Home बातम्या दीना…तुझ्याविना स्वरमंच सुना!

दीना…तुझ्याविना स्वरमंच सुना!

0

विष्णू सूर्या वाघ

प्रिय दीना!

प्रिय दीनाअशी हाक मारल्याबरोबर आश्‍चर्य वाटलं असेल तुला नाही? कदाचित माझा रागही आला असेल! मनात म्हणशीलकोण हा उपटसुंभ मला दीनाम्हणणारा? जराही आदर नाही, अदब नाही असा कोण हा तिरमटराव?

तेव्हा सर्वप्रथम तुला दीनाम्हणून का हाक मारली याचं स्पष्टीकरण करतो. त्याचं काय आहे, तू पडलास अस्सल गोंयकार. मीही गोंयकारच. एक गोंयकार दुसर्‍या गोंयकाराला एकेरीवर येऊन हाक कधी मारतो? ती व्यक्ती सर्वात जवळची असेल तेव्हा. माझ्या बापाला मी कधी तुम्हीम्हटलं नाही. ‘भाऊ तू खंय गेल्लो? तू खंय वयताअसंच मी बोलायचो. देव देव म्हणून जो कोणी आहे त्याच्याशी कोणताच भक्त बहुमानार्थी भाषेत बोलत नाही. ‘देवा मी तुम्हाला अभिवादन करतोअसं कोणी म्हणतं का? ‘देवा मी तुझ्या पाया पडतोअसंच म्हणणार थेट. ‘सूर्यदेव उगवलेअसं आपण म्हणतो का? की सूर्य उगवलाअसं म्हणतो. मग मला सांगबाप, सूर्य आणि देव यांना एकेरी हाक मारल्यानंतर तुलाही तशीच मारावी लागेल की नाही? या तिघांपेक्षा तीळभरही कमी नाहीस तू मला! स्वरब्रह्माचा आविष्कार घडवणारा साक्षात देवच आहेस आमचा. मर्दानी गायकीचा लखलखीत प्रकाश पाडणारा संगीतसूर्यच आहेस माझ्यासाठी. आणिरंगभूमीचा प्रचंड मोठ्ठा वारसा आम्हा गोंयकारांसाठी ठेवून गेलेला आद्य बापही तूच नाहीस का?

थोडक्यात सांगायचं तर आपण दोघेही एकमेकांच्या अगदी जवळ आहोत. जरी आपली प्रत्यक्ष भेट झाली नाही, तरीही. आणि भेट तरी कशी होणार? मी जन्मायच्या पासष्ट वर्षं आधी तू या पृथ्वीतलावर अवतरलास आणि उण्यापुर्‍या बेचाळीस वर्षांचं आयुष्य जगून काळाच्या क्षितिजावर अस्तंगत झालास. तू गेलास नि पंचवीस वर्षांनंतर मी जन्माला आलो. तीन पिढ्यांचं अंतर होतं मध्ये. तू तर तरुण वयातच गोवा सोडून गेला होतास. पण बकुळीची फुलं झाडावरनं झडली, वार्‍यावर वाहत दुसरीकडे पडली तरी आपला गंध पसरवत राहतात, त्याप्रमाणे माझ्या चिमुकल्या डोंगरी गावात तुझ्या आठवणी माझ्या बालपणातही दरवळत होत्या. इत्रुजाच्या माटवात सौभद्र, विद्याहरण, मानापमानसारखी अभिजात नाटकं बघायला आलेले बुजुर्ग नाट्यशौकिन पान खाता खाता, विडी ओढता ओढता कधीकधी तुझ्याबद्दल आम्हाला सांगायचे– ‘‘तो मंगेशीचो दीना मरे? व्वा! जांनॉत! आरे आमी पळयला तेका. मंगेशीच्यान कुंडयच्या तारीन बसोन येतालो दोंगरेरआमगेली नाटकां पळवपाकयेदो आसलोएक पयसो दिल्यार पद म्हण्टालोब्रह्मकुमारी सरस्वतीऽऽ पाव गे मजलाऽ दे बुद्धी मतीऽऽ!’’

