– डॉ. पांडुरंग फळदेसाई
नवरात्रीच्या उत्सवात गोव्यातच नव्हे तर संपूर्ण देशभर आदिमाया दुर्गेची उपासना, पूजाअर्चा होत आहे. ही आदिशक्ती उपासना वैदिकपूर्व काळापासून चालत आलेली दिसते. आदिम मानवसमूहातून ती परंपरा निर्माण झालेली दिसते. कारण ती सर्वशक्तीमान आहे. चराचराची माता आहे. दुष्टांचे निर्दालन करण्यात ती सर्वात पुढे आहे आणि सर्व सजीवांचा निर्वाह करण्याचे अचाट सामर्थ्य तिच्यात आहे.
त्वमेव सर्वजननी मूलप्रकृतिरीश्वरी|
त्वमेवाद्या सृष्टिविधी स्वेच्छया त्रिगुणात्मिका॥
तेजःस्वरूपा परमा भक्तानुग्रहविग्रहा|
सर्वस्वरूपा सर्वेशा सर्वाधारा परात्परा॥
सर्वबीजस्वरूपा च सर्वपूज्या निराश्रया|
सर्वज्ञा सर्वतोभद्रा सर्वमंगल मंगला॥
हे देवी विश्वरुपिणी, तू मूलप्रकृती, ईश्वरीस्वरूप विश्वजननी आहेस. भक्तांवर अनुग्रह करण्यासाठी देह धारण करणारी तू परमतेजस्वरूप आहेस. तू सर्वस्वरुपी, सर्वेश्वरी आहेस. तूच सर्वांचा आधार आणि परात्पर आहेस. तू सर्वांना पूजनीय व आश्रयरहित अशी असून सर्वबीजस्वरूप आहेस. तू सर्वज्ञ, तू परमपवित्र आणि सर्वमंगलाचे मंगल आहेस, असे आदिमायेचे वर्णन स्वतः भगवान ब्रह्मवैवर्तपुराणात करतो. यावरून संपूर्ण विश्व व्यापून राहिलेल्या या आदिशक्तीचे महत्त्व लक्षात येते.
या देवीला विविध जनसमूहांनी वेगवेगळी नावे दिलेली दिसतात. लोकपरंपरेत तर असंख्य नावांची सरमिसळ दिसते. परंतु वेद, उपनिषदे आणि पुराणातदेखील असंख्य नावे मिळतात. महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती ही आदिशक्तीची तीन त्रिगुणात्मक मुख्य रूपे सांगितली आहेत. महाकाली ही तमोगुणी, तर महालक्ष्मी सत्त्वगुणी आणि महासरस्वती रजोगुणी मानली जाते. महाकाली रुद्र शिवाशी म्हणजेच महाकाळाशी संबद्ध आहे. महालक्ष्मी ही माता अंबा, जगदंबा असून ती महाविष्णू अथवा नारायणाशी संबद्ध आहे. त्यामुळे तिला नारायणी म्हणतात. महासरस्वती ही विद्यादेवी, ज्ञानदेवी असून ती ब्रह्माशी संबद्ध आहे.
त्यांच्या उत्पत्तीकथादेखील रंजक आहेत. शेषशय्येवर योगनिद्रेत असलेल्या विष्णूच्या कानातून मधू आणि कैटभ हे दोन दैत्य बाहेर पडले. त्यांनी ब्रह्मावर हल्ला केला. ब्रह्मदेवाने विष्णूची प्रार्थना केली. त्यावेळी विष्णूच्या अंगातून महाकाली प्रकटली. तिने मधू-कैटभ यांना मोहीत केले. ती संधी साधून विष्णूने उभय दैत्यांचा वध केला.
महालक्ष्मीची उत्पत्तीकथा ही महिषासुराच्या वधाशी संबंधित आहे. महिषासुर प्रचंड मातला. त्याने देवांशी युद्ध करून इंद्राचा पाडाव केला व स्वतः इंद्रसिंहासनावर बसला. मग सर्व देवांनी ब्रह्मदेवाच्या नेतृत्वाखाली विष्णू व शंकराकडे आपली कैफियत मांडली. ती ऐकून विष्णू, शंकर, ब्रह्मदेव आणि उपस्थित सर्व देवांच्या देहात प्रचंड तेज निर्माण झाले. त्या तेजाचा एकत्रित पुंज झाला. त्या पुंजातून अत्यंत तेजस्वी अशी महाशक्ती- महालक्ष्मी उत्पन्न झाली. सर्व देवांनी आपापली शस्त्रे तिला दिली. त्यांच्या साहाय्याने महालक्ष्मीने महिषासुराचा घनघोर युद्धानंतर वध केला.
