– गणपत कुंडईकर
कुंडईचे आमचे कुंडईकर घराणे हे साहित्य, संगीत याविषयीची रसिकता जोपासणारे. त्यामुळे महाराष्ट्रातील नामांकित नाटक कंपन्या गोव्यात आल्या की आमच्या पणजीतल्या घरीच उतरायच्या. असाच एकदा किर्लोस्कर कंपनीचा गोव्यात मुक्काम होता, तेव्हा रात्री मंगेशीला मंगेशाच्या पालखीला काही मंडळी गेली. तिथे दीनानाथांचे गाणे त्यांच्या कानी पडले. एवढ्या तयार गळ्याचा कोण बरे हा मुलगा, या कुतूहलाने त्यांनी चौकशी केली असता त्याचे नाव ‘दीना’ असल्याचे त्यांना समजले. हा मुलगा आपल्या नाटक कंपनीत आला तर त्याचा उत्कर्ष होण्यास वेळ लागणार नाही आणि नाटक कंपनीलाही एक गुणी नट मिळेल या भावनेने त्यांनी अधिक वेळ न दवडता दीनानाथांच्या आईपाशी तुमच्या मुलाला आमच्या ताब्यात सोपवा. त्याला आम्ही चांगले गाणे शिकवू असे सांगून गळ घातली. तिला बिचारीला ही कोण मंडळी आहेत आणि आपल्या मुलाला का न्यायला बघत आहेत ते कळले नाही. ती रात्र कशीबशी काढून दुसर्या दिवशी भल्या सकाळी ती धावतपळत कुंडईचा उभा डोंगर चढून सातूबाब कुंडईकर यांच्या घरी थडकली.
सातूबाब कुंडईकर हे त्या काळातले त्या कुंडई, मंगेशीच्या परिसरातले फार मोठे प्रस्थ. त्यांना त्या परिसरात विलक्षण मान होता. तिने झाला प्रकार त्यांच्या कानी घातला. सातूबाब म्हणजे दादासाहेब कुंडईकरांचे वडील. त्यांनी चौकशी केली असता त्यांना कळले की किर्लोस्कर कंपनीची मंडळी आली होती आणि ती दीनानाथांना न्यायची गळ घालीत आहे. ‘किर्लोस्कर’चा महिमा सातूबाबांना ठाऊक होताच. दीनानाथांच्या आईला ‘थोंगा’ या नावानेच गावकरी ओळखत. सातूबाबनी तात्काळ तिला सांगितले की मुलगा निर्धास्तपणे त्या मंडळींबरोबर पाठव, तो नाव काढील! दीनानाथांच्या आईला तर काय करावे हेच कळेनासे झाले होते. ज्यांच्याकडे आधारासाठी धाव घेतली, तेच सांगत आहेत की दीनाला जाऊदे! सातूबाब चुकीचे कसे बरे सांगतील? दीनानाथांच्या आईच्या मनातली धाकधूक ओळखून त्यांनी तिला सांगितले की, दीनाला जरूर त्यांच्याबरोबर जाऊ दे. पण एक मात्र कर, आधी मंगेशाचा प्रसाद घे. कुंडईकरांनी तिला कॉफी पाजली आणि दिलासा दिला.
त्यांच्या शब्दानुसार दीनानाथांच्या आईने मंगेशाला कौल लावला. देवाने कळी दिली. संध्याकाळी पुन्हा ती बिचारी ‘दीना’सह कुंडईला सातूबाबांकडे धावत आली. त्यांच्या शब्दाबाहेर आपण नाही असे तिने सांगताच कुंडईकरांनी मुलाच्या खर्चासाठी थोडेफार पैसेही दिले. अशा रीतीने इतर मध्यस्थांच्या प्रयत्नांनी आणि सातूबाब कुंडईकरांच्या शब्दावर दीनानाथांच्या आईने आपला काळजाचा तुकडा ‘किर्लोस्कर’च्या हवाली केला.