इत्रुजाच्या माटवात गावच्या कलाकारांनी सं. दामाजी नाटक केलं. त्याकाळी अंकुश वेर्णेकर, सोक्रू कुर्डीकर, सूर्या वाघ, रामराय शिरोडकर असे दिग्गज लोक नाटकांत कामं करायचे. दामाजीची भूमिका अंकुश वेर्णेकर यांनी केली होती. मी तेव्हा चौथीत असेन. आदल्या वर्षीच मी अपराध मीच केलाया नाटकातून रंगभूमीवर पाऊल टाकलं होतं. त्या नाटकातील माझी संजयची भूमिका सर्वांनी वाखाणली होती. त्या पुण्याईवर मला दामाजी नाटकातही काम मिळालं. विठू महाराचं. त्यात एक गाणंही होतं

गुन्हेगारी धन्याची काई नाई जी

काळामंदी परजा आपली मरू लागली फार

वाचवन्याला प्रान उगाडेलं धान्याचं कोठार

जोहार मायबाप जोहार

मेकअपला सखाभाऊ मयेकर होते. त्यांनी मला विठोबासारखा संपूर्ण निळाजांभळा रंगवला होता. हातात काठी, कमरेला पंचा, खांद्यावर घोंगडी अशा वेशात, पूर्ण जोशात मी पद गाऊन मोकळा झालो. नाटक संपल्यावर एक म्हातारा आत आला व म्हणाला– ‘‘आता याद जाली. दीना करतालो हो विठू म्हारकिदें गायतालों पद जाणा? तेज्या चो लेगीत वालोर ना तुका!’’

त्या क्षणी मी मनातल्या मनात तुला किती शिव्या दिल्या असतील मलाच ठाऊक! पण तेव्हा मला दीनाकोण ते थोडंच ठाऊक होतं?

तर तुझामाझा संबंध हा असा बालपणापासून.

पुढं नाटकाशी असलेलं नातं वाढत गेलं. दृढ झालं. नाटक जगण्याचा भाग बनलं. रंगभूमीबद्दल खूप काही वाचलं. संगीत रंगभूमीचा अभ्यास केला. तुझ्याबद्दल, बालगंधर्वांबद्दल, केशवराव भोसल्यांबद्दल उत्तरोत्तर अधिक माहिती मिळत गेली. आणि मग तू मनातल्या मनात पुन्हा आकाराला आलास. तुझे सूर, तुझा अभिनय, तुझे रूप प्रत्यक्ष नाही पण मनःचक्षूंच्या माध्यमातून अनुभवता आले.

२९ डिसेंबर १९०० हा तुझा जन्मदिवस. मंगेशीच्या कलासंपन्न वातावरणात येसूबाई मंगेशकरच्या पोटी तू जन्माला आलास. विजया आणि कमळनाथ ही तुझ्या पाठची भावंडं. बालपणापासूनच म्हणे तुला गाण्यात रुची होती. तुझा स्वभावही हुड होता. मंगेशाच्या तळीत पोहायचं, सवंगड्यांबरोबर मौजमस्ती करायची, नकला करून दाखवायच्या, गाणी म्हणायची यातच तुझा दिवस जायचा. आईला तू बाम्हणायचास. ‘बानं तुला शाळेत घातलंपण अक्षरं गिरवायला थोडाच तुझा जन्म होता? कसाबसा दोन इयत्ता शिकलास व सोडून दिलास शाळा. बाच्याही ते लक्षात आलं. तुला संगीतच शिकवावं म्हणून तिनं मंगेशीतलेच एक श्रेष्ठ सारंगीवादक पांडीमाम मंगेशकर यांच्याकडं तुला पाठवलं. सारंगी शिकवताना पांडीमामनी तुझं स्वरज्ञान पक्कं करून ठेवलं, पण त्यातही तुझं मन रमेना. मग तुझी रवानगी झाली म्हार्दोळच्या रघुमाम माशेलकरांकडे. रघुनाथमाम हे त्याकाळचे एक सर्वोत्कृष्ट तबलापटू. किर्लोस्कर नाटक मंडळीचे ते पहिले तबलावादक. अण्णासाहेब किर्लोस्करांच्या सं. ‘शाकुंतलच्या प्रयोगाने संगीत नाटकाचा पडदा पहिल्यांदा व्यावसायिक रंगभूमीसाठी उघडला.

