– प्रा. सुरेंद्र वसंत सिरसाट
आश्विन शुद्ध दशमीला दसरा सण येतो. दसरा सणाला ‘विजयादशमी’ असेही म्हणतात. नवरात्रोत्सव संपल्यावर दसरा सण साजरा केला जातो. काही घराण्यांत घटस्थापनेच्या नवव्या दिवशी तर काही घराण्यांत नवरात्रोत्सव संपल्यावर दहाव्या दिवशी नवरात्राचे विसर्जन केले जाते. दसर्याच्या दिवशी सीमोल्लंघन, अपराजितापूजा, शमीपूजा, अश्वपूजा, शस्त्रपूजा आदी धार्मिक कृत्ये केली जातात.
दसरा हा भारतातील एक सार्वत्रिक व महत्त्वपूर्ण सण आहे. हा पराक्रमाचा, विजयाचा, कर्तृत्वाचा सण असल्यामुळे अठरापगड जाती-धर्माचे लोक हा सण साजरा करतात.
सीमोल्लंघन
दुपारी सूर्यास्तापूर्वी गावाच्या ईशान्य दिशेकडे सीमेबाहेर सीमोल्लंघनासाठी जाण्याची प्रथा आहे. ज्या ठिकाणी गावाच्या सीमेबाहेर शमी किंवा आपट्याचा वृक्ष असेल तेथे थांबून वृक्षाची यथासांग पूजा केली जाते.
शमी पाप नाहीसे करते अशी धारणा आहे. श्रीराम शमीवृक्षाची पूजा करून विजययात्रेला निघाला होता, ती विजययात्रा सुखकर व्हावी अशी त्यामागे भावना होती. आपट्याची पूजा सर्व दोषांचे निवारण करणारी असून शत्रूंचा नाश करणारी आहे अशी यामागे धारणा आहे. आपट्याची पाने व खोडाचे तुकडे सोने म्हणून देवाला वाहतात व आपल्या इष्टमित्रांना देतात. त्यामा०गे आपल्याप्रमाणे इतरांनीही सुखी व समृद्ध व्हावे ही भावना असते. सर्वसामान्यपणे प्रथेनुसार हे सारे लहानांनी मोठ्यांसाठी द्यायचे असते. जेणेकरून लहानांनी कर्तृत्ववान होऊन वडीलधार्यांच्या कल्याणार्थ आणि सुखासाठी झटावे असा संदेश यातून देण्याचा उद्देश आहे.
अपराजितादेवी पूजन
शमीची किंवा आपट्याची पूजा झाल्यावर त्याच ठिकाणी जमिनीवर अष्टदल चितारून कंठामध्ये हार घातलेल्या, कटीत सुवर्णमेखला ल्यालेल्या व भक्तांचे कल्याण करणार्या अपराजितादेवीची पूजा करून आशीर्वाद घेतात.
शस्त्रे-आयुधे व अश्व-हत्ती पूजा
दसर्याच्या दिवशी शस्त्रे, आयुधे व यंत्रांची पूजा केली जाते. पूर्वी क्षत्रीय लोक, राजे व सरदार शस्त्रे साफ करून त्यांची पूजा करीत असत. त्याचप्रमाणे शेतकरी, कामगार व कारागीर आपली आयुधे व हत्यारांची पूजा करीत. आधुनिक युगात कारखान्यांतून उभारलेल्या यंत्रसामग्रीचीही उद्योजक पूजा करीत असतात. त्याचप्रमाणे युद्धामध्ये योद्यांना विजय मिळवून देण्याच्या कामी साहाय्यभूत ठरणारे घोडे (अश्व) व हत्ती यांना दसर्या दिवशी स्नान घालून व विविधांगी आभुषणांनी व वस्त्रालंकारांनी मढवून आणि सजवून त्यांचीही पूजा करण्याची प्रथा आहे. कर्नाटकासारख्या राज्यात आजही दसरोत्सव मोठ्या दिमाखाने आणि डोळ्याचे पारणे फेडणार्या दिमाखात साजरा केला जातो.
