– विष्णू सूर्या वाघ
(भाग-५)
अखंड मेहनत आणि अपार परिश्रम यांच्या बळावर केसरबाईंनी संगीतातील आपले श्रेष्ठत्व सिद्ध केले. अंत्रुज महालातील केरी गावात जन्मलेली एक मुलगी संगीतासाठी परिश्रमांचे पहाड उचलीत महानगरी मुंबईतील सर्वश्रेष्ठ गायिका बनली. हे जे असामान्य यश त्यांना लाभले ते अर्थातच सहजसाध्य नव्हते. खुद्द केसरबाईंनीच एके ठिकाणी असं म्हटलंय-
‘‘कोणत्याही कलेची अविश्रांत सेवा कधी ना कधी जनमानसात रूजू होतेच. मला जे काही यश प्राप्त झालेय त्यात योगायोगाचा बिलकुल भाग नाही. माझ्या यशाचा वाटा प्रामुख्याने तीन गोष्टींकडे जातो. एक म्हणजे, मुंबईतील एका संगीतप्रेमी- धनाढ्य गृहस्थाचा पाठिंबा, सहकार्य आणि सहानुभूती! दुसरी म्हणजे, पोटच्या मुलीप्रमाणे मानून खॉंसाहेबांनी कळकळीनं दिलेलं शिक्षण- की जे देताना त्यांनी फार फार तसदी घेतली. आणि तिसरी गोष्ट म्हणजे, त्यांच्यावरील माझी भक्ती आणि मी केलेली मेहनत. यांव्यतिरिक्त कुठल्या गोष्टीचा वाटा माझ्या यशात असल्यास मला ठाऊक नाही.’’
केसरबाईंच्या अशा दिव्य साधनेमुळेच आमची संगीत कला बहरली हे लक्षात ठेवायला हवे. ज्या काळात संगीतावरील लिपीचा आजच्याइतका प्रचार नव्हता, ध्वनिमुद्रणासारखी साधनं उपलब्ध नव्हती, त्या काळात केवळ गुरुमुखाशिवाय ही कला जिवंत राहण्याचा दुसरा कोणताही मार्ग नव्हता, अशा काळात केसरबाईंनी शेकडो नव्हे तर हजारो चीजा व शेकडो राग संथेप्रमाणे जतन केले आणि हे अनुपम भांडार संगीत रसिकांसमोर खुले केले.
अल्लादियाखॉंसाहेबांनी केसरबाईंना जयपूर-अतरौली घराण्याच्या गायकीची देणगी दिली. या घराण्याच्या गायकीबाबत एका गोष्टीचा उल्लेख करणे आवश्यक आहे. तो असा की, ही गायकी गाणार्या कलावंताची प्रत्यक्ष संगीतसाधना, भरपूर शिक्षण व रियाज यांनी समृद्ध झालेली असली पाहिजे. इतर घराण्यांची गायकी गाणार्या कलावंताला ती ज्या प्रमाणात अवगत झालेली असेल, त्या प्रमाणात तरी ती श्रोत्यांचे थोडेफार मनोरंजन करू शकते. परंतु अल्लादियाखॉंसाहेबांच्या गायकीचे तंत्र मात्र याच्या अगदी उलट आहे. कलावंताची कलासाधना अपुरी झाली असेल तर अशा अर्धवट सामग्रीवर त्यांची मैफल यशस्वी होण्याची शक्यता जवळपास शून्यच. एका विशिष्ट तपश्चर्येनंतरच या गायकीच्या अपेक्षित परिणामाची खात्री असते. केसरबाईंचे गाणे असरदार व परिपूर्ण होऊ लागले त्यामागे हीच दीर्घ तपश्चर्या होती. त्यांना स्वतःलाही याची पूर्ण जाणीव होती. म्हणून एका मुलाखतीत त्या असं म्हणाल्या होत्या-
‘‘आज जेव्हा मी अर्ध्या हळकुंडानं पिवळ्या झालेल्या आणि येत आहे त्यातच समाधान मानणार्या गायकांचं गाणं ऐकते तेव्हा माझ्या पुरातन आणि श्रेष्ठ गायनकलेचं या देशात काय होणार, हा विचार माझ्या मनाला अस्वस्थ करतो.’’