पंचतुंड नररुंड मालधरही या नाटकातली म्हणजे मराठी रंगभूमीवरली पहिली नांदी. त्या पहिल्या नांदीची साथ रघुनाथमामा माशेलकर यांनी केली होती. किर्लोस्करी रंगभूमीच्या आठवणींचा प्रचंड साठा त्यांच्यापाशी होता. रघुमामचा शागीर्द म्हणून तू गेलास नि तबल्याची शिकवणी घेता घेता सांगलीपुणेमुंबईकडील व्यावसायिक रंगभूमीबद्दल खूप काही ऐकता आलं. आपणही नाव काढायला गोव्याबाहेर गेलं पाहिजे या विचाराचा किडा डोक्यात वळवळू लागला.

रघुमाम तुला तबला शिकवीत होते खरे, पण तुला त्या लयचक्रात अडकायचे नव्हते. तुला खरं तर केला होता सुरांच्या मधमाशीने डंख! हे रघुमामांच्या लक्षात नाही आलं. पण त्यांची पत्नी मधुराबाई हिनं तुझी घालमेल ओळखली. तुला अनेक वेळा गाणं गुणगुणताना तिनं ऐकलं होतं. ती स्वतः एक उत्तम गायिका होती. तिनंच रघुनाथमामांच्या मागं लागून तुझा तबला थांबवला आणि तुला शास्त्रोक्त गायनाचे धडे देण्याची विनंती केली.

तर दीना, इथून सुरू झाला तुझा सुरांचा प्रवास. हो ना? रघुमाम तुला रागदारीचे धडे द्यायला लागले. तुझ्या गाण्याची बैठक हळूहळू पक्की होत गेली. जन्मजात सुरेलपणा तर गळ्यात होताच. आता शिकवणीमुळे आत्मविश्‍वास आला. मुळमुळीतपणा तर तुला कधी आवडतच नव्हता. सराईत योद्यानं सपकन् कट्यार फेकावी त्याप्रमाणं तू आलापी फेकायचास. ऐकणार्‍यांना वाटायचं आभाळातून लखकन् वीज कशी चमकली? तू गायला लागलास तेव्हापासून तुझा गायकीचा वेगळेपणा लोकांना जाणवत होता. काल्याच्या उत्सवात पोटाला मोर बांधून सरस्वतीच्या वेशात नाचत नाचत ब्रह्मकुमारी पाव मलाहे गाणं तू म्हणायचास. मग विठू महाराचं जोहार जी जोहार.’ ती तुझी पहिली भूमिका. नि नाटकाचं वेड डोक्यात गेलं ते तेव्हापासून कायमचंच. म्हार्दोळ, कुंडई, डोंगरी, करंजाळ, बांदोडे, सावयवेरेआजूबाजूच्या परिसरात कुठंही नाटक असलं की तू हजर! कुणी एक पैसा दिला की तू म्हणूनच दाखवलं नाट्यगीत. हळूहळू पंचक्रोशीत तुझा बोलबाला झाला. ‘दीनासारखो गावपी नाया वाक्यावर पैजा लागू लागल्या. गोवाभर तुझं नाव झालं. आणि तुझी कीर्ती गोव्याच्याही सीमा ओलांडून महाराष्ट्रात पसरली. किर्लोस्कर नाटक मंडळी, गंधर्व नाटक कंपनी यांसारख्या कंपन्यांच्या धुरीणांपर्यंत बातमी गेली की दीना नामक एक अद्भुत आश्‍चर्य सांप्रती गोमंतकात वावरते आहेत्यास रंगभूमीवर आणल्यास खचितच क्रांतिकारी असे काही घडण्याची शक्यता आहे!’आणि अखेर मंगेशीच्या परिसरात वावरणार्‍या या कस्तुरीमृगाचा शोध घेत घेत किर्लोस्कर संगीत मंडळीचे व्यवस्थापक शंकरराव मुजुमदार गोव्यात पोचले. एव्हाना बालगंधर्व, गणपतराव बोडस आणि गोविंदराव टेंबे या तीन बुजुर्गांनी किर्लोस्करला रामराम ठोकून नवीन कंपनी काढली होती. मुजुमदार नव्या गायिकेच्या (म्हणजेच स्त्रीपार्ट करणार्‍या गायकाच्या) शोधात होते. त्यांनी तुला पाहिलं. तुझ्यातली प्रचंड ऊर्जा त्यांनी हेरली आणि या मुलाला कंपनीत नेण्याची परवानगी द्याअशी गळ तुझ्या बाला घातली. तुला दूरदेशी जाऊ द्यायला बा कुठं तयार होती? तिनं आधी नकारच दिला. पण व्यंकटराव पानवेलकर, मंगेशराव देशपांडे, दादा वैद्य, कवळ्याचे दुर्गा भटजी अशा काही प्रतिष्ठितांनी मध्यस्थी करून बाचं मन वळवलं आणि चौदाव्या वर्षी तू किर्लोस्कर नाटक मंडळीत रुजू झालास!