महासरस्वतीची उत्पत्ती शुंभ-निशुंभ या दैत्यांच्या वधासाठी झाली. महिषासुरासारखेच शुंभ आणि निशुंभ या दैत्यांनी देवांचा पराभव केला. मग सर्व देवांनी हिमालयात जाऊन देवी पार्वतीची करुणा भाकली. तेव्हा पार्वतीच्या देहातून महासरस्वती प्रकट झाली व तिने शुंभ-निशुंभाशी प्रचंड युद्ध केले. शेवटी तिने दोन्ही दैत्यांचा निःपात केला व देवांना त्यांचे राज्य बहाल केले.
या आदिमाया दुर्गेच्या तीनही रूपांची पुन्हा तीन-तीन रूपे घेऊन नऊ रूपांची नवदुर्गा संकल्पना पुढे आली. त्यावेळेपासून नवरात्रीमध्ये दुर्गेची नऊ रूपे दाखविण्याची परंपरा विविध प्रदेशांत सुरू झाली. या आदिशक्तीच्या रूपाचे वर्णन पाहिल्यावर लक्षात येते की, सामर्थ्याचे प्रतीक असलेला सिंह हा तिचे वाहन आहे. तिला विविध भुजा आहेत. चार, आठ, दहा, अठरा आणि अनन्तभुजा पण आहेत. तिच्या वेगवेगळ्या हातांत वेगवेगळी शस्त्रे दाखविलेली आहेत. त्रिशूळ, खड्ग, परशू, खेटक अशा स्वरूपाची ही शस्त्रे आहेत. ती शिवमयी आदिशक्ती असल्याने तिच्या कपाळावर तृतीय नेत्र आहे. तिला विविध नावे आहेत. त्यातील काही ठळक नावे म्हणजे चंडी, चामुंडा, भगवती, भैरवी, त्रिपुरा, ललिता, कात्यायनी, मीनाक्षी, कामाक्षी, भराडी, कौशिकी, कामारण्या, श्रीविद्या ही होत. महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वती यांच्या जशा उत्पत्तीकथा आहेत, तशाच वरील नावांच्या उत्पत्तीकथाही प्रचलित आहेत.
आदिशक्तीच्या विविध रूपांचे वर्णन करताना ही शक्तीदेवता शिवमयी असली तरी जेव्हा ती उग्र रूप धारण करते तेव्हा ती प्रत्यक्ष भूमीवर शिवाला उताणा पाडून त्याच्या उरावर थयथयाट करते असे तिचे रूप कल्पिले आहे. दुसरे रूप हे सीताशक्तीचे आहे. रामायणातील राम-रावण युद्धप्रसंगी ही सीताशक्ती जागृत झाली. सहस्रमुखी रावण रामाकडून मारला जात नाही हे ध्यानात येताच सीतेने विक्राळ रूप धारण केले. वाल्मिकी रामायणातील वर्णनानुसार सीता तेव्हा चंडशेषा आणि घंटापाशधारिणी बनली. तिने आपल्या गळ्यात मुंडमाळा घातल्या आणि अशा या विक्राळरूपधारिणीने रावणाचा शिरच्छेद करून रामाला जय प्राप्त करून दिला. तिसरे शक्तीरूप म्हणजे राधाशक्तीचे रूप. देवी भागवतानुसार राधा ही परमात्मा श्रीकृष्णाची परात्पर शक्ती होय. सीतेप्रमाणे राधा ही अयोनीसंभव आहे. राधा व कृष्ण हे एकाच ब्रह्मज्योतीचे दोन आविष्कार मानले गेले आहेत. कारण राधा ही सर्वदेवमयी, सर्ववेदमयी, सर्वशास्त्रमयी, सर्वलोकमयी आणि सर्वशक्तीमयी आहे.
