घुमटप्रेमी अवलिया सूरज पिंगे

0
18
  • – अश्वेता अशोक परब

नव्या आरत्यांना आकार देताना नेहमी मनात देवतेप्रती समर्पित भाव असावा, आरतीची संकल्पना स्पष्ट असावी, यास ओळींची अथवा शब्दांची बंधने असू नयेत तसेच पाल्हाळपणादेखील टाळावा. मात्र सांगीतिकदृष्टीने मुखडा, अंतरा, ध्रुपद, जलद, दृगुण या गोष्टी लक्षात घ्याव्यात.

मनातील कल्पकता, प्रसंगासंदर्भातील सत्यता नि भक्ताच्या ठायी दाटलेली आर्तता यांचा त्रिवेणी संगम म्हणजे आरती. साहित्याच्या प्रांगणी स्वच्छंद वावरणार्‍या या पद्य प्रकाराला अगदी संगीत विशारद, साहित्य जाणकार ते सामान्य घरातील इवल्या चिमुकल्यांच्या मनातही अढळ पद आहे. आज गोव्यातील तरुणाईच्या रूपाने आरती प्रत्येक घराचा, दैनंदिन जीवनाचा भाग बनलेली आहे. आरती जाती, धर्मादी भेद करत नाही, असे विचार आरती विश्वात सुमारे दोन तपे वावरणार्‍या सूरज पिंगे यांनी विशद केले.

मूळ पिर्ण गावचे असलेले सूरज हे उच्च माध्यमिक शिक्षणाकरिता आपल्या आजोळी तळावली या गावी राहिले. त्यांच्या घरी त्यांचे काका घुमट वाजवत असत, त्यामुळे घरातून हा वारसा त्यांच्यात रुजू पाहात होता. मात्र वय लहान असल्याने त्यावर शिक्कामोर्तब झाले नव्हते. पुढे आजोळी आल्यावर तेथे सुरू असणार्‍या आरतीच्या सरावावेळी घुमटाची थाप त्याच्या कानी आली आणि कुतूहलाने त्या दिशेने झेपावलेल्या सूरजच्या आयुष्याची अविभाज्य भाग बनून गेली. येथूनच सूरज आरती विश्वात प्रवेशकर्ते झाले. सुरुवातीच्या प्रवासात त्यांना त्यांच्या आजीकडून पाठबळ मिळाले आणि त्याचमुळे या आरतीप्रेमाचा इवल्याशा रोपट्यापासून सुरू झालेला प्रवास अजस्त्र वृक्षात झाला.

त्यांच्या स्वतंत्र कारकिर्दीला सुरुवात म्हणावी असे ते सुवर्ण साल अर्थात २००३. यावेळी त्यांनी दुर्गेच्या पारंपरिक आरतीला स्वतंत्र चाल लावली. तेथून आरतींना चाल लावता लावता लेखणी त्यांच्या हाती आली. घुमटाच्या साथीने त्यांचे शब्द फुलू लागले. मात्र हे शब्द कागदावर येण्याला विशिष्ट ठरलेली वेळ नसे. अगदी गाडी चालवत असताना, एखाद्या आनंदाच्या क्षणी अथवा नुसता संध्याकाळी चहाचा कप हाती असल्यावर अशा गाफील क्षणी शब्दांची मनात चकमक होते आणि सुंदरसे काहीतरी कागदावर उतरते, अशी मिस्कील टिप्पणी सूरज आपल्या लेखनप्रवासाविषयी सांगताना करतात.

