पर्वरी येथे ग्रीन हिल्स कॉलनी येथे आपण ७२ लाख रु. खर्चून जी जमीन विकत घेतलेली आहे त्यात कोणताही भ्रष्टाचार नसून सगळा व्यवहार पारदर्शक व कायदेशीर असल्याचे सभापती राजेंद्र आर्लेकर यांनी काल पर्वरी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
जमीन विकत घेण्यासाठी आपण स्टेट बँकेकडून ५७ लाख रु. चे कर्ज घेतलेले आहे. तर उर्वरीत १५ लाख रु. आपल्या बचतीतून खर्च केल्याचे नवी दिल्ली येथील डी. पी. कामत यांच्याकडून आपण सदर जमीन विकत घेतलेली असून धनादेशाद्वारे त्यांचे पैसे फेडले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
आपल्या तसेच आपली पत्नी अनघा आर्लेकर अशा दोघांच्या नावावर हे कर्ज घेतले असल्याचे ते पुढे म्हणाले. सर्व पैसे धनादेशाद्वारेच फेडण्यात आलेले आहेत. पुढे बोलताना ते म्हणाले की, भ्रष्टाचार करून कमावलेल्या काळ्या पैशातून ही जमीन खरेदी करण्यात आल्याचा आपणावर जो आरोप केला जात आहे तो खोटा व निराधार आहे, असे त्यांनी नमूद केले.
२०१०-११ या वर्षाच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी आपण सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राच्या आधारावर आपणावर हे आरोप करण्यात आले असल्याचे सांगून सध्या २-३ वर्षांच्या काळानंतर आपले उत्पन्न जरा वाढले आहे. सभापती म्हणून आपणाला मिळणारे वेतन, मानधन तसेच उद्योगधंदा यातून आपणाला हे उत्पन्न मिळत आहे. शिवाय आपली पत्नी शिक्षिका असून तिला वेतन मिळत असल्याची माहिती त्यांनी दिली.
आयरिशनी चर्चा करायला हवी होती
ऍड. आयरीश रॉड्रिग्ज यांनी आपणावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यापूर्वी आपली भेट घेऊन शंका निरसन करायला हवे होते. पण त्याऐवजी त्यांनी प्रसारमाध्यमे व सोशल मिडियात आपली बदनामी केली. पण जर अजूनही त्यांचे समाधान झालेले नसेल तर ते आपणाविरुद्ध कुठेही जाऊन तक्रार करायला मोकळे असल्याचे आर्लेकर यांनी स्पष्ट केले. विक्री प्रक्रियेसंबंधी ऍड. रॉड्रिग्स यांच्या मनातील शंकेचे निरसन करण्यासाठी त्यांनी कधीही आपली भेट घेतली नसल्याचेही ते म्हणाले. आपली बदनामी करून आपली राजकीय कारकीर्द संपवण्याच्या उद्देशानेच त्यांनी आपणावर भ्रष्टाचाराचे आरोप केले असावेत, असे ते पुढे म्हणाले. या प्रकरणी विधानसभेत हक्कभंगाची सूचना दाखल करण्याचा तसेच अब्रु नुकसानीचा खटला दाखल करण्याचा आपला विचार असल्याचे ते म्हणाले. आयरीश यांच्या वरील कृतीने सभापती पदाचीही बदनामी झाल्याचे ते म्हणाले.
परुळेकर, आर्लेकरांच्या राजीमान्याची मागणी
भ्रष्टाचाराचा आरोप झाल्याने सभापती राजेंद्र आर्लेकर व पर्यटन मंत्री दिलीप परुळेकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशा मागणीचे एक निवेदन गोवा सुराज पक्षाने राज्यपाल भारतवीर वांछू यांना काल सादरकेले. दिलीप परुळेकर व राजेंद्र आर्लेकर या दोघांविरुद्ध चौकशी चालू असून या पार्श्वभूमीवर वरील द्वयींनी राजीनामा द्यावा, अशी मागणी गोवा सुराज पक्षाने केली आहे. दिलीप परुळेकर यांच्याविरुद्ध गोवा पोलिसांनी एफआयआर दाखल केले असल्याचेही राज्यपालाना सादर केलेल्या निवेदनातून पक्षाने नजरेत आणून दिले आहे.
राज्यपाल भारतवीर वांछू यांनी यात लक्ष घालण्याचे आश्वासन दिले असल्याचे पक्षाचे सचिव व अध्यक्ष (युवा व्यवहार) सावियो रॉड्रिग्ज यांनी सांगितले.