कोणत्या पक्षातर्फे निवडणूक लढणार हेच सांगणे अवघड
कॉंग्रेस, भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेस व मगो या चारही प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांची नावे अद्याप जाहीर न झाल्याने गेल्या बर्याच दिवसांपासून प्रचारकार्यास सुरुवात केलेल्या इच्छुक उमेदवारांना आपण कोणत्या पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढविणार आहोत हेच ठामपणे सांगणे शक्य होत नसल्याने त्यांची मतदारांसमोर गेल्यानंतर तारांबळ उडत आहे.
यापूर्वी विद्यमान आमदाराला आपण कोणत्या पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढविणार हे सांगण्याची गरज भासत नव्हती. परंतु सध्याच्या राजकीय परिस्थितीत कुणाला उमेदवारी मिळणार हे सांगणे कठीण झाल्याने उमेदवारांसमोर समस्या निर्माण झाली आहे. परिणामी राजकीय पक्षांचे महत्त्वही कमी होत आहे. एका पक्षाची उमेदवारी मिळत नसेल तर त्या उमेदवाराला दुसर्या पक्षाच्या उमेदवारीवर नजर ठेवावी लागते. त्यामुळे पक्षाच्या ध्येयधोरणांना महत्त्वच राहिलेले नाही, असे अनेक विद्यमान आमदारांचे म्हणणे आहे.
युतीचा घोळही चालूच असल्याने कोणत्याही पक्षाला उमेदवारी जाहीर करणे शक्य झालेले नाही. इच्छुक उमेदवारांनी सध्या घरोनघर प्रचारास सुरुवात केली असली तरी ते कोणत्या पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढविणार हे नंतर सांगतो असे सांगत आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रचारकार्यावर बराच परिणाम झालेला आहे.
दि. ६ फेब्रुवारीपासून उमेदवारी अर्ज सादर करण्यास सुरुवात होईल. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होण्यास आता फक्त आठ दिवस बाकी राहिले आहेत.
तीन महिन्यांपूर्वी कॉंग्रेस प्रभारी जगमितसिंग ब्रार यांनी किमान दोन महिन्यांपूर्वी उमेदवारांची नावे जाहीर करण्याचे पत्रकारांना सांगितले होते. त्यांना उमेदवारी भरण्याच्या प्रक्रियेस आठ दिवस बाकी असतानाही विद्यमान आमदारांचीही उमेदवार म्हणून जाहीर करणे शक्य न झाल्याने प्रचंड गोंधळ निर्माण झाला आहे. कॉंग्रेसच्या छाननी समितीची बैठक आज दि. ३० रोजी किंवा उद्या दिल्लीत होणार असल्याने प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष सुभाष शिरोडकर, मुख्यमंत्री दिगंबर कामत व अन्य काही नेते दिल्लीत दाखल झाले आहेत. भारतीय जनता पक्षानेही आपल्या उमेदवारांची नावे अद्याप जाहीर केलेली नाहीत. मगो भाजप युतीचा घोळ अद्याप न संपल्याने या दोन्ही पक्षांना उमेदवार जाहीर करणे शक्य झाले नसल्याचे सूत्रांनी सांगितले.