शंकरराव मुजुमदार हे अस्सल रत्नपारखी होतेच, पण अत्यंत धूर्त व व्यवसायात चलाख होते. बालगंधर्व आणि केशवराव भोसले हे दोन संगीतसूर्य तेव्हा प्रखर तेजाने तळपत होते. बालगंधर्वांनी तर मराठी मनाला अक्षरशः वेड लावलं होतं. त्या सूर्याच्या तळपत्या उन्हात तुझ्यासारख्या नवख्या नक्षत्राला रसिकांसमोर आणण्यातला धोका त्यांना जाणवत होता. तशात तुझं किशोरवय. आवाजबिवाज फुटला तर? शंकररावांनी आपल्या कोशात तुला पुरता बंद करून टाकला. तुला आपल्याच खोलीत ठेवून घेतला. शास्त्रीय गायन शिकवण्यासाठी मुरादबा बीनकार यांची शिकवणी चालू केली. १९१४ मध्ये दंभस्फोटया नाटकात मुरळीची छोटीशी भूमिका देऊन तुला अजमावलं. त्यात तुला मोजकीच गाणी होती. पण तू अशा तडफेनं गायलास की रातोरात संपूर्ण पुण्यात तुझं नाव झालं. नंतर सौभद्रमधली अर्जुनाची भूमिकाही तुझ्या वाट्याला आली. एव्हाना तुझा आत्मविश्‍वास बळकट झाला होता. पण शंकरराव नको तितक्या सावधपणे वागत होते. बालगंधर्व (गंधर्व नाटक मंडळी) आणि केशवराव भोसले (ललित कलादर्श) यांच्याशी थेट सामना करण्याऐवजी हिंदीउर्दू नाट्यसृष्टीत मुशाफिरी करून थोडा पैसा कमवावा असा व्यवहारी विचार त्यांनी केला व कंपनीचा मोर्चा हिंदी प्रदेशाकडे वळवला. ‘ताजे वफा’, ‘कॉंटों में फूलयासारखी हिंदी नाटके तुझ्या गायकीच्या बळावर त्यांनी लावली आणि बर्‍यापैकी पैसा कमावला. तू असशील त्यावेळी सोळासतरा वर्षांचा. ‘ताजे वफातील तुझ्या गाण्यांना म्हणे दहादहा वन्समोअर मिळत. शंकरराव खूश होते, पण तू तळमळत होतास. तुझा कंठ शिवशिवत होता तो मराठी नाट्यसंगीत गाण्यासाठी. तुझ्याच शब्दांत तुझ्या मनातली घालमेल तू लिहून ठेवली आहेस. तू म्हणाला होतास– ‘‘मराठी रसिकांकडून मिळणारी एकच टाळीपण ती मी माझ्या घरची बासुंदी समजून आकंठ मनोमन पीत असे. पण शनिवाररविवारी हिंदी प्रेक्षकांकडून मला टाळ्यांचा आवाज ऐकू येई तेव्हा माझ्या बासुंदीच्या थाळीत बोंबील पडताहेत की काय असे मला वाटे. मी खट्टू होई. परंतु नोकरीत असल्यामुळे माझाही नाईलाज होता.’’