पुढे दीनानाथांनी लौकीक कमावला. रंगभूमीवर आपल्या पहाडी, पल्लेदार आवाजाने मंत्रभुल घातली. त्या कीर्तीचा डिंडिम नाट्यवेड्या गोव्यातही वाजला नसता तरच नवल!
कुंडईकरांचे पणजीत आज जिथे कुंडईकरनगर आहे, तिथे जुने चौकीचे घर होते. ग्रामीण भागांतील अनेक मुले तिथे शिकण्यासाठी राहात असत. पुण्या–मुंबईची कोणतीही मोठी नाटक कंपनी आली की त्यांचा मुक्काम कुंडईकरांच्या पणजीतील त्या घरातल्या बिर्हाडी असे. दीनानाथांचा आवाज एवढा जोरदार होता की जेव्हा पणजीतल्या एडन नाट्यगृहामध्ये (आज तिथे नॅशनल थिएटर आहे) दीनानाथ रात्री गात असत, तेव्हा त्यांचा आवाज पणजीच्या पोलीस स्थानकापर्यंत पोहोचायचा. तेथील पोर्तुगीज पोलिसांनाही त्या गाण्यांनी वेड लावले होते. त्यांना ते शब्द वा त्या शब्दांचा अर्थ कळत नसे, परंतु तरीही ‘परवशता पाश दैवे’सारखे गाणेदेखील ते अजाणतेपणी पण केवळ दीनानाथांच्या स्वरांच्या मोहिनीमुळे गात फिरत असत.
दीनानाथांच्या मनात कुंडईकर घराण्याबद्दल सदैव कृतज्ञता होती. नावलौकीक मिळाल्यावर कधीही कुंडईकरांच्या घरी आले, तरीही ते विनम्रपणे दीड पायांवर उभे राहायचे.
दीनानाथांनंतर मंगेशकर कुटुंबाशी आमच्या घराण्याचा तसा संपर्क नव्हता. मात्र, एकदा माई मंगेशकर आजारी पडल्या. त्यांचे कौटुंबिक डॉक्टर होते डॉ. हेदे. त्यांच्याकडे लता मंगेशकर गेल्या असता डॉ. हेदे काही कारणाने तेथे नव्हते. कुंडईकर घराण्यातलेच आनंदबाब हे तेव्हा वैद्यकीय शिक्षण घेत असल्याने मुंबईत होते. डॉ. हेदे नाहीत व दुसरेच डॉक्टर आहेत म्हटल्यावर लता परत गेली. माईंनी विचारले, दुसरे कोण डॉक्टर आहेत, त्यांना बोलाव. लता पुन्हा बोलवायला गेली असता आनंदबाब तिच्यासोबत माईंना तपासायला घरी गेले. तपासता तपासता माईंनी त्यांना नाव विचारले. ‘कुंडईकर’ हे नाव ऐकताच माईंनी ओळख काढली. सातूबाबांचे ते पणतू हे कळताच माईंच्या मनात दीनानाथांच्या तोंडून ऐकलेल्या आठवणी जाग्या झाल्या. त्यांनी आवर्जून लताला त्यांच्यासाठी मसालेदूध करायला सांगितले.