एखादी व्यक्ती प्रसिद्ध झाली, तिला लोकमान्यतेचे वलय लाभले म्हणजे त्या व्यक्तीबद्दलची चर्चा समाजात जाहीरपणे होऊ लागते. या चर्चेतून अनेक प्रवादही पसरवले जातात. केसरबाईंबद्दल त्यांच्या हयातीत असे अनेक प्रवाद पसरवले जात होते. त्या केवळ धनिकांसाठीच गातात, अमुक बिदागी घेतल्याशिवाय त्या बैठकीला येण्याचे आमंत्रणच स्वीकारत नाहीत, आपलं गाणं त्या कुणाला शिकवू इच्छित नाहीत, रसिकांची फर्माईश त्या कधीच पूर्ण करीत नाहीत, आपल्याशी स्पर्धा करतील या भयानं समकालीन गायिकांना त्या जवळही करीत नाहीत अशा नाना गोष्टी त्यांच्याबद्दल बोलल्या जात होत्या. त्यात किती तथ्य होते हे एकाच घटनेवरून सिद्ध होईल.
हिराबाई बडोदेकर या किराणा घराण्याच्या श्रेष्ठ गायिका. खॉंसाहेब अब्दुल करीम खॉं व त्यांचे भाचे उस्ताद अब्दुल वहिदखॉं यांच्या गायकीचे संस्कार त्यांच्यावर झाले. हिराबाईंच्या मातोश्री ताराबाई माने कोल्हापूरला राहत होत्या तेव्हा लहान वयात त्यांच्या घरी राहून केसरबाई अब्दुल करीम खॉंसाहेबांकडे गाणं शिकल्या होत्या. केसरबाईंचा जन्म १८९३ सालचा. हिराबाई जन्मल्या १९०५ साली. दोघींच्या वयात बारा वर्षांचं अंतर. १९२० साली हिराबाईंनी वहिदखॉंसाहेबांचा गंडा बांधला. यावेळपर्यंत केसरबाईंचं नाव सर्वतोमुखी झालं होतं. एकीकडे हिराबाई ‘स्ट्रगल’ करीत होत्या तर दुसरीकडे केसरबाईंना हिंदुस्थानच्या कानाकोपर्यांतून मोठमोठ्या संमेलनांची निमंत्रणं येत होती. कोलकातामधील एका ख्यातनाम म्युझिक कॉन्फरन्ससाठी केसरबाई अधूनमधून जात असत. ‘आमच्या संमेलनात आणण्याजोगी एखादी उदयोन्मुख गायिका तुमच्या पाहण्यात आहे का?’ असा प्रश्न एक दिवस या संमेलनाच्या आयोजकांनी केला. ताबडतोब केसरबाईंनी त्यांना हिराबाईंचे नाव सुचवले. इतकेच नव्हे तर त्या स्वतः हिराबाईंना घेऊन कोलकात्याला गेल्या. हिराबाईंच्या हाताला धरून त्यांना व्यासपीठावर घेऊन आल्या आणि आपणहून त्यांना बैठकीवर बसवलं. हिराबाईंची ही पहिलीच जाहीर मैफल होती आणि केसरबाई या पहिल्यावहिल्या मैफलीच्या प्रणेत्या होत्या.
केसरबाई इतर प्रतिभावंत गायिकांना पुढं येऊ देत नव्हत्या हा आरोप किती पोकळ व बिनबुडाचा होता हे या एकाच घटनेवरून लक्षात येईल.
