संकेत

0
27
  • – प्रा. संदेश राघोबा नाईक-गावकर

कोणत्याही संकेताविषयी विचार-मंथनाशिवाय स्पष्ट अभिप्राय देता येत नाही. देवळात जाऊन गर्भकुडीतील देवमूर्तीला आपण नमस्कार करतो, तसेच मन-मंदिरातील पवित्र संकेताला आपण विनम्रपणे नमस्कार करावा. कारण संकेत योग्य वेळी स्वीकारला तरच आपले रक्षण होते.

संकेत हा इशारा असतो. तो कधी दृश्य असतो तर कधी अदृश्य असतो. माणसाचे विचार-चक्र चोवीस तास चालू असते. निर्णय घेण्याचा संकेत त्याला कसा मिळतो? प्रत्येक निर्णयाला त्याला कितीतरी पर्याय उपलब्ध असतात. ‘हेम्लेट’ या शेक्सपिअरच्या नाटकात ‘टू डू ऑर नॉट टू डू’ अर्थात ‘करावे अथवा न करावे’ या संकेताचा संघर्ष शेवटपर्यंत चालू असतो. तोच तर या नाटकाचा केंद्रबिंदू असतो. कोणताही निर्णय घेताना माणसाला अंतर्गत संकेत मिळत असतो. संकेत मिळाला तरी लगेच कृती घडत नाही. आतल्या आत विचारांचे आंदोलन चालूच असते.

आपल्या जीवनाला वेगळेच वळण देण्याचे डाव थोडे आपले हितशत्रू खेळत असतात. आपल्या मनातला परमेश्‍वर आपल्याला दुसर्‍याच दिशेने जाण्याचा संकेत देत असतो. आपला निर्णय अगोदर अदृश्य आणि गुप्त असतो; पण जेव्हा त्याला आपण दृश्य आणि प्रकट स्वरूप देतो तेव्हाच तो आपल्याविरुद्ध चक्रव्यूह रचणार्‍यांना कळून येतो. त्यांचा अपेक्षाभंग होतो, कारण त्यांच्या मनातील अपेक्षित डाव फसतो. खरे म्हणजे परमेश्‍वराने आपल्याला योग्य संकेत देऊन हितशत्रूंच्या जाळ्यातून सोडवलेले असते. तरीही त्यांचे डाव थांबत नाहीत. परत आपल्याला अडकवण्याचे डाव सुरू होतात. आपले मित्र व जिवलग बनण्याचे ढोंग करून ते आपल्या जवळ येतात. वेगवेगळे सल्ले देण्याचे काम ते सुरू करतात. प्रत्येक सल्ल्यामागे त्यांचा दुहेरी व दुटप्पी हेतू असतो.
आपण चटकन होणार देऊ नये. आपण ऐकत असतानादेखील आपल्या संकेताचा गुरू आपल्या मनात जागृतच असतो. तो संकेत देतच असतो आणि आपल्या ओठांतून शब्द बाहेर पडत नाहीत. कारण होकारावर अथवा नकारावर त्याचेच नियंत्रण असते. हे ज्ञान तो प्रसंग संपल्यावर आपल्या लक्षात येते.

आपल्याला आश्‍चर्य वाटते की, असे अंतर्गत संकेत आपल्याला कसे बरे मिळतात? आपले बरोबर आहे का चूक आहे याविषयी दुसर्‍याचे मत जाणून घेण्याची आपल्याला गरज असत नाही. कारण दुसरा निःपक्षपातीपणे मत देईल याचा भरवसा नसतो. विश्‍वास कोणावर ठेवावा हे ठरवतानादेखील आपल्या मनाची चलबिचल होते.

