भारताच्या अण्वस्त्रधारी पृथ्वी २ क्षेपणास्त्राची काल यशस्वी चाचणी घेण्यात आली. उदिशातील चंडीपूर चाचणी केंद्रात ३५० कि.मी. पल्ल्याच्या या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली. हे क्षेपणास्त्र पूर्णपणे भारतीय बनावटीचे आहे.
जमिनीवरून जमिनीवर मारा करणार्या या अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्राची चाचणी काल सकाळी १०.५ वा. घेण्यात आल्याचे व ती पूर्णपणे यशस्वी ठरल्याचे आयटीआरचे संचालक एम. व्ही. के. व्ही. प्रसाद यांनी काल सांगितले. क्षेपणास्त्र ५०० ते १ हजार किलो दारूगोळा नेऊ शकते. दुहेरी इंजिनची सुविधा असलेली ही क्षेपणास्त्रे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त आहेत. याच क्षेपणास्त्राची याआधी ७ ऑक्टोबरला चाचणी घेण्यात आली होती. ‘पृथ्वी’ या साखळीतील क्षेपणास्त्रे २००३पासून संरक्षण दळांच्या सेवेत आहेत.