शेवटी एक दिवस तू मनोमन निर्धार केलास आणि बोंबलांच्या टोपलीवर लाथ मारून किर्लोस्करमधून बाहेर पडलास. चिंतामणराव कोल्हटकर, कृष्णराव कोल्हापुरे आणि तात्यासाहेब परांजपे यांना घेऊन स्वतःची कंपनी काढलीस. राम गणेश गडकरी यांचा उत्तम स्नेह तुला लाभला होता. अण्णासाहेब किर्लोस्करांबद्दल अपार आदर होता. संस्थेचं नाव काय ठेवावं या विषयावर खल चालू झाला त्यावेळी गडकर्‍यांनी बळवंतहे नाव सुचवलं. योगायोगानं बळवंतहे किर्लोस्करांचं पहिलं नाव. त्याच काळात भारतीय स्वातंत्र्ययुद्धात टिळकांचं नेतृत्व लोकमान्य झालं होतं. त्यांचंही नाव बळवंत. त्यामुळे या दोन्ही व्यक्तिमत्त्वांची सांगड घालून तू बळवंत संगीत नाटक मंडळीची स्थापना बोरीवली येथील दाजीबा दांडेकरांच्या बंगल्यात १८ जानेवारी १९१८ रोजी करून टाकलीस. मुजुमदारांच्या रेशमी कोशातून बाहेर पडलेलं फुलपाखरू आता स्वतःच्या पंखांच्या बळावर रंगभूमीच्या मुक्तांगणात भिरभिरू लागलं!

बळवंत नाटक मंडळीचं पहिलंच नाटक होतं शाकुंतल.’ २९ मार्च १९१८ रोजी या नाटकाचा पहिला प्रयोग झाला. शकुंतलेची भूमिका तू पदार्पणातच गाजवलीस. पुढं सौभद्रमधली सुभद्राही साकारलीस. पण काही झालं तरी ही जुनी नाटकं होती. शेवटी न. चिं. केळकर यांच्याकडून तू वीर विडंबनहे नवीन नाटक लिहून घेतलंस. या नाटकानं बळवंतला लौकिक, कीर्ती आणि बर्‍यापैकी पैसाही मिळवून दिला. पण तू खर्‍या अर्थानं रसिकांच्या गळ्यातील कंठमणी बनलास तो सं. ‘मानापमानमधील धैर्यधराच्या भूमिकेमुळे. यापूर्वी तू बहुतेक स्त्रीभूमिकाच केल्या होत्यास. सिंधू (एकच प्याला), सुभद्रा (सौभद्र), लतिका (भावबंधन), पद्मावती (उग्रमंगल), शिवांगी (राजसंन्यास), तेजस्विनी (रणदुंदुभी), सुलोचना (संन्यस्त खड्‌ग) या भूमिकांवर प्रेक्षक फिदा होते. पण तुझ्यातला खरा गायक तर आकाराला आला धैर्यधराच्या रूपाने. तुझ्याआधी अनेकजण धैर्यधर करून गेले होते. पण या भूमिकेला तू स्वतःचा बाज चढवलास. स्वच्छ वाणी, खणखणीत आवाज, विस्मित करणारी फिरत आणि विजेपेक्षा गतिमान पल्लेदार ताना या गुणवैशिष्ट्यांनी तुझा धैर्यधर अजरामर झाला. ‘ब्रह्मकुमारीहे बळवंतचं अखेरचं नाटक. यातील गौतमाची भूमिका तू केली होतीस. ‘विलोपले मधु मीलनात याहे नाट्यगीत ऐकावं ते तुझ्याच मुखातून.

दीना, १९१५ ते १९३३ या काळात किती गाणी तू रंगभूमीवर गायला असशील नाही? तुला गाताना ज्यांनी ऐकलं ते खरंच भाग्यवान! तुझ्या त्या अवाढव्य खजिन्यातली काही मोजकीच रत्नंमाणकं आज ध्वनिफितीच्या माध्यमातून उपलब्ध आहेत. कधीकधी मी ती ऐकतो आणि आम्ही जन्मालाही आलो नव्हतो अशा काळात जाऊन पोचतो. नाचत ना गगनात नाथा, मर्मबंधातली ठेव ही, शतजन्म शोधिताना, विलोपले मधुमीलनात, प्रेमसेवा शरण, दिव्य स्वातंत्र्यरवीकिती म्हणून नाट्यगीतांची आठवण करू? आणि मला सर्वाधिक आवडणारंहृदयाला अक्षरशः चराचरा कापीत जाणारं रणदुंदुभीमधलं ते गाणं– ‘परवशता पाश दैवे ज्याच्या गळा लाभलामातृभूमी ज्याची त्याला होय बंदिशाला…’ अगदी आजच्या काळालाही समर्पकपणे लागू होणारं!

