Home बातम्या दिवाळी सण मोठा… नाही आनंदा तोटा!

दिवाळी सण मोठा… नाही आनंदा तोटा!

0

– प्रा. सुरेंद्र वसंत सिरसाट

दीपावली… दिवाळी… दीपोत्सव…. संपूर्ण भारत देशात हा उत्सव मोठ्या उत्साहाने, आनंदाने आणि मंगलमय वातावरणात साजरा केला जातो. हिंदू पंचांगानुसार अश्‍विन वद्य त्रयोदशी ते कार्तिक शुद्ध प्रतिपदा हे चार दिवस खर्‍या अर्थाने सर्वसामान्य माणसे दिवाळी सण साजरा करतात.

शेतीचा हंगाम संपून नवीन पिके हाती आलेली असतात. सर्वत्र आनंदी आणि उत्साहवर्धक वातावरण असतं. पहिल्या दिवशी धनत्रयोदशी. या दिवशी दीपप्रज्वलन करून घरातील दागदागिने स्वच्छ केले जातात. व्यापारी लोक हिशेबाच्या रोजमेळ खरेदी करतात. उपवास करून विष्णू, लक्ष्मी, कुबेर, योगिनी, गणेश, नाग व द्रव्यनिधी या धनाच्या देवतांचे पूजन करतात.

दुसर्‍या दिवशी म्हणजे अश्‍विन वद्य चतुर्दशीला नरकचतुर्दशी असते. पहाटेला नरकासुर-दहन केले जाते. दीपप्रज्वलन होते. त्यानंतर सूर्योदयापूर्वी अंगाला खोबरेल तेल, उटणं व सुवासिक साबण लावून उष्ण किंवा गरम पाण्यानं स्नान केलं जातं. पूर्वीच्या काळी पाणी गरम करण्यासाठी मोठे-मोठे हंडे असायचे. झेंडूच्या फुलांची व आंब्याच्या पानांची माळ घालून, हंडीवर शाडूने वेलबुट्टीसारखी कलाकुसर करून चुलीवर पाणी गरम करण्याची प्रथा गोव्यात होती. खेड्यापाड्यांतून आजही ही प्रथा सुरू आहे. परंतु शहरी जीवनाची सवय झालेल्या आणि फ्लॅट, बंगल्यांमध्ये राहणार्‍यांना गिझरशिवाय पाणी गरम करता येत नसल्यामुळे अनेकजण आपल्या सोयीनुसार या प्रथेला फाटा देत असतात.

अभ्यंगस्नानानंतर घराच्या दाराबाहेर ‘कारीट’ फळ पायाच्या अंगठ्याने फोडून ‘प्रतिकात्मक नरकासुरा’चा वध केला जातो. घरातील सुवासिनी पुरुषमंडळीचे पाय धुवून अत्तराचे फवारे अंगावर मारतात आणि मग दृष्ट काढून पंचारतीनं ओवाळतात. त्यानंतर घरातील गृहिणींनी तयार केलेले विविध प्रकारचे पोहे देवाला नैवेद्य म्हणून दाखवले जातात. काही लोक गावातील मंदिरांतील देवलाही ते अर्पण करतात. त्यानंतर कुटुंबीयांसहित व आपल्या मित्रमंडळीसमवेत त्यांचे सेवन करतात. हाच आपला दिवाळीचा दिवस असतो.

