Home बातम्या तिसर्‍या गोमंतक मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने…

तिसर्‍या गोमंतक मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने…

0

– जे. अविनाश, नागवे, सत्तरी

गोमंतभूमीत मराठी राजभाषा व्हावी म्हणून झटणार्‍या अनेक संस्थांपैकी ‘गोमंतक मराठी साहित्य परिषद’ ही एक! गोव्यात राजभाषा मराठी होवो अगर न होवो, परंतु गोव्याच्या जनमानसात मराठी समृद्ध व्हावी या ध्येयाने प्रेरित होऊन वावरणारी ही संस्था! सत्तरीसारख्या दुर्गम भागात स्थापन होऊन मराठीची पताका खांद्यावर वाहण्याचे काम जोमाने करीत आहे. कुठलेही राजकीय किंवा आर्थिक पाठबळ नसताना देखील या संस्थेने सत्तरीतील वाळपईत आपले प्रथम अखिल गोमंतक मराठी साहित्य संमेलन भरविले आणि त्यानंतर गेल्या तीन वर्षांपासून ही संस्था साहित्यक्षेत्रात यशस्वी वाटचाल करीत आहे.
यंदा या संस्थेचे तिसरे अखिल गोमंतक मराठी साहित्य संमेलन दि. १४ व १५ डिसेंबर दरम्यान साखळी येथे होत आहे. त्यासाठी पाळीचे आमदार डॉ. प्रमोद सावंत यांचे योगदान विशेष उल्लेखनीय आहे. हे इथे यासाठी नमूद करावे लागत आहे, कारण यापूर्वी कुणीही मंत्री-आमदाराने या साहित्य परिषदेची दखल घेऊन असे सहकार्य केलेले नाही, जसे आज डॉ. प्रमोद सावंत साहित्य परिषदेला करीत आहेत.