कुंडईकरांच्या घराण्याशी बालगंधर्वांचाही फार जवळचा संबंध होता. बालगंधर्व कुंडईच्या घरी आठ–आठ दिवस राहात असत. एक आठवण सांगण्यासारखी आहे. कुंडईकरांच्या घरी तेव्हा ‘केसरी’ वगैरे महाराष्ट्रातील नियतकालिके येत असल्याने गंधर्व कंपनीविषयी त्यांना ऐकून माहीत होते. १९३२ साली गंधर्व कंपनी गोव्यात आली. शिवराम तथा दादासाहेब कुंडईकर हे प्रयोग पाहायला गेले. गंधर्व कंपनीचा तो थाट, स्वतः नारायणरावांची गायकी पाहून ते थक्कच झाले. त्या काळी स्त्रिया गोव्यात नाट्यप्रयोगांना वगैरे जात नसत. तशी प्रथाच नव्हती. पण दादासाहेबांनी घरातल्या लेकी–सुनांना सांगितले, ‘‘तुम्ही जर गंधर्वांचा प्रयोग पाहिला नाही, तर मला देव क्षमा करणार नाही. मला पाप लागेल… आपण सगळे पुन्हा गंधर्वांचे नाटक पाहायला जाऊ.’’ त्याप्रमाणे खरोखरच समस्त कुंडईकर मंडळी गंधर्वांचा ‘स्वयंवर’चा प्रयोग पाहायला रावांच्या त्या नाट्यगृहात गेली. प्रयोग सुरू होण्याच्या आधी बालगंधर्व विंगेतून कोण कोण पुढच्या रांगांत बसलेले आहे हे पाहात असत. त्यांनी तिथून पाहिले तर कपाळाला आडवी चिरी लावलेली एक तेजस्वी स्त्री समोर प्रेक्षकांत बसलेली आहे असे त्यांना दिसले. त्यांच्या मनात काय आले देव जाणे, त्यांनी थिएटर मालक रावांना बोलावून आणले आणि विचारले की ‘‘त्या समोर बसल्या आहेत त्या कोण आहेत? मला त्या साक्षात् देवताच दिसतात. मला त्यांच्या पाया पडायचे आहे.’’ रावांनी त्यांना सांगितले की त्या दुसर्या तिसर्या कोणी नसून, आपल्या कंपनीचा मुक्काम ज्या कुंडईकरांच्या घरात असतो, त्याच्या त्या मालकीणबाई आहेत. कपाळाला आडवी चिरी लावलेल्या त्या तेजस्वी स्त्री होत्या सौ. सीताबाई कुंडईकर. वै. रायूबाब धेंपे यांच्या त्या एकुलत्या एक कन्या. खरोखरच त्या एखाद्या देवतेसारख्या दिसत असत. त्यांच्या चेहर्यावर सात्विक तेज विलसत असे. रावांनी राजाबाब कुंडईकरांना गंधर्वांची इच्छा सांगितली. दुसर्या दिवशी बालगंधर्वांना कालापूरला सीतामाईंच्या माहेरी, म्हणजे कालापूरच्या धेंप्यांच्या घरी नेण्यात आले. तेथे ‘ही आपली आईच आहे’ असे म्हणत बालगंधर्वांनी त्यांना अक्षरशः साष्टांग नमस्कार घातला. इतकेच नव्हे, तर दुसर्यांदा १९४१ साली जेव्हा बालगंधर्व पुन्हा पणजी मुक्कामी आले, तेव्हा प्रयोगावेळी नटवर्य श्रीपादराव नेवरेकर यांनी सीताबाईंना आत रंगपटात नेले असता बालगंधर्वांनी तेथेही त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवून आशीर्वाद घेतला. गंधर्वांच्या ‘स्वयंवर’मधील गाण्यांची आणि दिसण्याची कुंडईकर कुटुंबाला एवढी भुरळ पडली की त्यांनी आपल्या कुंडईच्या घरातील विधवा स्त्रीसाठीही गंधर्वांचे गाणे व्हावे अशी इच्छा व्यक्त केली. त्याप्रमाणे बालगंधर्व कुंडईला गेले आणि त्या घराच्या, त्या परिसराच्या प्रेमातच पडले. १९३२ साली निर्माण झालेला तो घरोबा अगदी १९५३ सालपर्यंत कायम होता. बालगंधर्व जेव्हा जेव्हा गोव्याला येत तेव्हा कुंडईकरांच्या त्या कुंडईतील घरी मुक्कामाला जाऊन गाण्यांची मैफल करीत असत. बालगंधर्वांच्या वास्तव्याने व गायकीने आमचे ते घर पावन झाले आहे हे सांगायला मला अभिमान वाटतो.