तिसर्‍या दिवशी म्हणजे आश्‍विनी अमावास्येला लक्ष्मीपूजन होते. अनेकदा पंचांगातील तिथीनुसार दीपावली दिवशीच लक्ष्मीपूजन असते. या दिवशी प्रदोषकाळी लक्ष्मी, विष्णू व इतर इष्ट देवतांचे पूजन केले जाते. गोव्यात व महाराष्ट्रात व्यापारीवर्ग सूर्यास्तानंतर स्वतः किंवा ब्राह्मणाच्या साक्षीने लक्ष्मीपूजन व हिशेबाच्या वह्यांचे पूजन करतात. त्यानंतर अनेक व्यापारी व त्यांची मित्रमंडळी इतर व्यापार्‍यांच्या दुकानी किंवा आस्थापनांमध्ये जाऊन शुभेच्छा देतात. म्हापसा बाजारपेठेसारख्या ठिकाणी तर अनेकजण भेटी देत असतात. त्यांत सर्वसामान्य माणसेही असतात. लाह्या, चिरमुरे, पेढे, बत्तासे, लाडू, फळे आदी आस्थापनामध्ये आलेल्यांना लक्ष्मीपूजनानिमित्त प्रसाद म्हणून दिले जाते. तत्पूर्वी दुकानांची व आस्थापनांची साफसफाई, रंगरंगोटी केली जाते. आश्‍विनी अमावास्येच्या तिन्हीसांजी लक्ष्मीचा सर्वत्र संचार असतो असे मानले जाते. ज्या घरात स्वच्छता, मांगल्य आहे व घरातील वा आस्थापनातील मालकवर्ग व महिलावर्गामध्ये चरित्र, कर्तव्य, संयम, धर्मनिष्ठा, देवभक्ती आदी गुण आहेत तेथे लक्ष्मी वास्तव्य करते असा एक समज आहे.

दिवाळीत आकाशदीप लावण्याची प्रथा फार पूर्वीपासून आहे. आश्‍विन शुद्ध एकादशीपासून कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंत उंचावर आकाशदिवे लावले जातात.

त्यानंतर येते कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे बलिप्रतिपदा. या दिवशी बळीची पूजा करून मद्य-मांसाचा नैवेद्य दाखवला जातो. हा विक्रम संवताचा वर्षारंभ दिवस. याला दिवाळीचा पाडवा म्हणतात. अनेकदा लक्ष्मीपूजनाऐवजी काहीजण या दिवशी हिशेबाच्या वहीचे पूजन करतात. काही ठिकाणी या दिवशी गाई-गुरांची पूजा केली जाते. ही प्रथा गोव्यात कुठे प्रचलित असल्याचे माझ्या ऐकिवात नाही.

गेल्या कित्येक वर्षांपासून महाराष्ट्रात आणि गोव्यात कार्तिक शुद्ध द्वितीयेला ‘भाऊबीज’ साजरी केली जाते. या दिवशी भाऊ आपल्या बहिणीच्या घरी भेट देऊन एखादी वस्तू भेट म्हणून प्रदान करतो आणि बहिणीप्रति आपले प्रेम व्यक्त करतो. गोव्यात किंवा महाराष्ट्रातही भाऊबीज याच दिवशी साजरी करतात असे नव्हे. आजच्या धकाधकीच्या जीवनात दिवाळीनंतर आपणास सोयिस्कर अशा दिवशी हा सण साजरा केला जातो. परंतु गेल्या काही वर्षांत ‘रक्षाबंधना’च्या सणामुळे भाऊबीजेच्या सणाचे महत्त्व थोडेफार कमी होत चालले आहे हे नाकारून चालणार नाही.

आपल्या भारत देशात सर्वत्र दीपोत्सवाचे स्वरूप सर्वसामान्यपणे सारखेच आहे असे वाटते. आपल्या देशाची वैविध्यपूर्ण रचना, विविध भाषा, संस्कृती, रीती-रिवाज, राहणी आदी गोष्टी ध्यानी घेता दिवाळी सण साजरा करण्यात जरी थोडंफार वैविध्य असलं तरी घराची नव्याने स्वच्छता, रंगरंगोटी, फुलांच्या माळा व तोरण, पताका, झेंडे, आकाशदीप, दीपप्रज्वलन, अंगावर नवीन वस्त्रे व अलंकार लेवून एकमेकांच्या घरी जाणे आणि संपूर्ण दिवस आनंदात घालवणे याच गोष्टी या दिवसांत घडत असतात.