एकेका माणसाच्या संपर्कात आल्यावर त्याचे वेगवेगळे विचार, वेगवेगळ्या वेळी आपण ऐकत असतो. त्या सगळ्या विचारांची सांगड घालून ते व्यक्तिमत्त्व आपण तपासतो तेव्हा कितीतरी त्या माणसाचे दोष आपल्याला जाणवतात. आता त्या माणसाला चांगले म्हणावे की वाईट म्हणावे याविषयी आपला गोंधळ उडतो. कारण नकारात्मक गुणांची बेरीज जास्ती येते. अशा माणसांनी दिलेले संकेत मानले तर त्याचे दुष्परिणाम लगेच दिसायला लागतात. म्हणून संकेत स्वीकारताना आपल्याला खूपच सावध राहावे लागते.

सावधगिरी बाळगताना कोणाकोणावर संशय घ्यावा व कोणाकोणावर घेऊ नये हे ठरवतानादेखील आपण संपूर्णपणे गोंधळून व चक्रावून जातो. कधी संकेताच्या बाबतीत आपल्याहून वयाने लहान असलेला भाऊ किंवा लहान बहीण आपल्याला योग्य संकेत देईल, तर कधी ज्याला आपण बोट पकडून चालायला शिकवले ते आपले लहान मूलच आपल्याला योग्य संकेत देईल. आईवडिलांचा संकेत हा तर शिरसाष्टांग नमस्कार घालण्याइतपत पवित्र असतो. पण हे ज्ञान आपल्याला वेळ टळून गेल्यावर फार उशिरा प्राप्त होत असते.

महाभारत युद्धातील श्रीकृष्णाचे संकेत अनाकलनीय आणि गूढ होते. कौरव-पांडवांमधील महायुद्ध टाळण्यासाठी धृतराष्ट्राकडे शिष्टाई करण्यासाठी श्रीकृष्ण आले, पण दुर्योधनाने त्याचे सगळे संकेत धुडकावून दिले. ‘पाचही पांडवांना राहण्यासाठी एक गाव द्या. ते तिथे सुखाने राहतील. तुमचे राज्य नको. ते तुम्हीच चालवा’ हा संकेत नाकारताना दुर्योधन म्हणाला ः ‘सुईच्या अग्रावर मावेल इतकीदेखील जमीन पांडवांना मिळणार नाही!’ हा अवाजवी आणि आत्मघातकी दुराग्रही आवेशच दुर्योधनासाठी महाशत्रू बनला हे सत्य नंतर प्रकट झालेच.

डोळ्यांवरील व्रतस्थ पट्टी सोडवून नग्न दुर्योधनाला गांधारी माता आशीर्वाद देताना श्रीकृष्णाने पौरुषत्वाची लज्जा राखून तेवढाच भाग झाकण्याचा संकेत दुर्योधनाला अगोदरच दिला आणि दुर्योधनाने तो मानला. पट्टी सोडल्यावर गांधारी मातेने दुर्योधनाचे जेव्हा दर्शन घेतले तेव्हा तिने म्हटले, ‘घात झाला!’ कारण झाकलेल्या भागाला चिरंजीवपणाचा वर नाही मिळाला.
जेव्हा भीम आणि दुर्योधन यांच्यामध्ये गदायुद्ध सुरू झाले तेव्हा भीमाच्या गदेचे कित्येक प्रहार दुर्योधनाच्या शरीरावर होऊनदेखील ते निरुपयोगी ठरले तेव्हा श्रीकृष्णाने हाताने इशारा देऊन भीमाला अचूक संकेत दिला. त्यानुसार मांडीवर योग्य जागी प्रहार करताच दुर्योधनाचा शेवट झाला.

कोणत्याही संकेताविषयी विचार-मंथनाशिवाय स्पष्ट अभिप्राय देता येत नाही. देवळात जाऊन गर्भकुडीतील देवमूर्तीला आपण नमस्कार करतो, तसेच मन-मंदिरातील पवित्र संकेताला आपण विनम्रपणे नमस्कार करावा. कारण संकेत योग्य वेळी स्वीकारला तरच आपले रक्षण होते. संकेताच्या कृतीची वेळ जर टळून गेली तर सगळाच अनर्थ आपल्याच डोळ्यांनी आपल्याला पाहवा लागेल. म्हणून वेळीच सावध होणे आपल्या हिताचे असते.