असे असले तरी घुमट आरती लिहिताना, बसवताना विशेष शिस्तीचे पालन व्हावे असा त्यांचा आग्रह असतो. घुमट या वाद्याविषयी त्यांच्या मनात विशेष आस्था आहे. त्यांच्याच शब्दात सांगायचे झाल्यास, घुमट ह्रदयाला भिडवून वाजवले जाते, ते तुमच्या व्यक्तिमत्त्वाशी एकरूप होते आणि तुमच्या आत्मविश्वासाला विलक्षण तेज प्रदान करते. नव्या आरत्यांना आकार देताना नेहमी मनात देवतेप्रती समर्पित भाव असावा, आरतीची संकल्पना स्पष्ट असावी, यास ओळींची अथवा शब्दांची बंधने असू नयेत तसेच पाल्हाळपणादेखील टाळावा. मात्र सांगीतिकदृष्टीने मुखडा, अंतरा, ध्रुपद, जलद, दृगुण या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. त्यात येणार्‍या संदर्भांची सत्यता पूर्णपणे पडताळून घेणे हे आरतीकाराचे कर्तव्य आहे. कारण या आरती लोकांसमोर सादर होणार्‍या असतात आणि अशावेळी चुकीचा शब्द अथवा अर्थामुळे लोक दुखावू नयेत याची काळजी प्रत्येक आरतीकाराने घ्यावी. आरती स्वच्छंद प्रकारात मोडत असली तरी तिचे मूळ ऐतिहासिक संदर्भांशी जोडलेले आहे हे नेहमी लक्षात ठेवून काम करावे.

नव्या आरतींच्या लेखनाला मुळात सुरुवात स्पर्धेच्या व्यासपीठावर झाली. अर्थात जुन्या काळातील स्पर्धांमध्ये दिलेली वेळ पाळण्यासाठी पारंपरिक आरतीमधून काही ठराविक आणि आकाराने लहान आरतींची निवड होत असे. परिणामी आरतींची पुनरावृत्ती होई. म्हणून नव्वदच्या शतकात नवीन आरती रचण्याचा प्रयोग काही मंडळींनी केला आणि तो यशस्वी झाला. नावीन्याने लोक प्रभावित झाले आणि हळूहळू ही पद्धत सर्वांच्या अंगवळणी पडली.

आज गोव्याच्या कानाकोपर्‍यात रोज नवे गट बनत असतात, नव्या आरती लिहिल्या जातात, त्या सादर केल्या जातात, त्यांना पारितोषिके मिळतात. सूरज यांनी आपले काम सांभाळून, गोव्यात व गोव्याबाहेर कार्यरत असताना अक्षरक्षः भ्रमणध्वनीच्या आधारे कितीतरी आरत्या लिहून पाठवल्या, त्या बसवल्या.
आजच्या घडीला त्यांच्या नावे तीनशेहून अधिक लिखित आरत्या आणि गोवाभरात पन्नासहून अधिक गटांना शिकविल्याची विक्रमी नोंद आहे. शिवाय या प्रवासात अधिकाधिक भर पडतच आहे. या नव्या आरत्या आकारताना अनेकदा समस्यादेखील येतात. त्या अशा की लिहिणार्‍याच्या आजूबाजूला नकारात्मक वातावरण असणे किंवा मेंदू, भावनांवर अधिक ताण आल्याने न सुचणे. तसेच महत्त्वाची समस्या म्हणजे एखाद्या संदर्भाविषयी माहितीचा अभाव अथवा संशोधनाचा अभाव. मात्र या गोष्टी घडत असतानादेखील एकाग्रता न सोडणे, स्वतःवर नि जिच्यावर आरती रचतो आहोत त्या देवतेच्या चरणी पूर्णतः समर्पित होणे ही सफलतेची गुरूकिल्ली ठरू शकते. यात पुन्हा अनेक नवीन आरत्यांची निर्मिती होत असता पारंपरिक आरत्यांच्या अस्तित्वाला ठेच पोहोचणार नाही याची काळजी मंडळं, आयोजक घेत असतात. प्रत्येकी किमान एक पारंपरिक आरती सादर झालीच पाहिजे असा त्यांचा नियम असतो. याद्वारे नव्यांबरोबरच जुनेदेखील आत्मसात करतात. तसेच नव्या आरतीकारांनी देवापुढे समर्पित होण्याचा भाव, लोकभावना जपण्याची जबाबदारी तसेच हा संस्कृतीचा वसा पुढे नेण्याचा निर्धार मनी बाळगून पुढे जावे अशा भावनेतून सूरज नवआरतीकरांना नेहमीच प्रोत्साहित करतात.