दीपावलीचा हा उत्सव वेगवेगळ्या राज्यांत वेगवेगळ्या नावाने साजरा केला जात असला, या सणाला नावं निरनिराळी असली, देवदेवतांची नावं थोडीफार वेगळी असली, आख्यायिकांचे संदर्भ भिन्न असले तरी या सणामागची भावना, मांगल्य, विचारधारा, आनंदी वातावरण मात्र एकच असते. भाषेअभावी विविध प्रदेशांमध्ये साजर्‍या केल्या जाणार्‍या दीपोत्सवाचे संपूर्ण वर्णन करणे अशक्य आहे. गोमंतकाचे सुपुत्र भारतीय संस्कृतीचे गाडे अभ्यासक कै. महादेवशास्त्री जोशी संपादित भारतीय संस्कृतीकोशाच्या चौथ्या खंडामध्ये ‘दीपावली’ आध्याक्षराच्या रकान्यात या उत्सवाची सर्व माहिती दिलेली आहे. जिज्ञासू वाचकांनी ती वाचल्यास त्यांना दीपावलीचे पौराणिक महत्त्व तसेच राज्यस्तरीय रीती-रिवाजांचे व हा सण साजरा करण्यामागचे नेमके कारण मिळू शकेल.

नरकचतुर्दशीसंबंधी आपल्या पुराणात एक आख्यायिका सांगितली आहे. प्राग्‌ज्योतिषपुराचा राजा नरकासुर याला भूदेवीकडून वैष्णवास्त्र प्राप्त झाल्यामुळे तो मातला आणि देवादिकांना त्रस्त करू लागला. वेगवेगळ्या राज्यांतील काही राजांना आणि सोळा हजार राजकन्यांना पकडून आणून त्याने आपल्या बंदिखान्यात ठेवले. त्यामुळे नरकासुराच्या या अत्याचाराने गांजलेल्या, पिडलेल्या लोकांनी राजा इंद्राला साकडे घातले. मग इंद्राने श्रीकृष्णाला प्रार्थना करून नरकासुराच्या जाचातून रयतेला सोडवण्याची विनंती केली. श्रीकृष्णाने नरकासुरावर स्वारी करून त्याला ठार केले व बंदीत असलेल्या सोळा हजार राजकन्यांची सुटका केली. म्हणूनच आजही गोव्यात नरकासुराला श्रीकृष्ण ठार करीत असल्याचे नरकासुर प्रतिमा दहनावेळी दाखवले जाते. काही ठिकाणी प्रभू रामचंद्र यांनी वनवास संपवून अयोध्येला पुनरागमन केले त्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी दीपोत्सव साजरा करतात व ती प्रथा आजही सुरू आहे.

दानशूर आणि प्रजाहितदक्ष पण बलाढ्य बळीराजाने आपल्या सामर्थ्याने देवांचे राज्य जिंकले व देवांना आणि लक्ष्मीला बंदिवासात टाकले. तेव्हा विष्णूने वामनावतार घेऊन बळीराजाला पाताळात दडपले. नंतर वामनाने बळीराजाने लोककल्याणासाठी मागितलेला ‘जो कोणी आश्‍विन वैद्य त्रयोदशी ते अमावास्येपर्यंत तीन दिवस यमाप्रीत्यर्थ दीपदान करील त्याला यमयातना भोगाव्या लागू नयेत आणि त्याच्या घरात लक्ष्मीचे निरंतर वास्तव्य राहील’ वर दिला. अशा अनेक आख्यायिका आपल्या पुराणात सांगितलेल्या आहेत.

आपल्या गोव्यात जरी सर्व सणांमध्ये श्रीगणेशचतुर्थीचा उत्सव लोकप्रिय असला तरी दिवाळीही तितक्याच उत्साहाने आपण साजरी करीत असतो. मग तो शेतकरी असो, कामगार असो, नोकरदार असो, व्यापारी असो किंवा उद्योगपती असो- सारेच जण आपण कमावलेल्या कमाईचा उपयोग या सणाचा आनंद लुटण्यासाठी करतात. सोन्या-चांदीच्या दागिन्यांची व नवीन कपड्यालत्त्यांची खरेदी करून हा मंगलमय उत्सव साजरा करतात. कारण या सणानिमित्ताने आपणास लक्ष्मीचा वरदहस्त प्राप्त होतो आणि आपले जीवन सुखी, समाधानी, आनंदी आणि भरभराटीचे होते अशी त्यांची भावना असते.