रामायण- महाभारतातील आख्यायिका
पांडव अज्ञातवासात असताना धनुर्धारी अर्जुनाने शमी वृक्षाच्या ढोलीत ठेवलेली शस्त्रे काढून विराटाच्या गाई पळवणार्या कौरव सैन्यावर स्वारी करून विजय मिळवला तो हाच दिवस आणि अयोध्यापती रामाने वनवासात असताना लंकापती रावणावर विजय मिळवला तोही याच दिवशी! हाच तो दिवस ज्या दिवशी सुष्टांनी दुष्टांवर मात करून विजय मिळवला, म्हणूनच या दिवसाला ‘विजयादमशी’ असे म्हणतात.
शेतकर्यांचा उत्सव
प्राचीनकाळापासून चालत आलेला हा एक शेतकर्यांचा लोकोत्सव आहे. गणेशचतुर्थीच्या दुसर्या दिवशी म्हणजे पंचमीला गोव्यात आपण शेतीची पूजा करून ‘नवं’ म्हणून शेतातले पहिले भाताचे पीक घरी आणून त्याची यथासांग पूजा करून घराच्या प्रवेशद्वारावर भाताच्या लोंब्या तोरणासारख्या बांधत असतो, तर इतर ठिकाणी पूर्वी नवरात्रात घटस्थापनेच्या दिवशी घटाखाली नऊ प्रकारच्या धान्याची पेरणी करतात आणि दसर्याच्या दिवशी वाढलेल्या धान्याचे अंकूर उपटून देवाला वाहतात. कित्येक ठिकाणी आजही धान्याच्या लोंब्या तोडून आणून त्या प्रवेशद्वारावर तोरणासारख्या बांधण्याची प्रथा आहे.
महाराष्ट्रातील दसरोत्सव
महाराष्ट्रात मराठेशाही व पेशवाईच्या काळात दसर्याच्या सीमोल्लंघनाला फार मोठे महत्त्व होते. दसर्यापूर्वी पावसाळ्यामुळे लष्कराच्या मोहिमा थांबवून विश्रांती घेतली जात असे. पावसाळा संपला की लष्कर नव्या उमेदीने आणि उत्साहाने कामाला लागे. दसर्या दिवशी सीमोल्लंघन झाले की नव्या मोहिमांची आखणी होई आणि लष्कर आपल्या कामगिरीवर निघे. पुणे येथे शनिवारवाड्यावर व सातार्यात श्री शाहूछत्रपतींच्या वाड्यात नवरात्रोत्सवाची घटस्थापना होई. दसर्याच्या दिवशी सीमोल्लंघन झाल्यावर भरणार्या दरबारात लष्करातील सैनिकांना पदव्या दिल्या जात. दसर्याचा हा दरबार संपल्यावर पूर्वयोजनेप्रमाणे स्वारीवर निघत असत. दसर्यास मोहीम करून शिवाजी महाराजांनी १६५६ साली सुपे काबीज केले होते. शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी महाराजही बुर्हाणपुरावरील स्वारीसाठी १६८१ मध्ये दसर्याच्याच दिवशी निघाले होते.
मराठी लष्कर मोहिमेवर गेल्यानंतर शत्रूवर विजय मिळवला की त्या प्रदेशातील सोनी-नाणी लुटून घरी आणत. घरी आल्यावर ओवाळणी करणार्या घरच्यांच्या तबकांत ही सोनी-नाणी घालीत. काही सोने-नाणी देवापुढे ठेवीत, तर काही आपल्या नातेवाइकांना व इष्टमित्रांना देत. आधुनिक युगात सोने-नाणी नसली तरी आपट्याची पाने नोटा म्हणून आणि खोडाचे तुकडे सोने म्हणून दिले जाते.
गुजरातेतील नवरात्रोत्सव व दसरा
कानकरी व ठाकूर स्त्रिया दसर्याच्या दिवशी पारंपरिक नाच करतात. याला ‘दसरानृत्य’ असे म्हणतात. या नाचात स्त्रिया दोन गट करतात. गाणे म्हणणारा गट व नाचणारा गट असे हे दोन गट. गाणे म्हणणारा गट प्रमुख असतो आणि नाचणारा गट उभ्याने व ओणव्याने टिपर्यांच्या तालावर टाळ्या वाजवत फेर धरतो. नवरात्रोत्सवातील गुजरातमधील गर्भा नाच आज देशभर आपलाच सण म्हणून अनेक राज्यांतून मोठ्या दिमाखात साजरा केला जातो. आपला गोमंतकही यात मागे नाही.