इथे मुद्दामहून उल्लेख करावासा वाटतो तो सन २०१० साली वाळपई येथे भरलेल्या प्रथम अखिल गोमंतक मराठी साहित्य संमेलनाचा! त्या साहित्य संमेलनाचा फार मोठा गाजावाजा झाला होता. तत्पूर्वी सत्तरीत कधीच अखिल गोमंतक मराठी साहित्य संमेलन झाले नसल्याने प्रथमच होत असलेल्या या साहित्य संमेलनास जनतेबरोबरच स्थानिक राजकारण्यांचाही उत्स्फूर्त पाठिंबा लाभणार असा विश्वास आयोजकांस वाटला होता. त्यासाठी जास्तीत जास्त लोकांना सामावून घेण्यासाठी कार्यकारी समित्याही फार निवडण्यात आल्या होत्या. ज्या गोमंतकीय साहित्यिकाने कादंबरी लेखनात विक्रम नोंदविला आहे अशा गुरूनाथ नाईक यांना अध्यक्षपदी निवडण्यात आले होते, ते यासाठी की सदर लेखक हा मूळ सत्तरीचा आहे, त्यामुळे लोकांना अनेक अर्थाने या संमेलनाचे आकर्षण वाटून लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभेल असे वाटले होते. परंतु तसे काही न होता अक्षरशः याच्या विरुद्धच परिस्थिती पहावयास मिळाली. अर्थातच, याला राजकीय अनास्था हेच मुख्य कारण होते! डॉ. विठ्ठल वाघांसारखी कवितेच्या क्षेत्रातली अतिमहनीय व्यक्ती व्यासपीठावर असून सुद्धा तिथल्या राजकारण्यांनी आणि लोकांनीही सदर साहित्य संमेलनास तेव्हा पाठ फिरविली हे आज खेदानेच नमूद करावे लागत आहे.
उत्कृष्ट कार्यक्रमांचे आयोजन असूनही राजकारण्यांनी संमेलनाच्या व्यासपीठाकडे ढुंकूनही न पाहिल्याने सत्तरीच्या राजकारण्यांना मराठी भाषा आणि सरस्वतीच्या उपासकांची काहीही किंमत वाटत नसल्याच्या प्रतिक्रियाही अनेकांतून त्यावेळी  उमटल्या होत्या.
गोमंतक मराठी साहित्य परिषदेला स्वगृही आलेला अनुभव फारच खेदजनक आणि निरुत्साही करून टाकणारा होता, तरीही या संस्थेने त्यामुळे खचून न जाता पुन्हा एकदा नव्या जोमाने; नव्या उत्साहाने उभी होत आपले दुसरे साहित्य संमेलन नव्यानेच निर्माण झालेल्या धारबांदोडा तालुक्यात यशस्वी करून दाखविले. त्यासाठी सत्यविजय नाईक आणि तिथल्या सर्व कार्यकर्त्यांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि आस्था फार मोलाची ठरली. धारबांदोडा येथील विश्वेश्वर लाड उच्च माध्यमिक विद्यालयाच्या सुंदर आवारात ते संमेलन दिमाखदारपणे पार पडले.
सत्तरीचे ज्येष्ठ साहित्यिक-कादंबरीकार चंद्रकांत गावस यांच्या अध्यक्षतेखाली आणि साहित्य परिषदेचे ज्येष्ठ शिलेदार ऍड. भालचंद्र मयेकर यांच्या सुयोग्य मार्गदर्शनाखाली परिषद सत्तरीतूनच नव्हे तर संपूर्ण गोव्याच्या कानाकोपर्‍यातून साहित्यिक निर्माण करण्याचे आणि त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे कार्य करीत आहे. आज सत्तरीतून अनेक लेखक, कवी निर्माण होऊन साहित्याच्या क्षेत्रात चांगली वाहवा मिळवत आहेत. उद्या जर सत्तरी तालुका हा ‘साहित्यिकांची खाण’ अशी ओळख झाली तर त्यात नवल वाटायचे कारण नाही.  परंतु या सार्‍याचे श्रेय मात्र मराठी साहित्य परिषदेला द्यावेच लागेल.
 दि. १४ व १५ डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या परिषदेच्या तिसर्‍या अखिल गोमंतक मराठी साहित्य संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. प्रमोद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली कार्याध्यक्ष गजानन देसाई, कार्यवाह मनोज सावईकर, कोषाध्यक्ष उपेंद्र कर्पे आणि सर्व समित्या-उपसमित्या जोराने कार्यरत आहेत.
संमेलनाच्या अध्यक्षपदी यावेळी महाराष्ट्रातील ज्येष्ठ मराठी साहित्यिक व प्रकाशक बाबा भांड हे आहेत तर प्रमुख पाहुणे गोवा राजभाषा संचालनालयाचे संचालक डॉ. प्रकाश वजरीकर हे आहेत. संमेलनाचे उद्घाटन गोवा राज्याचे सभापती राजेंद्र आर्लेकर यांच्या हस्ते होणार आहे. त्याचबरोबर उपसभापती अनंत शेट, डॉ. प्रमोद सावंत, गजानन देसाई, उपेंद्र कर्पे, मनोज सावईकर, चंद्रकांत गावस, विठ्ठल पारवाडकर, अशोक घाडी, म्हाळु गावस आदींची व्यासपीठावर उपस्थिती राहील.
त्याचबरोबर या संमेलनाचे दुसरे प्रमुख आकर्षण म्हणजे साहित्यिक नारायण सुमंत. ते कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी असून प्राचार्य गोविंद काजरेकर आणि प्रदीप घाडी आमोणकर यांनाही ऐकण्या आणि जाणण्याची संधी या संमेलनाद्वारे मिळणार आहे. त्याचबरोबर न चुकवावे असे इतरही खूप कार्यक्रम आहेत. या दोन दिवसीय साहित्य संमेलनात खूप चांगल्या-चांगल्या कार्यक्रमांचे आयोजन असून हे साहित्य संमेलन म्हणजे साहित्य रसिकांसाठी एक फार मोठी पर्वणीच ठरणार आहे. त्यामुळे सत्तरीतीलच नव्हे, तर संपूर्ण गोमंतकातील तमाम मराठीप्रेमींनी हे साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी भरगच्च उपस्थिती दाखवणे आवश्यक आहे. रसिकांच्या तुडुंब गर्दीत हे संमेलन पार पडेल असा विश्वास वाटतो.