– डॉ. रघुनाथ माशेलकर
आपल्या देशाने संविधानाचा स्वीकार करून एका नव्या पर्वाची सुरुवात केली. हा दिवस म्हणजे भारतीय प्रजासत्ताकदिन. २६ नोव्हेंबर १९४९ ला संविधान समितीने भारताची राज्यघटना स्वीकारली आणि २६ जानेवारी १९५० रोजी ती अमलात आली. ज्याप्रमाणे आपण धार्मिक सणवार मोठ्या उत्साहाने साजरे करतो, त्याच उत्साहाने प्रत्येक भारतीय काही राष्ट्रीय सणही साजरे करत असतो. त्यापैकीच प्रजासत्ताकदिन हा एक दिवस.
१५ ऑगस्ट १९४७ रोजी पारतंत्र्याच्या बेडीतून मुक्त होऊन भारताला स्वातंत्र्य मिळालं. त्यानंतर स्वतंत्र भारताच्या योजना काय असतील, देश कोणत्या दिशेने वाटचाल करेल, लोकांच्या कल्याणासाठी कोणत्या योजना आखण्यात येतील हे सारं ठरवण्यासाठी तत्कालीन नेते, पुढारी इत्यादींनी आपल्या देशाची एक राज्यघटना बनवली. या राज्यघटनेची आखणी करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या समितीचे अध्यक्ष होते. ही राज्यघटना ज्या दिवशी अमलात आली तो प्रजासत्ताकदिन साजरा करण्यात येतो. दरवर्षी साजरा होणारा प्रजासत्ताकदिन आणि या वर्षी साजरा होत असलेला प्रजासत्ताकदिन यामध्ये ङ्गरक आहे. या वेळच्या प्रजासत्ताक दिनाचं वेगळेपण असं की आता देशात लोकसभा निवडणुका होणार आहेत. निवडणुकांनंतर देशात नवं पर्व सुरू होईल, नवं नेतृत्व येईल. त्यामुळे सामान्य माणसांसह सार्याच भारतीयांच्या मनात देशाच्या पुढील वाटचालीविषयी उत्सुकताही आहे आणि काळजीही. या पार्श्वभूमीवर सर्व भारतीयांनी संघटितपणे उभे राहण्याची ङ्गार गरज आहे. सार्या भारतीयांनी ‘वन इंडिया’, ‘माय इंडिया’, ‘टीम इंडिया’ असा नारा देऊन एकत्र यायला हवं. देशाची लोकसंख्या १२० कोटी आहे असं मानलं तर त्यापैकी प्रत्येकाने प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने हा देश आपला असल्याच्या भावनेचा उत्स्ङ्गूर्त आविष्कार घडवला पाहिजे.
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने देशाच्या हिताच्या दृष्टीने पावलं टाकण्याची शपथ घ्यावी लागेल. तसं पाहिलं तर सरकार, राजकारण यावर असणारा सामान्य माणसाच्या मनातील विश्वास पूर्वीच्या तुलनेत खूपच ढळला आहे.
सरकारकडे विश्वासाने पाहून, विश्वासाने पुढे जाऊन आपण काही करू शकू असं सामान्य माणसाला आता वाटेनासं झालं आहे. तसं होणं स्वाभाविकही आहे. गेल्या काही वर्षांमध्ये सरकारी पातळीवर लाचलुचपत, भ्रष्टाचार, घोटाळ्यांचे असंख्य प्रकार उघडकीस आले. त्यामुळे सामान्य माणसाचा सरकारवरील विश्वास उडाला. या पार्श्वभूमीवर प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने भ्रष्टाचार, घोटाळ्याशिवायचा पूर्वीचा देश परत उभारणं महत्त्वाचं ठरणार आहे. हे एक प्रकारचं मोठं आव्हान आहे. देशाला स्वराज्य मिळालं असं आपण म्हणतो. पण स्वराज्यापेक्षा सुराज्य किती मिळतं हे जास्त महत्त्वाचं आहे. स्वराज्य असलं तरी त्यामध्ये सुराज्यही असलं तर प्रजासत्ताकदिन किंवा स्वातंत्र्यदिनाला खरा अर्थ येतो. सुराज्यात भ्रष्टाचार, घोटाळ्यांना स्थान असता कामा नये. पण दुर्दैवाने आपल्या देशात ते आहे. त्यामुळे भ्रष्टाचारमुक्त देश आणून सुराज्य आणण्याचंही मोठं आव्हान पेलावं लागेल. तसं ते आणण्याच्या दिशेने प्रवास करणे गरजेचे आहे. तसे झाले तर प्रजासत्ताकदिन खर्या अर्थाने साजरा होईल.