म्हैसूरचा प्रसिद्ध दसरोत्सव
आपल्या शेजारच्या कर्नाटक राज्यातील म्हैसूरचा दसरोत्सव इतिहासकाळापासून प्रसिद्ध आहे. या वर्षी म्हैसूरच्या दसरोत्सवाला ४०२ वर्षे पूर्ण होतील. म्हैसूरचा हा दसरोत्सव मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरा होतो. देशी व परदेशी पर्यटकही या उत्सवास मोठ्या प्रमाणात हजेरी लावतात. म्हैसूरच्या राजवाड्यावर नवरात्रोत्सवाचे दहाही दिवस डोळ्यांचे पारणे फेडणारी विद्युत रोषणाई केली जाते. आख्यायिकेनुसार या दिवशी देवी चामुंडीश्वरीने दैत्य महिषासुराचा वध करून सुष्टांचा दुष्टांवर विजय मिळवला आणि म्हणूनच या दिवसाला ‘विजयादशमी’ म्हणतात. महिषासुराच्या नावावरूनच या प्रदेशाला म्हैसूर नाव मिळाले असे लोक मानतात. म्हैसूरचा दसरा १५ व्या शतकात विजयनगरच्या राजांनी श्रीरंगपट्टण येथे सुरू केला. वडीयार राजघराण्यातील पहिला राजा वडीयार यांनी ही परंपरा पुढे सुरूच ठेवली. दहा दिवस चालणार्या या उत्सवाच्या पहिल्या दिवशी वडीयार राजघराण्यातील दांपत्य म्हैसूरमधील चामुंडी पर्वतावरील चामुंडी मंदिरात श्री चामुंडेश्वरी देवीची यथासांग पूजा करीत. त्यानंतर शाही दरबार भरवला जायचा. १८०५ सालापासून तिसर्या कृष्णराजा वडीयार महाराजांनी म्हैसूर राजभवनावर हा दरबार भरवण्यास सुरुवात केली होती. आजही वडीयार घराण्याचे वारस श्रीकांतदत्ता नृसिंहराजा वडीयार दसर्याच्या दिवशी खाजगी दरबार भरवून ही प्रथा पाळतात. नवरात्रीच्या नवव्या दिवशी म्हणजे महानवमीच्या दिवशी राजघराण्यातील तलवारींची पूजा करून हत्ती, घोडे व उंटाची मोठी मिरवणूक काढली जाते.
त्याचप्रमाणे विजयादशमी किंवा दसर्याच्या दिवशी ‘जुम्बो सवारी’ किंवा भव्य मिरवणूक काढण्याचा प्रघात आहे. यात एका हत्तीच्या अंबारीत श्री देवी चामुंडेश्वरी व दुसर्या अंबारीत वडीयार महाराज स्थानापन्न झालेली, हत्ती, उंट व घोड्यांची मिरवणूक काढली जाते. या मिरवणुकीत नाचणार्या समूहांसह मैदानात येऊन शमी वृक्षाची पूजा करून विजयोत्सव साजरा केला जातो.
कुलूघाटीतील दसरोत्सव
हिमालय पर्वताच्या कुशीत वसलेल्या कुलूघाटीत दसर्याचा हा उत्सव सात दिवस चालतो. दसर्याच्या आदल्या दिवशी कुलूघाटीतील वेगवेगळ्या गावांतील देवदेवतांच्या पालख्या तेथील प्रमुख देवता श्री रघुनाथाच्या मंदिरासमोर एकत्र येतात. दसर्याच्या दिवशी श्री रघुनाथाची रथयात्रा निघते. त्यात या पालख्या सहभागी होतात. या उत्सवाच्या वेळी तेथील नागरिक वस्त्रालंकार लेवून, नटून-थटून स्थानिक प्रकारचे नृत्य श्री रघुनाथासमोर सादर करतात. नृत्याच्या स्पर्धाही ठेवल्या जातात. सातव्या म्हणजे शेवटच्या दिवशी श्री रघुनाथाचा रथ व्यास नदीच्या तीरावर आणून त्या ठिकाणी लाकडे व गवतापासून बनवलेला प्रतिमात्मक लंकानगरीचे दहन केले जाते. रथयात्रेच्या वेळी मंदिराच्या मुख्य पुजार्याच्या अंगात अवसर येतो. शेवटच्या दिवशी लंकादहनानंतर रेडा, कावळा, बकरा, मासा व खेकडा यांचा बळी देण्याचीही तेथे प्रथा आहे. प्राणिमित्रांकडून या अशा प्राण्यांचा बळी देण्यास सातत्याने विरोध होतो आहे हेही तेवढेच खरे! नवरात्रोत्सवात दुर्गापूजा संपल्यावर दसर्याच्या दिवशी दिल्लीच्या रामलीला मैदानावर रावणादी पुतळ्यांचे दहन करून दुष्ट शक्तींचा निःपात प्रतिकात्मकरीत्या केला जातो. या कार्यक्रमाला लाखो भाविक हजर असतात. सुष्टांच्या हातून दुष्टांचा निःपात होतो हीच शिकवण लोकांना देण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून होत असतो.