केसरबाईंच्या रसिकतेची साक्ष देणारी अशीच आणखी एक आठवण. १९३३ सालच्या जुलै महिन्यात एका रविवारी दुपारी ‘नाट्यमन्वंतर’ या संस्थेचं प्रचंड गाजलेलं नाटक ‘आंधळ्यांची शाळा’ रिपन थिएटरमध्ये चालू होतं. नव्या धाटणीचं संगीत असलेल्या या नाटकानं त्यावेळी बरीच खळबळ उडवून दिली होती. या नाटकाचा प्रयोग पाहायला त्या दिवशी केसरबाई मुद्दामहून आल्या होत्या. कधी न येणारी माणसं थिएटरमध्ये दिसली की साहजिकच प्रेक्षकांचं लक्ष त्यांच्याकडं वारंवार जात राहतं, तसंच त्या दिवशी झालं. प्रेक्षकांत केसरबाई बसल्याहेत या जाणिवेनं नाही म्हटलं तरी ज्योत्स्नाबाईंच्या मनावर थोडं दडपण आलंच होतं (ज्योत्स्नाबाई म्हणजे ज्योत्स्ना भोळे). नाटकात त्यांची प्रमुख भूमिका होती.
नाटक सुरू झालं. सुरुवातीपासूनच ज्योत्स्ना भोळे व केशवराव दाते या जोडीनं नाटकात रंग भरला. इतक्यात ‘बिंबा, माझी ती आवडती कविता म्हण. एकदाच म्हण. तू आता लग्न झाल्यावर सासरी गेलीस म्हणजे मी वारंवार थोडाच सांगणार आहे तुला गाणं म्हणायला?’ असं म्हणत मनोहर बनलेल्या दात्यांनी बिंबाला विनवलं. बिंबानं ती आवडती कविता ‘एकलेपणाची आग लागली हृदया’ आपल्या गोड व सुरेल आवाजात म्हणायला सुरुवात केली. पिलू रागातील ते गोड भावगीत ज्योत्स्नाबाईंनी प्राण ओतून अशा पद्धतीनं गायलं की प्रेक्षागृहामधील श्रोत्यांची काळजं हेलावली. कवितेचे चरण फारच उंच स्वरांवरून तरंगत तरंगत वातावरणात पसरले. केसरबाई तर या भावगीताशी एवढ्या तद्रूप झाल्या की त्यांच्या डोळ्यांमधून घळघळ अश्रुधारा वाहू लागल्या. त्याच भावविभोर अवस्थेत त्यांनी नाटक संपल्यावर प्रेक्षागृहात जाऊन ज्योत्स्नाबाईंना आशीर्वाद दिला.
एक मात्र खरे की दीर्घकाळची मेहनत व तपश्चर्या यामुळं केसरबाईंच्या व्यक्तिमत्त्वात एक प्रकारचा भारदस्तपणा आला होता. उथळ, वरपांगी असं काहीही त्यांना खपत नव्हतं. या वृत्तीमुळे त्यांचा स्वभाव करारी झाला. किंचित सडेतोडही बनला. चांगलं ते चांगलं, वाईट ते वाईट असं तोंडावर सांगण्याची त्यांची पद्धत होती. बहुधा यामुळंच त्यांच्याबाबतीत अनेक गैरसमज पसरले व पसरवले गेले. केसरबाई आपल्या गाण्याबद्दल आग्रही होत्या. संगीताचा शुद्ध अभ्यास करणारे विद्यार्थी आणि संगीताची आस्था असलेले रसिकश्रोते यांचीच तेवढी त्या कदर करीत. आपली मान्यता घेतल्याशिवाय कोणीही त्यांच्या मैफलीचं रिकॉर्डिंग केलं तर त्यांना राग यायचा. विचारल्यावाचून कोणीही फोटो क्लीक केला तरी त्यांच्या संतापाचा पारा चढायचा.
