– नागेश करमली
गोमंतकाच्या मुक्तिसंग्रामात भाग घेतल्यामुळे जे स्वातंत्र्यसैनिक पोर्तुगिजांच्या तुरुंगात कैदी होते ते तेथे काही बाबतीत ‘स्वतंत्र’ झाल्यासारखेच वागत असत. स्वातंत्र्यसैनिकांना मुख्यतः दोन ठिकाणी बंदिस्त करून ठेवले होते. एक होता आग्वादचा किल्ला व दुसरा रेइजमागूशचा किल्ला. या दोन्ही ठिकाणी काही क्षुल्लक अपवाद वगळता लहान लहान कोठड्या अशा नव्हत्याच. रेइजमागूशमध्ये मोठ्या हॉलवजा कोठडीत स्वातंत्र्यसैनिकांना ठेवण्यात आले होते. तिथे अशा दोन कोठड्या होत्या. एकएका कोठडीत साधारणपणे पन्नासपेक्षा अधिक जणांना ठेवण्यात येत असे. आग्वादमध्येही असेच दोन मोठे हॉल व तीन जरा लहान हॉल होते. तेथेही मोठ्या हॉलमध्ये जवळजवळ पन्नासपेक्षा अधिक व त्यापेक्षा लहान हॉलमध्ये चाळीसच्या आसपास स्वातंत्र्यसैनिकांना डांबून ठेवण्यात येत असे.
प्रत्येक हॉलमध्ये (कोठडीत) स्वातंत्र्यसैनिक स्वतःचे जेवणखाण स्वतःच तयार करीत असत. त्या काळी म्हणजे १९५४ ते १९६१ मध्ये दर एका स्वातंत्र्यसैनिकामागे सरकार एक दिवसासाठी एक रुपया पाच आणे याप्रमाणे भत्ता देत असे. याच पैशातून जेवणखाणासाठी लागणारे जिन्नस तुरुंगाधिकार्यांमार्फत पुरविण्यात येत असत. प्रत्येक हॉल किंवा कोठडीमध्ये सर्वांचा स्वयंपाक एकत्रच होत असे. त्यासाठी चार किंवा पाच दररोज पाळ्या ठरवून देण्यात येत असत. त्यामुळे इतरांसाठी भरपूर मोकळा वेळ मिळत असे. या वेळेचा उपयोग बरेच जण वाचन वगैरेसाठी करीत असत. त्यासाठी आमच्या बाहेरच्या मित्रांनी पाठविलेल्या विविध प्रकारच्या पुस्तकांचा उपयोग होत असे. मी रेइजमागूशमध्ये बंदी असताना आमच्या हॉलमध्ये पुस्तकांचे एक भलेमोठे कपाट होते. त्यात अडीचशे-तीनशे तरी पुस्तके जमा झालेली होती.
आमच्यासाठी उपलब्ध असलेल्या वेळेचा उपयोग वाचनाबरोबरच अधूनमधून विविध विषयांवरील चर्चा, परिसंवाद, व्याख्याने, वाचण्यात आलेल्या उत्कृष्ट पुस्तकावरील टिप्पणे वाचणे यासाठी आम्ही करीत होतो. त्याशिवाय दर महिन्याला रेइजमागूशमध्ये ‘जोत’ नावाचे एक हस्तलिखितही आम्ही तयार करीत होतो. आमच्यामध्ये काही अल्पशिक्षित स्वातंत्र्यसैनिकही होते. त्यांच्यासाठी इंग्रजी-हिंदीचे वर्ग आम्ही घेत होतो. अनेकांनी त्याचा फायदा घेतला. तुरुंगातून सुटल्यानंतर त्यातल्या अनेकांनी रीतसर अभ्यास करून एस.एस.सी.च्या परीक्षाही दिल्या. अर्थात हे सगळे त्या-त्या हॉलपुरतेच मर्यादित असायचे. रेइजमागूशमध्ये दोन्ही हॉलमधील माणसे दिवसा एकमेकांना भेटत असत.