राजस्थान
स्वातंत्र्यानंतर संस्थाने विलीन होण्यापूर्वी राजस्थानात राजपूत संस्थानिक दसर्याचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करीत असत. दसर्याच्या दिवशी राजपूत राजे गावाच्या किंवा शहराच्या सीमेबाहेरील मैदानात आपल्या सरदार व मानकर्यांबरोबर जाऊन शमीच्या वृक्षाची पूजा करीत. यावेळी तोफांची सलामी दिली जात असे. अश्वदलाची प्रात्यक्षिके होत असत. भाट लोक मेवाडच्या राजाच्या पराक्रमाचे पोवाडे गात असत. आजही थोड्याफार प्रमाणात ही प्रथा राजस्थानमध्ये दसर्याच्या दिवशी सुरू आहे.
गोव्याचा दसरोत्सव
आपल्या गोव्यातही दसरोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. कुठल्याही शुभकार्यासाठी साडेतीन मुहूर्तांपैकी दसरा हा एक शुभमुहूर्त मानला जातो. यादिवशी अनेक उद्योग व आस्थापनांचे मुहूर्त करून सुरुवात केली जाते. अनेक आस्थापने आपल्या दुकानांच्या किंवा कारखान्यांच्या प्रवेशद्वारावर झेंडूची फुले व आम्रवृक्षांची पाने यांची तोरणे बांधतात. वाहने, यंत्रे व आयुधे यांची पूजा करून त्यांना पुष्पमाला वाहिल्या जातात. गोव्यातील इतर ठिकाणच्या दसरोत्सवाची फारशी माहिती नसली तरी म्हापशात या दिवशी दुपारी दक्षिणाभिमुखी श्री महारुद्राची लालखी भजन व बँडवादनाच्या गजरात सीमोल्लंघन करून खोर्ली येथील श्री. दत्ता नारायण सावंत व कुटुंबीयांच्या घरी आगमन करते. याठिकाणी श्री महारुद्राची व आपट्याची पूजाअर्चा झाल्यावर सोने लुटण्याचा कार्यक्रम होतो. आधुनिक काळात सोने लुटणे म्हणजे आपट्याच्या वृक्षाची पाने व खोडाचे तुकडे गोळा करणे. हीच आपट्याची पाने व खोडाचे तुकडे आपल्या मित्रपरिवारास प्रतिकात्मक सोने म्हणून वाटले जाते. नंतर लालखी नगरप्रदक्षिणेस निघते. वाटेत वाड्यावाड्यांवर नागरिक श्री मारुतीरायास आरत्या ओवाळतात. आता जरी म्हापसा शहराचा आवाका वाढलेला असला तरी पूर्वी म्हापसा शहर, खोर्ली, मधलावाडा व पेठेचावाडा अशी विभागणी होत होती. श्री मारुतीरायांचे मंदिर हे मधल्यावाड्यावर आहे. रामनवमीनिमित्ताने निघणारी श्री मारुतीरायाची लालखी ही फक्त मधल्यावाड्यापुरतीच मर्यादित असते. परंतु दसर्याची श्री मारुतीरायाची लालखी याच खोर्ली व पेठेच्यावाड्यावरसुद्धा जाते. यामुळे म्हापशातील सांस्कृतिक एकात्मता दसर्याच्या निमित्ताने यावेळी ठळकपणे दिसून येते हेच खरे!