आजचे अनेक गायक गायला बसण्यापूर्वी श्रोत्यांचा कल काय ऐकण्याकडे आहे याचा आधी अंदाज घेतात व मगच गायला प्रारंभ करतात. थोडक्यात श्रोता ज्या पातळीवरचा असेल त्या पातळीवर ते आपलं गाणं घेऊन जातात. केसरबाईंनी असला प्रकार कधी केला नाही. ‘तुम्ही मला गायला बोलावताय ना? मग मी गाईन तेच तुम्ही ऐकलं पाहिजे. तुम्हाला हवं ते मी गाणार नाही,’ असं त्या आमंत्रण स्वीकारण्याआधीच सांगायच्या. प्रत्यक्ष मैफलीत अशी फर्माईश कुणी केलीच तर तिथल्या तिथं जाहीरपणे त्या इसमाची केसरबाई अशी संभावना करायच्या की तो बिचारा वरमून गप्पच बसे.
एकदा अशीच त्यांची मैफल एके ठिकाणी चालू होती. मैफलीत एक वृद्ध शेठजीबुवा बसले होते. ख्याल ऐन रंगात आला असतानाच या शेठजींनी ‘ठुमरी’ची फर्माईश केली. केसरबाईंनी तिथल्या तिथं त्यांना फटकारलं, ‘‘शेठजी, माझे ठुमरी गायचे दिवस आता मागे पडले आणि तुमचे ठुमरी ऐकायचेही वय आता राहिले नाही. ठुमर्या कसल्या ऐकताय? भजनं ऐका. त्या देवाला तरी बरं वाटेल!’’ बिचार्या शेठजींचा चेहरा फोटो काढण्यासारखा झाला!
कोलकात्याचे शेठ लाला दुनीचंद हे एक प्रचंड संगीतप्रेमी गृहस्थ. प्रारंभीच्या काळात याच शेठजींनी केसरबाईंची मैफल कोलकात्यात घडवून आणली होती. कोलकात्यातील म्युझिक फेस्टीवलसाठी न चुकता त्यांचं केसरबाईंना आमंत्रण असेच. अशाच एका संगीतसभेसाठी त्यांनी केसरबाईंना बोलावले होते. एका सत्रात एक प्रसिद्ध गायिका बसली होती. केसरबाई तिचं गाणं ऐकायला बसल्या. गायिका नामवंत होती खरी, पण नीट रियाज केला नव्हता की काय कोणास ठाऊक, अधूनमधून तिचा आवाज बेसूर लागू लागला. भरीत भर म्हणून ती आपण निवडलेल्या चीजेमधील दोनच शब्द वारंवार गाऊ लागली-
‘रसियाऽऽ आवोऽऽ नाऽऽ’
गायिकेची गाडी ‘रसिया आवोऽ’वर अडकली ती थांबेच ना. पुन्हा पुन्हा ‘रसिया आवोऽऽ रसिया आवोऽऽ’ ऐकून रसिक कंटाळले. तिचं बेसुरं गाणं केसरबाईंनाही ऐकवेना. त्या तडक बैठकीतून उठल्या व बाहेर जायला निघाल्या. शेठ लाला दुनीचंद धावत धावत पाठोपाठ आले. ‘‘बाईजी रुकीये ना… कहॉं चली आप?’’
त्याक्षणी केसरबाई फणकारल्या, ‘‘कहॉं मतलब? सुनते नहीं ओ बाईजी क्या चिल्ला रही है? कहती है- ओ रसिया आवो, रसिया आवो! लगता है उसका रसिया कहीं खो गया है| उसे ढुँढने जा रही हूँ|’’
अशीच एका संस्थानात केसरबाईंची मैफल चालली होती. मध्येच एका श्रोत्याने ‘बाई, आता नाटकातली गाणी ऐकवा’ अशी मागणी केली. केसरबाई करारी नजरेनं त्या माणसाकडं पाहत उद्गारल्या- ‘‘मी मैफलीत गाते ते फक्त माझ्या गुरुजींनी शिकवलेलं गाणं. जयपूर घराण्याचं शुद्ध शास्त्रीय संगीत. नाटकातली गाणी गायचं शिक्षण मी घेतलेलं नाही. ज्या गोष्टीचं मला ज्ञान नाही त्या गोष्टीच्या वाटेला मी कधी जात नाही. ज्यांना नाट्यसंगीत ऐकायचं असेल त्यांनी माझ्या मैफलीला येऊ नये. माझा पेटीवाला नाट्यसंगीत फार छान म्हणतो. हवं तर त्याला बोलावून त्याची मैफल ठेवा!’’