आदिशक्ती दुर्गा ही दिव्य आणि उदात्त असल्याचे वेद आणि उपनिषदे सांगतात. काही पुराणांमधून तर तिची स्तुतिगायने व वर्णने दिसतात. दुर्गेच्या विविध अवयवांची निर्मिती कशी झाली याचे वर्णन खूप अभ्यासपूर्ण, मनोरंजक व सूचक आहे. दुर्गेचे मुख शंकराच्या तेजाने झाले. यमाच्या तेजाने तिचे केस निर्माण झाले. विष्णूच्या तेजाने तिला भुजा प्राप्त झाल्या. चंद्र-तेजाने तिचे स्तन निर्माण झाले. इंद्राच्या तेजाने कटिभाग निर्माण झाला. वरुणाच्या तेजाने तिच्या जांघा व पिंढर्या तयार झाल्या. भूमीच्या तेजाने नितंब निर्माण झाले. ब्रह्माच्या तेजाने तिचे पाय उत्पन्न झाले. सूर्यतेजाने पदांगुली व वसूंच्या तेजाने करांगुली निर्माण झाली. कुबेराच्या तेजाने नासिका व प्रजापतीच्या तेजाने दांत उत्पन्न झाले. अग्नीच्या तेजाने तीन नेत्र उत्पन्न झाले तर संध्यातेजाने भुवया आणि वायुतेजाने कान निर्माण झाले. याशिवाय सर्व देवदेवतांचे तेज तिच्या रूप-योजनेत उपयोगी पडले. ती वैकुंठात महालक्ष्मीच्या रूपाने वास करते. गो-लोकांत ती राधिका म्हणून वावरते. शिवलोकांत ती शिवा बनते तर ब्रह्मलोकांत ती सरस्वती स्वरूपात राहते. वेदमाता सावित्री तीच आहे. जनककन्या सीताही तीच आणि भीष्मकन्या रुक्मिणी व वृषभानुकन्या राधादेखील तीच आहे. दुर्गासप्तशती ग्रंथानुसार दुर्गेने आपल्या मुखाने ही रूपे शंकराला विषद केली आहेत.
चंड-मुंड दैत्यांसोबत जगदंबेचे घोर युद्ध झाले. त्यावेळी क्रोधपूर्ण अशा जगदंबेच्या भुवईतून कालीची उत्पत्ती झाली. लिंगपुराणानुसार दारूक नावाच्या दैत्याचा केवळ स्त्रीच्या हातून वध होणार होता. म्हणून शंकराने आपल्या कंठातल्या विषापासून कालीला निर्माण केले. तिचे वर्णन पुराणात सापडते ते असे-
काळी कभिन्न व चार भुजा असलेली, एका हाती नरमुंड व दुसर्या हाती खड्ग, गळ्यात नररुंडांची माळ, कंबरेला मेलेल्या माणसांच्या हातांची बनवलेली शृंखला, लाल डोळे, तोंडातून बाहेर आलेली जीभ, तोंड व छाती रक्ताने माखलेली ती एक पाय शिवाच्या छातीवर व दुसरा मांडीवर ठेवून उभी ठाकलेली आहे. या महाकालीची अनेक नावे प्रचलित आहेत. भद्रकाली, दक्षिणकाली, सिद्धिकाली, गुरूकाली, चंडकालिका, धनकालिका, कामकालिका ही त्यांपैकी काही नावे आहेत.
महाकाली, महादुर्गा, महालक्ष्मी, महासरस्वती ही केवळ एखाद्या सांप्रदायाची देवता नसून भारतवर्षातील समस्त समूहांची ती देवी आहे. वैदिक धर्मात पुढे आर्येतरांचे तंत्र आले. त्यांची सरमिसळ होऊन शक्तीदेवतेच्या पूजनाच्या विविध परंपरा सुरू झाल्या. हजारो वर्षांपासून ही शक्तीपूजनाची परंपरा सर्वसामान्यांपासून उच्चभ्रू आणि राजेरजवाड्यांपर्यंत सारख्याच अनिवार्यतेने दिसते. खोलात जाऊन दुर्गापूजन संकल्पनेचा विचार केला तर एक गोष्ट प्रामुख्याने नजरेस भरते. दुर्गेचे स्वरूप हे विशिष्ट संप्रदाय अथवा जातीपुरते मर्यादित राहिलेले नाही. ते जात, देश, प्रदेश इत्यादीच्या बंधनात कधीच अडकून राहिले नाही. ते या सार्या सीमा-मयार्र्दा ओलांडून भारतीय समष्टीचे सामान्यरूप बनले. त्यामुळे भारतीय संस्कृतीच्या एकात्म संकल्पनेला अधिक बळ प्राप्त झाले. संपूर्ण भारतीय समाज एक भक्तीरूपी धाग्याने एकवटला आणि सश्रद्ध मनाने भक्तीद्वारे शक्तीचे आवाहन, उपासना आणि पूजा करू लागला. त्यातूनच बलदंड अशी राष्ट्रउभारणी होण्यास मदत झाली आहे. दुर्गापूजन हा धार्मिक सण न राहता तो अलीकडे सामाजिक उत्सव बनत चालला आहे ही या सर्वांमधली फार मोठी जमेची बाजू आहे.