यंदाची दिवाळी साजरी करताना महागाई, खाणबंदीमुळे कोसळलेली बेकारीची कुर्‍हाड आणि ट्रकबंदी व इतर जोडधंद्यांवर झालेला खाणबंदीचा परिणाम यामुळे गोमंतकीय नागरिकांमध्ये पूर्वीचा उत्साह असणार नाही हेही तितकेच खरे! परंतु गोमंतकीय हा उत्सवप्रिय आहे. एनकेन प्रकारेण आणि काटकसरीने का होईना तो दिवाळीचा सण पूर्वीइतकाच उत्साहाने साजरा करण्याचा प्रयत्न करील याबद्दल कुणाच्याही मनात संदेह असण्याचे कारण नाही. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे, आजही युवक मंडळी व मुलं नरकासुर प्रतिमा व आकाशदीप तयार करण्यात दंग आहेत. वडीलधारी मंडळी बाजारहाटीमध्ये गुंतली आहे. कपड्यालत्त्याच्या दुकानांतून गर्दी दिसतेच आहे. खाणी पुन्हा सुरू होतील या आशेनेच हे सारे चालले असावे असे वाटते.

आपल्या भारत देशात अनेक सण-उत्सव साजरे केले जातात. बहुतेक सण-उत्सवांना धार्मिक पार्श्‍वभूमी आहे. धर्मपालनाची संस्कृतीशी आणि परंपरांशी सांगड घालत आपण हे सण साजरे करीत असतो. धर्माच्या बाबतीत मानवीमनाची अतिसंवेदनशीलता आपल्या वैयक्तिक व सामाजिक जीवनाच्या विकासात अडथळा आणीत असल्याची अनेक उदाहरणे आपल्या पुढ्यात आहेत.

दीपावली सणाच्या कथा आणि आख्यायिका सांगितल्या जातात. या कथा आणि आख्यायिकांचे आपण वस्तुनिष्ठ विश्‍लेषण केले तर अशा अघटित आणि अशक्यप्राय घटना डोळ्यांसमोर ठेवून सण साजरे करताना आपण खरोखरच संस्कृतीचे आणि धर्माचे रक्षण करतो आहोत का याचा विचार प्रत्येकाने आपल्या परीने करावयास हवा असे मला प्रामाणिकपणे वाटते. वास्तविक पाहता दिवाळीसारखे सण साजरे करताना वाड्यावाड्यांवर हजारो रुपये खर्च करून केल्या जाणार्‍या नरकासुरांच्या प्रतिमा, त्यांच्या मिरवणुकांसाठी केला जाणारा पैशांचा चुराडा, आपल्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांना खूश करण्यासाठी हजारो रुपयांची पारितोषिके जाहीर करीत राजकारण्यांकडून दिले जाणारे प्रोत्साहन, वीजरोषणाईवर केला जाणारा खर्च आणि विजेचा अपव्यय आणि एकूणच अनाठायी खर्च आजच्या आधुनिक काळात टाळता येणे शक्य असून ते कशाप्रकारे साध्य करता येईल याचा प्रत्येकानेच विचार करण्याची वेळ आली आहे. या सर्व सण-उत्सवांचा धनदांडगे, सत्ताधारी, विरोधक, धर्मांध आपल्या स्वार्थासाठी उपयोग करून घेण्याचा प्रयत्न करीत असतात. सर्वसामान्य माणसाला आपल्याकडे आकर्षित करून घेण्यासाठी अशा विविध क्लृप्त्या ते लढवत असतात हेही आपण जाणून घेतले पाहिजे. आजचं सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक, प्रशासकीय क्षेत्र पूर्वीसारखं साधं-सरळ राहिलेलं नाही, ते हवं तेवढं सुखावही नाही, हे आज दिल्लीपासून गल्लीपर्यंत सर्वचजण मान्य करतात. परंतु ‘कळतं पण वळत नाही’ हेच खरं!

