सार्वजनिक बांधकाम खात्याचे सरकारला पत्र
जुवारी पूल मोडकळीस आलेला असून त्याची दुरुस्ती करण्याचे काम हाती घ्यावे, अशी सूचना करणारे एक पत्र सार्वजनिक बांधकाम खात्याने सरकारला पाठवले असल्याचे खात्यातील सूत्रांनी काल सांगितले.
सदर पुलाची दुरुस्ती करणे आवश्यक असून ती न केल्यास पुलाला धोका निर्माण होऊ शकतो, असे सदर पत्रातून नमूद करण्यात आले असल्याचे सूत्रांनी पुढे सांगितले.
पुलाची शेवटची दुरुस्ती २००२ साली करण्यात आली होती. तद्नंतर मात्र पुलाची दुरुस्ती करण्यात आलेली नसल्याने आता दुरुस्तीकाम हाती घ्यावे, अशी सूचना करणारे पत्र सरकारला पाठवण्यात आले असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.
यासंबंधी बोलताना सार्वजनिक बांधकाम खात्याचे विशेष मुख्य अभियंते जे. एस. एस. रेगो म्हणाले की, दरवर्षी पुलाची पाहणी करण्यात येते. चालू वर्षीही पुलाची पाहणी करण्यात आली असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, यासंबंधी सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री चर्चिल आलेमाव यांना विचारले असता ते म्हणाले की, जुवारीवर एक पर्यायी पूल बांधण्याची गरज आहे. मात्र, टोलाच्या प्रश्नावरून राष्ट्रीय महामार्ग १७ चे काम अडून पडल्याने इच्छा असूनही आपण नव्या पुलाचे काम हाती घेऊ शकत नाही. विरोधी पक्ष नेते मनोहर पर्रीकर व वीजमंत्री आलेक्स सिल्वेरा यांनी टोलाच्या प्रश्नावरून लोकांना भडकावून राष्ट्रीय महामार्गाचे काम अडवून ठेवल्याचा आरोपही त्यांनी केला.