मातृशक्ती पूजातत्त्वानुसार चौसष्ट शक्ती सांगितल्या आहेत. त्या शक्तींची नावे पुढीलप्रमाणे-
कुलेशी, कुलनन्दा, वागीशी, भैरवी, उमा, श्री, शांती, चंडा, ध्रूमा, काली, करलिनी, महालक्ष्मी, कंकाली, रुद्रकाली, सरस्वती, वाग्वादिनी, नकुली, भद्रकाली, शशिप्रभा, प्रत्यंगिरा, सिद्धलक्ष्मी, अमृतेशी, चंडिका, खेचरी, भूचरी, सिद्धा, कामाक्षी, हिंगुला, बला, जया, विजया, अजिता, नित्या, पराजिता, विलासिता, घोरा, चित्रा, मुग्धा, धनेश्वरी, सोमेश्वरी, महाचंडा, विद्या, हंसी, विनायिका, वेदगर्भा, भीमा, उग्रा, वैद्या, सद्गती, उग्रेश्वरी, चंद्रगर्भा, ज्योत्स्ना, सत्या, यशोवती, कुलिका, कामिनी, कम्या, ज्ञानवती, डाकिनी, राकिनी, लाकिनी, काकिनी, शाकिनी आणि हाकिनी.
(संदर्भ : मातृशक्ती विशेषांक, सप्टेंबर-ऑक्टोबर १९६१. भारतीय संस्कृतीकोश)
शक्तिपीठांची संकल्पना
शिवाची पत्नी पार्वती म्हणजे शक्ती. तिच्या अवयवांनी पावन झालेली स्थळे म्हणजे शक्तिपीठे असे मानले जाते. त्यामागील कथा ब्रह्मपुराण, मत्स्यपुराण, पद्मपुराण, कूर्मपुराण इत्यादी पुराणांतून सांगितलेली आहे. त्याचा सारांश असा-
दक्ष राजाची कन्या ती पार्वती किंवा सती. दक्ष राजाने फार मोठा यज्ञ केला. त्या यज्ञासाठी सर्वांना निमंत्रणे पाठविली, परंतु त्याचा जावई शिव याने त्याचा पूर्वी अपमान केला होता म्हणून शिव-पार्वतीला आमंत्रण दिले नाही. पार्वतीला मात्र आपण यज्ञसमारंभात जाण्याची अनिवार इच्छा झाली. शिवाने आपला नकार तिला कळविला असतानाही ती यज्ञसमारंभास दासींसह गेली. परंतु समारंभात तिचा दक्ष राजाने शिवाविषयी अनुद्गार काढून अपमान केला. तो अपमान असह्य होऊन तिने यज्ञात उडी टाकली. ही गोष्ट शिवाला समजताच संतापलेला तो आपल्या गणांसह तेथे आला व त्याने दक्षाला ठार करून यज्ञाचा विद्ध्वंस केला. त्यानंतर त्याने सतीचे शरीर आपल्या खांद्यावर घेतले व तो सर्वत्र हिंडू लागला. ते पाहून विष्णूने आपल्या सुदर्शनचक्राने सतीचा एकेक अवयव तोडून टाकला. सतीची ही अंग-प्रत्यंगे एकावन्न ठिकाणी गळून पडली. ती ५१ स्थाने पुढे शक्तिपीठे बनली. या प्रत्येक पीठात एक शक्ती व एक भैरव विविध रूपे धारण करून वास्तव्य करतात अशी जनमानसात श्रद्धा आहे. देवीभागवतात मात्र एकशे आठ पीठांचा उल्लेख सापडतो.
(संदर्भ : भारतीय संस्कृती कोश. शाक्तपीठांचा अभ्यास)