आपल्या गाण्याबद्दल असा कडवा अभिमान बाळगणार्या या गानसम्राज्ञीने १९३६ साली मात्र महान कविराज रवींद्रनाथ टागोर यांच्यासाठी आपला सारा बडेजाव व दबदबा बाजूला सारून शांतिनिकेतनमध्ये आपली मैफल केली!
१९३८ सालच्या एप्रिल महिन्यात कोलकात्यातील नागरिकांनी केशरबाईंना मानाचं आमंत्रण दिलं होतं. गायनाबरोबरच त्यांच्या नागरी सत्काराचाही कार्यक्रम तिथं आखण्यात आला होता. गाण्याच्या बैठकीची तयारी झाली. मोठे विद्वान, पंडित, रसिक, कलाकार, गायक, वादक, लोकनेते, उद्योगपती सगळे जमले. शांतिनिकेतनचे संस्थापक गुरुदेव रवींद्रनाथ टागोर स्वतः येऊन पहिल्या रांगेत बसले. रवींद्रनाथ हे जगन्मान्य कवी, लेखक, नाटककार. एवढंच नव्हे महान चित्रकार व संगीतातील महातज्ज्ञ. परंपरेचा धागा पुढं नेत स्वतःच्या रवींद्र संगीताची निर्मिती करणारा हा महान ज्ञानयोगी त्या दिवशी केसरबाईंना ऐकण्यासाठी दस्तुरखुद्द उपस्थित होता. केसरबाईंचं वय त्यावेळी होतं ४५ वर्षं तर गुरुदेव होते ६९ वर्षांचे. एका महान कलाकारासाठी स्वरांचे चांदणे पसरायचे आहे या भावनेने केसरबाई त्या मैफलीत गायल्या. पु. ल. देशपांडे यांनी त्या अपूर्व मैफलीचं वर्णन करताना म्हटलंय-
‘‘ज्याचं सारं व्यक्तिमत्त्व सुरांनी भरलेलं असा महाकवी श्रोता आणि तपःपूत स्वरांनी अंतर्बाह्य प्रज्वलित झालेली अशी ही महान कलावती गायिका. प्राचीन काळातील पुराणकार म्हणाले असते की त्या समयी देवांनी स्वर्गातून पुष्पवृष्टी केली.’’ खरोखर, देवांनी पृष्पवृष्टीच करावी असा तो सोहळा होता. गांधर्वी सुरांच्या त्या मखमली मैफलीनं रवींद्रनाथ विलक्षण आनंदित झाले. त्या आनंदाच्या क्षणी त्यांनी केसरबाईंना ‘सूरश्री’ म्हणून संबोधले!
केसरबाईंचा सत्कार करताना त्या समारंभात रवींद्रनाथांनी काढलेले उद्गार असे आहेत-
‘‘केसरबाईंचं गाणं ऐकण्याची संधी मला मिळाली हे मी माझं भाग्य समजतो. हे गाणं म्हणजे अप्रतिम परिपूर्णतेचा एक कलात्मक चमत्कार आहे. त्यांच्या आवाजातील जादू, विविध प्रकारच्या स्वरभेदांनी संगीतातील वैशिष्ट्ये दाखवण्याचे कसब आणि तेही केवळ तंत्राला शरण जाऊ नव्हे किंवा यांत्रिक अचूकपणाने किंवा पढीकतेच्या प्रदर्शनानं नव्हे. संगीतातला हा चमत्कार प्रकट करणं जन्मजात प्रज्ञावंतांना- जिनियसनाच शक्य असतं हे त्यांनी पुन्हा पुन्हा सिद्ध करून दाखवलं आहे. आज संध्याकाळी या अनमोल अनुभूतीची संधी दिल्याबद्दल केसरबाईंना माझे धन्यवाद आणि आशीर्वाद!’’
