पर्रीकरांनी आमदारांवर नियंत्रण ठेवण्याची सूचना
सांतआंद्रेचे आमदार विष्णू सूर्या वाघ यांच्यावर परवा रात्री रेवोडा येथे झालेल्या प्राणघातक हल्ल्यामागे भाजप समर्थकच होते असे आरोप होत असल्याने खळबळ माजली आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी अशा प्रकारांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केल्यास राज्यात मध्यावधी निवडणुका लादण्याची शक्यता आहे. पर्रीकर यांनी जनतेने दिलेल्या कौलाचा योग्य उपयोग करून राज्य चालवावे, असा सल्ला प्रदेश कॉंग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष जॉन फर्नांडिस यांनी काल पत्रकार परिषदेत मुख्य मंत्र्याना दिला. मुख्यमंत्री पर्रीकर यांनी आपल्या आमदारांवर नियंत्रण ठेवावे अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.
राज्याच्या इतिहासात अशा प्रकारे आमदारावर हल्ला होण्याची घटना यापूर्वी घडली नव्हती. पर्रीकर यांनी आपल्या आमदारांवर नियंत्रण ठेवावे, असे आवाहन फर्नांडिस यांनी केले. राज्याची आर्थिक स्थिती कोलमडलेली असताना मध्यावधी निवडणूक गोव्याला परवडणारी नाही. आपला पक्ष विधान सभेत विधायक भूमिका बजावीत असल्याचे ते म्हणाले. वाघ हे आमदार आहेत. त्यांच्यावर झालेला हल्ला दुर्दैवी असून या घटनेचा फर्नांडिस यांनी निषेध केला व मुख्यमंत्री पर्रीकर यांनी गृहमंत्री या नात्याने आरोपीवर कारवाई करण्यास पोलिसांना स्वातंत्र्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. सरकारी मालमत्तेची नुकसानी करण्याचा कुणालाही अधिकार नाही, असे ते म्हणाले. भाजप समर्थकांनीच आपल्यावर हल्ला केल्याचे वाघ यांनी सांगितले आहे, असेही त्यांनी एका प्रश्नावर सांगितले.