Home बातम्या गोंयच्या सायबाचे फेस्त उत्साहात

गोंयच्या सायबाचे फेस्त उत्साहात

0
जुने गोवे येथील गोंयच्या सायबाचे वार्षिक फेस्त काल उत्साहात साजरे करण्यात आले. काल दिवसभरात हजारोंच्या संख्येने देशविदेशातील भाविकांनी उपस्थिती लावली. कालच्या प्रमुख प्रार्थनासभेचा उपदेशपर संदेश कारवारचे बिशप डॅरिल फर्नांडिस यांनी दिला. यावेळी वेदीवर गोव्याचे आर्चबिशप फिलिप नॅरी फेर्रांवही उपस्थित होते.

पहाटेपासून सुरू झालेल्या विविध भाषांतील प्रार्थना सभा संध्याकाळी उशिरापर्यंत चालल्या होत्या. यात सकाळच्या सत्रातील प्रमुख प्रार्थना सभेला राज्यपाल भारतवीर वांच्छू, आमदार विष्णू सूर्या वाघ, पांडुरंग मडकईकर, रोहन खंवटे, फ्रान्सिस सिल्वेरा या आजी-माजी आमदारांची मंडपात उपस्थिती होती.
या पारंपरिक फेस्तानिमित्त राज्यातील भाविक पहाटेपासूनच जुने गोवे येथे गर्दी करू लागले. सोमवारी रात्रीही भाविक येथे उपस्थित होते. सकाळ ते संध्याकाळपर्यंत गोंयच्या सायबाच्या दर्शनासाठी बर्‍याच मोठ्या रांगा दिसून आल्या. ख्रिश्‍चन बांधवांबरोबर इतर धर्मियही अशा रांगात उभे होते.
मोठ्याप्रमाणात येथे दाखल होणार्‍या भाविकांची कोंडी होऊ नये म्हणून आयोजन समितीतर्फे येथे सर्व ती उपाय योजना वेळीच करण्यात आली होती. यात पोलीस यंत्रणेचेही मोठे योगदान होते. वाहतूक व्यवस्था, पार्किंग, गर्दीवरील नियंत्रण यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस येथे तैनात केले होते.