रवींद्रनाथांनी स्वहस्ते दिलेलं हे गौरवपत्र चांदीच्या चौकटीत घालून केसरबाईंनी शेवटपर्यंत जतन करून ठेवलं. त्यांच्या आयुष्यातील तो सर्वोच्च बहुमान होता!
रवींद्रनाथांनी केलेल्या या गौरवानंतर असे अनेक मानसन्मान केसरबाईंना प्राप्त झाले. कोलकात्याच्या संगीतप्रवीण संगीतानुरागी सज्जन सन्मान समितीने ‘सूरश्री’ ही पदवी २७ फेब्रुवारी १९४८ रोजी केसरबाईंना अर्पण केली. १९५३ साली संगीत नाटक अकादमीने तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समारोहात ‘प्रमुख आचार्या’ ही सनद बहाल केली. १९६९ साली महाराष्ट्र शासनानं ‘प्रथम राजगायिका’ हा बहुमानाचा पुरस्कार प्रदान केला. त्याच वर्षी भारतसरकारतर्फे ‘पद्मभूषण’ हा किताब त्यांना प्रदान करण्यात आला.
मैफलींच्या निमित्तानं केसरबाईंनी हिंदुस्थानभर प्रवास केला. त्यांनी थोर कलावंत ऐकले. श्रेष्ठ कलाकारांना आपलीही गायकी ऐकवली. नाना दरबारचा ऐश्वर्यवान पाहुणचार घेतला व पहिल्या प्रतीच्या गायिकेला मिळणारा दुर्लभ मानसन्मानही उपभोगला. गानकलेत संगीत सम्राट अल्लादियाखॉंसाहेबांचे नाव त्यांनी दुमदुमत ठेवले.
केसरबाईंची अखेरची जाहीर मैफल झाली १९६६ साली. २६ जून हा दिवस म्हणजे बालगंधर्वांचा जन्मदिवस. केसरबाईंना बालगंधर्वांचे गाणे फार आवडायचे. त्यांच्या गाण्याच्या रिकॉर्डस् त्या आवर्जून ऐकायच्या. याच दिवशी प्रख्यात साहित्यिक व संगीताचे मर्मज्ञ पु. ल. देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली केसरबाईंचा जाहीर सत्कार करण्यात आला. त्या दिवशी बाई गायल्या ती त्यांची शेवटची जाहीर मैफल होती. त्यानंतर त्यांनी जाहीर गाणे कधीच केले नाही. क्वचित काही उत्साही रसिक त्यांना एखादी मैफील सादर करण्यासाठी आमंत्रित करायचे. पण केसरबाई त्याच निग्रहाने उत्तर द्यायच्या- ‘‘माझ्या ऐन उमेदीत तुम्ही माझी सिंहगर्जना ऐकलीत… आता मांजराचं म्यांव म्यांव काय ऐकवू?’’ आपलं गायन सदैव उच्च पातळीवर रहावं याकडं त्यांचा कटाक्ष होता. सूरश्री केसरबाईंनी खास आपली अशी शिष्या तयार केली नाही, पण आपली परंपरा चालू राहावी म्हणून अखेरच्या क्षणी त्यांनी धोंडुताई कुलकर्णी यांना काही काळ तालीम दिली.