राजकारणात असूनही हे सारं खुलेआम लिहावं लागतं याचं दुःख आहेच, परंतु जे सत्य आहे ते कधीही लपून राहत नसते, ही खूणगाठ आपण आजच्या या निमित्ताने मनाशी बांधूया! दरवर्षीप्रमाणे ‘तमसो मा ज्योतिर्गमय’ या सुभाषितानुसार ‘मला अंधारातून प्रकासाकडे ने’ अशी प्रार्थना असहाय्यपणे त्या जगनियंत्याकडे करण्यापलीकडे आपण काहीही करू शकत नाही हेच खरे!

पृथ्वीच्या जन्मापासून कालप्रवाह अखंडितपणे सुरू आहे. वैज्ञानिकांनी कोणतीही भाकितं केली तरी तो यापुढेही सुरूच राहणार आहे. माणसाचे प्रकाशाशी आणि अंधाराशीही सृष्टीच्या उत्पत्तीपासून नाते आहे. अवकाशाला गवसणी घालण्याचे, त्याला आपल्या कवेत घेण्याचे प्रयत्न जिज्ञासू मानवाने आजपर्यंत सतत चालवले आहेत आणि यापुढेही हे प्रयत्न असेच सुरू राहणार आहेत. माणूस ज्ञानसंपन्न होत आहे, परंतु या ज्ञानाचा उपयोग मानवी जीवनाचा विकास करण्याबरोबरच काही माथेफिरूंच्या अमानुष उपद्व्यापांमुळे धोक्यातही येऊ पाहत आहे. मानवी जीवन आपल्या अथक प्रयत्नांनी प्रकाशाच्या दिशेने झेपावत असतानाच ‘अंधाराचे पुजारी’ मात्र या उत्तुंग झेपेच्या वाटेत दडपशाही, दुराचार, अत्याचार, अधर्म, अमांगल्य, दहशतवाद यांची कृष्णछाया पसरविण्याचा प्रयत्न करीत आहेत. एका नरकासुराचा वध श्रीकृष्णाने करून मानवी जीवनात प्रकाश पसरवला. वाटलं अंधार फिटून आता प्रकाशच प्रकाश पसरणार. परंतु आजची स्थिती पाहता नरकासुर अजून संपलेला नाही. उलट आज अनेक नरकासुर विविध रूपांत वावरताहेत. या नव्या नरकासुरांचा उपद्रव अजूनही मानवी जीवनाला सतावतो आहे. त्यांचा आसुरी हव्यास वाढत चालला असून भ्रष्टाचाराचे आणि दहशतवादाचे नवनवे असुर सर्वसामान्य माणसाला त्रस्त करीत आहेत. मानवी प्रवृत्तीमधील अंधाराला हटवण्याचे, मांगल्य रुजवण्याचे, माणसाच्या जीवनाला जगण्याचा अर्थ देणारे, सर्वसामान्यांच्या जीवनात प्रकाश आणण्याचे सामर्थ्य, मिणमिणत्या का असेना, पण शेकडो कोटी जनतेच्या हातातील पणत्यांमध्ये आहे. ज्याचे रूप धगधगत्या प्रकाशमान मशालीमध्ये आहे हे आपण आज विसरलो आहोत का?

देशाच्या स्वातंत्र्याची मशाल बापूजींनी अशीच नाही का पेटवली आणि स्वातंत्र्याचा प्रकाश भारतीय जनतेच्या जीवनात पसरवला. आजच्या बदलाच्या संदर्भात प्रार्थना करावीशी वाटते की या दिवाळीच्या निमित्ताने प्रकाशाच्या पुजार्‍यांनी पेटवलेल्या हजारो मशालींच्या उजेडात आणि त्यांच्या धगीत आसमंतात पसरलेला आणि अवकाशालाही गवसणी घालू पाहणारा अंधार नष्ट व्हावा. माणसांच्या प्रवृत्तीतील आसुरी वृत्तीचे दहन व्हावे आणि मांगल्याचा, सदाचाराचा, सद्विवेकाचा, सामंजस्याचा प्रकाश प्रत्येकाच्या जीवनात परावर्तित व्हावा. खर्‍या अर्थाने हा दिवाळीचा सण यापुढेही मानवी जीवनात उजेड आणि प्रकाश निर्माण करणारा असावा हीच मनिषा आणि प्रार्थना! दीपावलीच्या आपणा सर्वांस हार्दिक शुभेच्छा!