१९३० नंतर बोलपटांचा प्रभाव वाढला. रंगभूमीला उतरती कळा लागली. तूही १९३३ साली बळवंत नाटक कंपनी बंद करून बळवंत पिक्चर्सही संस्था काढलीस. ‘कृष्णार्जुन युद्धहा चित्रपट बनवलास. पण तो आपटला. आणखी दोन बोलपट काढलेस, त्यातही हात पोळून घेतलेस. मुळात व्यवहार तुला कधी जमलाच नाही. तू होतास फक्त एक सच्चा कलाकार. पण या व्यवसायात गुंतत गेलास आणि दुष्टचक्रांची मालिकाच तुझ्या जीवनात सुरू झाली. संकटांमागून संकटं कोसळली. काही दिवस विपन्नावस्थेत काढावे लागले. १९४० साली शेवटी तू कंपनी बंद केलीस आणि काही नाटकांत कामे करून, कधी जलसे करून दिवस गुजरलेस. पण असं खुरडत खुरडत जगणं तुला मानवण्यासारखं नव्हतं. अखेर तू २४ एप्रिल १९४२ या दिवशी जगाच्या रंगभूमीवरून एक्झिट घेतलीस ती कायमची.

दीना, आज तू नाहीस, पण तुझ्या आठवणी आहेत. तुझ्या दंतकथा आहेत. तुझी गाणी आहेत. आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे तुझ्या देदीप्यमान प्रकाशाचं दान आजही जगाला देणारी तुझी पाच नक्षत्रं आहेतलता, आशा, मीना, उषा आणि हृदयनाथ. तू अल्पायुषी होतास. पण या पाच नक्षत्रांना दीर्घ आयुष्य मिळालं. तुझं नाव त्यांनी विश्‍वाच्या कानाकोपर्‍यांत पसरवलं. अनेकदा तुझंच दर्शन घडतं त्यांच्या स्वरातून. विशेषतः आशादीदी विलोपले मधुमीलनात याम्हणते तेव्हा.

दीना, आपल्या संगीतक्षेत्रात तसे गंधर्वखूप होऊन गेले रे. तुझ्या काळात बालगंधर्व तर होतेच. नंतर सवाई गंधर्व झाले (रामभाऊ कुंदगोळकर). भास्करबुवांना लोक म्हणे देवगंधर्व म्हणायचे. आपले सुरेश हळदणकर महाराष्ट्र गंधर्वम्हणून गाजले. शिवपुत्र कोमकाली कुमार गंधर्वबनले. सौदागर नागनाथ छोटा गंधर्वया उपाधीने लोकप्रिय झाले. खुद्द तुझा बाळ हृदयनाथ भावगंधर्वम्हणून ओळखला जातो. या गंधर्वांच्या मांदियाळीत तुला काय म्हणायचं? पदव्या देण्याचा अधिकार मला कुणी दिला असता तर मी तुला शिवगंधर्वअसंच म्हटलं असतं. शिवाच्या म्हणजेच मंगेशाच्या भूमीत तुझा जन्म. शिवाच्या दाहक ऊर्जेसारखीच तुझीही ऊर्जा. आणि शिवासारखीच तुझी विरागी वृत्ती. या वृत्तीनंच तुला शापित गंधर्वठरवलं. बेफिकीरपणे, सांबाच्या भोळ्या वृत्तीने तू जगत गेलास. शिवाप्रमाणेच सुरेचा महासंहारक भस्मासुर तू निर्माण केलास अन् या भस्मासुरानं तुझ्या मस्तकावर हात ठेवून राखरांगोळी केली.

दीना, आज तू नाहीस. आपण यापूर्वी कधी भेटलोही नाही. पुढंमागं भेटू याचीही शाश्‍वती नाही. तू गायलेल्या गाण्यातच सांगायचं तरशतजन्म शोधिताना, शत आर्तीं व्यर्थ झाल्या!

मराठी रंगभूमी आज खूप पुढं गेलीय दीना. ती खूप बदलली आहे. तुझ्या काळातलं नाटक आज राहिलेलं नाही. तरीही मराठीचा रंगमंच अजून तुझी आठवण काढतो आहे. तुझ्याविना दीना, हा रंगमंच कधीकधी व्याकूळ होऊन रडतो आहे.

बस्स, एवढंच!