केसरबाई या फार व्यवहारी आहेत. त्यांचं अधिक लक्ष बिदागीवर असतं अशी टीका त्यांचे टीकाकार सदैव करायचे. पण त्याकाळातील संगीताचे एक आश्रयदाते अनंतराव शिरगावकर यांच्या कन्या कुंदा यांनी लिहून ठेवलेला एक अनुभव खरोखरच विलक्षण आहे. हा अनुभव त्यांच्याच शब्दांत ः
‘‘१९२७ साली माझ्या भावाच्या- दिलीपदादाच्या- जन्माप्रीत्यर्थ माझ्या वडिलांनी तीन नामवंत कलाकारांच्या मैफली ठेवल्या. मार्च महिन्यात रंगपंचमीस वझेबुवांची मैफल झाली. नंतर आठ दिवसांनी खास बडोद्याहून बोलावण्यात आलेल्या उस्ताद फैयाजखॉंचा जलसा झाला व सरते शेवटी आणखी आठ दिवसांनी केसरबाईंची अपूर्व मैफल झाली.
बिदागी चांगली घेऊनसुद्धा पुष्कळ कलावंत मैफलीत अंगचोरपणा करतात. पण मला हे प्रकर्षाने म्हटले पाहिजे की केसरबाई याला अपवाद होत्या. त्या घेतलेल्या पैशांचा पुरेपूर मोबदला गायनाच्या रूपात देत असत. परंतु माझ्या वडिलांनी आयोजित केलेल्या मैफलीत त्यांचा हा गुणविशेष जन्मभर स्मरणात राहावा एवढा दिसून आला व त्याबरोबरच बाईंच्या मनात माझ्या आईवडिलांविषयी केवढी आदरभावना होती तेही दिसून आले.
केसरबाईंच्या या मैफलीला पं. भातखंडे, डॉ. मोघे असे माझ्या वडिलांचे निकट स्नेही व गायनक्षेत्रातील अनेक ज्येष्ठ अधिकारी व्यक्ती तसेच धनिक शौकिन गुजराती, मारवाडी उपस्थित होते. रात्रौ नऊ वाजता सुरू झालेला हा जलसा केसरबाईंनी पहाटे चार वाजता सोहोनीतील ‘काहे अब तुम आये’ या मोहक चीजेनं संपवला व टाळ्यांच्या कडकडाटात तंबोरा खाली ठेवला.
इतका सुंदर प्रदीर्घ कार्यक्रम गेल्या कैक वर्षांत ऐकला नाही अशी तारीफ करीत पं. भातखंडे प्रभृती पाहुणे जीना उतरून गेले व आमच्या दिवाणखान्यात माझे आईवडील, भगिनी शैलाताई व लीलाताई, केसरबाई, तबलजी विष्णू शिरोडकर व सारंगिये मजीदखॉं एवढीच मंडळी राहिली.
तंबोर्याची गवसणी चढवता चढवता केसरबाई माझ्या पिताजींना म्हणाल्या- ‘माझ्या गायनाचे तुम्ही फार भोक्ते आहात तेव्हा माझी आजची लांबलचक मैफल ऐकून तुमचं पोट भरलं असेलच?’
यावर माझे वडील हसून उत्तरादाखल म्हणाले- ‘केसरबाई, तुमच्या गायनाचा मी इतका चाहता आहे की अजूनदेखील माझं पोट भरलं नाही.’
हे ऐकल्यावर केसरबाई मनापासून हसल्या व सारंगिया मजीदखॉंना म्हणाल्या, ‘बांधलेली सारंगी सोडा. मी आता या दोघांनाच गाणं ऐकवते!’ एवढं बोलून त्यांनी पुन्हा सोहोनी राग सुरू केला व पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ‘आता तुम्ही भरपूर विश्रांती घ्या. मीदेखील घरी जाऊन आराम करते’ असे सांगून ही अलौकिक मैफिल बरखास्त केली.
केसरबाईंनी आमच्या दादांना दिलेला हा प्रेमाचा नजराणा सदैव स्मरणात राहण्याजोगा होता!’’