गेल्या काही दिवसांपासून आपल्या देशात घोटाळे, भ्रष्टाचार यावरून वादविवाद सुरू आहेत. या चर्चेनेही लोक निराश झाले आहेत. त्यातच आपली आर्थिक घसरण (इकॉनॉमिन स्लोडाऊन) सुरू आहे. या सार्या परिस्थितीमुळे इतरांचाही आपल्या देशावरील विश्वास उडत चालला आहे. त्यामुळे हा देश खरोखरच विकसित होणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. दोन वर्षांपूर्वी आपल्या देशाबाबत जसं चित्र होतं तसं ते आता राहिलेलं नाही. या पार्श्वभूमीवर आत्मविश्वास आणि विश्वास वाढवावा लागेल. दोन वर्षांपूर्वी इतर देशांत भारताची प्रतिमा लाडका किंवा कौतुक होणारा देश अशी होती. हे कौतुकाचं स्थान आपण परत आणणार आहोत का, असा प्रश्न आहेे. आपला देश महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे असं सांगितलं जातं. पण या परिस्थितीमुळे देश खरोखरच महासत्ता बनणार का, अशी शंका इतर देशांबरोबरच आपल्या देशातील नागरिकांच्याही मनात निर्माण व्हायला लागली आहे.
आजचा भारत आणि पूर्वीचा भारत यांच्या चित्राकडे पाहिलं तर त्यामध्ये असणारा ङ्गरक आपल्या लक्षात येईल. पूर्वीचा भारत हा इतर विकसित देशांच्या तुलनेने मागास होता. पण आज तसं चित्र राहिलेलं नाही. आता आपला देश महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्याला कधी यश येईल तेव्हा येईल, पण या काळात आपल्या देशाने केलेली प्रगती त्यामुळे नाकारता येणार नाही. प्रगतीची अशीच झेप हा देश घेत राहिला तर तो लवकरच महाशक्ती बनण्यास समर्थ होईल यात तिळमात्र शंका नाही. काही वर्षांपूर्वी मागास असणार्या आपल्या देशाला इतर देशांकडून ‘थर्ड वर्ल्ड कंट्री’ असं संबोधलं जायचं. त्यातून आता आपल्या देशाला ‘थर्ड वर्ल्डस् मोस्ट पॉवरङ्गुल कंट्री’ असं म्हटलं जाऊ लागलंय. हे स्थान कायम राखून आणखी पुढे जाण्याचं आव्हान आपल्याला पेलावं लागणार आहे. त्याच्या बांधणीसाठी आपण काय करणार आहोत याचा विचार आता करावा लागेल. ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन इत्यादींच्या बाबतीत बोलायचं झालं तर बोलण्यासारखं खूप काही आहे. विज्ञान, तंत्रज्ञानात आपल्या देशाने प्रगती साध्य केली आहे. आर्थिक आणि सामाजिक प्रगतीसाठी ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञानावर ती साध्य होत असते. त्यादृष्टीने भारताने मोठं काम केलं आहे हे मान्यच करावं लागेल. आपल्या देशाने ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञानाच्या बळावर महत्त्वाकांक्षी झेप घेतली आहे. काही वर्षांपूर्वी आपण चंद्रावर जाण्याची स्वप्नं पाहत होतो. चांद्रयान मोहीम यशस्वी करून भारताने हे यश संपादन केलं. मंगळावर जाण्यासाठी आपण बर्याच दिवसांपासून तयारी करत आहोत. आता भारताने मंगळ मोहीमही आखली आहे. एके काळी सुपर कॉम्प्युटर बनवणं शक्य होईल की नाही याविषयी आपण साशंक होतो. पण भारताने ते करून दाखवलं. तंत्रज्ञानाच्या बाबतीत इतरांना जे अशक्य कोटीतलं वाटत होतं ते भारताने ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान यांच्या बळावर शक्य करून मोठी भरारी घेतली. नजीकच्या काळातही या क्षेत्रासह प्रत्येक क्षेत्राने आणि प्रत्येक व्यक्तीने ध्येय ठरवून, पथ आखून ती उच्च असतील यासाठी प्रयत्नशील राहिलंं पाहिजे. भारतात बुद्धिमानांची कमतरता नाही. त्यांच्याकडे ज्ञान आहे. तंत्रज्ञान, विज्ञान, संशोधन इत्यादी क्षेत्रांत लिलया झेप घेणारी व्यक्तिमत्त्वं आपल्या देशाने पाहिली आहेत आणि भविष्यातही अशा लोकांची कमी पडणार नाही. अमेरिकेसारख्या विकसित राष्ट्रातही आपल्या देशातील बुद्धिमानांना नेहमी मागणी असते आणि ती यापुढेही कायम राहणार आहे. भारताकडे अशी उंच भरारी घेण्याची क्षमता आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर आपण असंच काही उच्च ध्येय ठरवून ते साध्य करण्यासाठी प्रयत्नशील राहिलं पाहिजे. आता प्रत्येक भारतीयाने ‘येस, वुई कॅन डू इट’ असा नारा द्यायला हवा. या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने त्याची सुरुवात करायला हरकत नाही. तसं झालं तर या प्रजासत्ताक देशाला नवा अर्थ प्राप्त होईल.