आग्वादमध्ये मात्र एका कोठडीतील व्यक्तीला दुसर्या कोठडीतील कैद्याशी कसलाही संपर्क ठेवायला मिळत नसे. लष्कराचे पहारेकरी यासाठी अगदी डोळ्यांत तेल घालून सारे काही निरीक्षण करीत असत. कुणीही एका कोठडीतील माणसाने दुसर्या कोठडीतील व्यक्तीशी बोलण्याचा वगैरे प्रयत्न केल्यास त्याला कडक शब्दांत दटावण्यात येत असे. प्रसंगी शिक्षाही करण्यात येत असे.
तुरुंगात दैनंदिन गोष्टींबरोबरच आम्ही कोठडीतील मंडळी १५ ऑगस्ट- स्वातंत्र्यदिन, १८ जून- क्रांतिदिन व २६ जानेवारी-प्रजासत्ताकदिन असे महत्त्वपूर्ण दिवस- आमच्यासमोरील मर्यादांचे भान ठेवून- साजरे करीत असू. जेवणाखाणासाठी जो भत्ता मिळत असे त्यातूनच १५ ऑगस्ट किंवा २६ जानेवारीला एखादा गोड जिन्नस आम्ही तयार करायचो. त्याशिवाय भाषणे, गीते, कविता इत्यादीसह अर्थातच आमच्यापुरता एखादा कार्यक्रम करायचो. रेइजमागूशबरोबरच आग्वादलाही हे आम्ही करीत होतो. आमच्यात राजकीय, सामाजिक, ऐतिहासिक विषयांचा चांगला अभ्यास असलेले काही जाणकार होते. नावेच घ्यायची झाली तर अँथनी ऊर्फ टोनी डिसौझा, मार्क फर्नांडिस, ऍड. श्रीधर तांबा, प्रा. जानुआरियू पेरैरा, आल्फ्रेड आल्फांसो, माधव पंडित, प्रफुल्ल प्रियोळकर यांची नावे घेता येतील.
एका वर्षी आग्वादला असताना असाच २६ जानेवारी- प्रजासत्ताकदिन आम्ही साजरा करीत होतो. वेळ सायंकाळची होती. २६ जानेवारी हाच दिवस प्रजासत्ताकाच्या प्रस्थापनेसाठी का निवडण्यात आला याबद्दल प्रफुल्ल प्रियोळकर माहिती देत होते. तुरुंगरक्षकाला आम्ही काहीतरी वेगळा कार्यक्रम करीत आहोत याचा सुगावा लागला. त्याने आपल्या अधिकार्याला कळविले. अधिकारी धाड धाड बुटाचे पाय आपटीत कोठडीचा दरवाजा उघडून आत शिरला व आत काय चालले आहे ते पाहू लागला. सगळेच आपापल्या जागी बसलेे होते. भाषण वगैरे बंद झाले होते. असे काही घडले तर काय करायचे हे आधीच ठरलेले असायचे. आमच्यात भजने वगैरे गाणारे होते. त्यातल्या एका-दोघांनी अधिकारी आत शिरताच संत तुकारामाचा अभंग गायला सुरुवात केली. अधिकार्याने मोठ्याने विचारले, ‘‘काय चालले आहे?’’ आम्ही सांगितले, ‘‘आम्ही भक्तिगीते गाऊन देवाची प्रार्थना करीत आहोत.’’
अधिकारी म्हणाला, ‘‘बरे आहे. करा प्रार्थना. जास्त मोठ्याने मात्र गाऊ नका.’’ आणि थोडा वेळ थांबून तो म्हणाला, ‘‘मला वाटले तुम्ही इंडियन रिपब्लिकचा दिवस साजरा करीत आहात. सांगून ठेवतो, तुम्ही असले काही केल्यास काळ्या कोठडीत डांबून टाकीन. याद राखा!’’ एवढे सांगून तो निघून गेला. दहा मिनिटांनंतर आम्ही आमचा प्रजासत्ताकदिनाचा राहिलेला कार्यक्रम रीतसर पार पाडला.