याच कुंदा शिरगावकरांच्या वडीलभगिनी लीला शिरगावकर यांना खॉंसाहेब अल्लादियांकडून संगीताचे शिक्षण घेण्याचे सौभाग्य लाभले. पण तेव्हा खॉंसाहेबांचे उतारवय झाले होते. लीलाबाईंना तालीम देताना कधीकधी केसरबाईंचा विषय निघाला की अल्लादिया म्हणायचे, ‘मैने केशर को चुनचुनकर जो चीजें दी थी, वही तुम्हें भी सिखायी है| लेकिन उस वक्त मुझमें ताकद थी तो मैने केसर से बहोत रियाज करावाया| अब मेरी उमर हो गयी तो तुम्हाला रियाज तुम खुदको करना चाहिए|’
संगीतसम्राट अल्लादियाखॉं म्हणजे संगीताचे गौरीशंकर. त्यांच्या गायनकलेचा व रागसंग्रहाचा विस्तार एवढा प्रचंड की कुणालाच त्याचा अखेरपर्यंत थांग लागला नाही. आपल्या या अफाट खजिन्यातील मौल्यवान चीजारूपी रत्ने त्यांनी केसरबाईंना दिली व बाईंनीही मिळालेल्या विद्येचे चीज केले.
आग्रा घराण्याचे विद्वान गायक विलायत हुसेनखॉं नेहमी म्हणायचे, ‘हमारे सौ शागीर्द है, लेकिन कुछ नतीजा नहीं और अल्लादियाने केसरबाई को तैयार किया तो उन्होने पुरे हिंदुस्थान में गहजब कर डाला!’’
अल्लादियाखॉंसाहेबांची समृद्ध, प्रतिभाशाली गायकी म्हणजे सर्व कलांनी परिपूर्ण असा पौर्णिमेचा चंद्र तर केसरबाई म्हणजे सर्व क्षेत्रांत लकाकणारी शुक्राची चांदणी!
ही चांदणी अखेर निखळून पडली १६ सप्टेंबर १९७७ या दिवशी. गणेशचतुर्थीनंतरचा तो ऋषीपंचमीचा श्वास होता. ॐकारस्वरूपी गणेशाची मूर्ती घरात पुजली असतानाच केसरबाईंनी अखेरचा श्वास घेतला व अनाहत नाद आळवण्यासाठी त्या सरस्वतीच्या दरबारात दाखल झाल्या.
केसरबाईंचं गाणं प्रत्यक्ष ऐकलेले फारच थोडे भाग्यवान आज हयात असतील. मागच्या पिढीत मलबाराव सरदेसाई होऊन गेले. कधीही भेटले की ते केसरबाई, मोगुबाईंच्या गायकीबद्दल बोलायचे. आजच्या पिढीला केसरबाई माहिती नाहीत. त्यांचं गाणंही माहिती नाही. पण त्यांच्या स्मृतींचा नंदादीप कला अकादमीनं सूरश्री संमेलनाच्या निमित्तानं पेटत ठेवला आहे. केसरबाईंचं जन्मगाव असलेल्या केरी गावात त्यांच्या नावानं सूरश्री केसरबाई केरकर विद्यालय उभं झालं आहे. पण हे झालं लौकिक स्मारक. खरं स्मारक मानलं पाहिजे ते सूरश्री संमेलनालाच. कारण ज्या सुरांच्या साधनेसाठी केसरबाईंनी आयुष्यभर तपश्चर्या केली त्याच सुरांनी ओथंबलेला आणि भारलेला असा हा महोत्सव आहे. जेव्हा जेव्हा या महोत्सवात अल्लादियांच्या अतरौली-जयपूर घराण्याची आलापी घुमेल तेव्हा तेव्हा कला अकादमीच्या प्राकारात त्या सुवर्णमयी स्वरांच्या कोशात बसून केसरबाई अवतरतील- कदाचित गुरू अल्लादियाखॉंसाहेबांनी शिकवलेली ‘सोहोनी’मधली चीज गात- ‘काहे अब तुम आये!’