गरज पडल्यास फोगट खूनप्रकरण सीबीआयकडे

0
10

>> मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती

>> हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनीही केली विनंती

भाजप नेत्या तथा अभिनेत्री सोनाली फोगट यांच्या खूनप्रकरणाचा तपास तशी आवश्यकता भासल्यास निश्‍चितच सीबीआयकडे सोपवण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल पत्रकारांशी बोलताना दिली.

भाजप नेत्या सोनाली फोगट यांची खूनप्रकरणाची कसून चौकशी केली जावी व त्यासाठी गरज भासल्यास हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात यावे, अशी आपणाला हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनीही विनंती केली आहे. हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याची गरज आहे असे दिसून आल्यास सरकार या प्रकरणाचे तपासकाम सीबीआयकडे सोपवेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

फोगट कुटुंबीयांनी घेतली हरियाणा मुख्यमंत्र्यांची भेट
सोनाली फोगट यांच्या कुटुंबियांनी काल हरियाणाचे मुख्यमंत्री श्री. खट्टर यांची भेट घेऊन सोनाली फोगट खूनप्रकरणी आम्हाला न्याय मिळावा, अशी मागणी त्यांच्याशी केली. या पार्श्‍वभूमीवर श्री. खट्टर यांनी आपणाशी संपर्क साधून या खून प्रकरणाच्या तपासासंबंधी आपणाशी चर्चा केली. तसेच गरज भासल्यास हे प्रकरण चौकशीसाठी सीबीआयकडे सोपवण्यात यावे, अशी आपणाला विनंतीवजा सूचना केल्याचे ते म्हणाले.

योग्य दिशेने तपास
गोवा पोलिसांनी या प्रकरणी योग्य दिशेने तपास केलेला असून आतापर्यंत ५ संशयितांना अटक केलेली आहे. त्यात अमली पदार्थांचा पुरवठा करणार्‍या आरोपीचाही समावेश आहे. ज्या संशयितांचा खुनात प्रत्यक्ष सहभाग व अप्रत्यक्ष संबंध आहे अशांना अटक केल्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. याप्रकरणी गोव्याचे पोलीस महानिरीक्षक ओमवीर सिंग बिष्णोई यांच्या नेतृत्वाखाली तपासकाम चालू असल्याचे सावंत यांनी स्पष्ट केले.

आरोपींना कडक शिक्षा
या खून प्रकरणातील सर्व आरोपींना कडक शिक्षा होण्याची गरज असून सर्वांना कठोर शिक्षा होईल यासाठी सरकार सर्व ते प्रयत्न करणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. भविष्यात असे प्रकार सहन करणार नसल्याचेही ते म्हणाले.

निसर्ग सौंदर्यासाठी गोव्यात या
गोव्यात येणार्‍या पर्यटकांची अमली पदार्थांसाठी नव्हे तर येथील निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी गोव्यात यावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना काल केले.

क्लब सील
हणजूण पोलिसांनी केलेल्या तपासात कर्लीस क्लबच्या शौचालयात २.२० ग्रॅम मेथांपेटामाईन ड्रग्ज सापडल्याने हा क्लबही सील करण्यात आला आहे. या प्रकरणी अटकेत असलेल्या सुधीर आणि सुखविंदर यांची कसून चौकशी केल्यानंतर कर्लिस क्लबमधील ड्रग्ज प्रकरणही समोर आले. संशयित सुधीर आणि सुखविंदर हे सोनाली यांना घेऊन २२ ऑगस्टला रात्री ८ वाजता कलिंस क्लबमध्ये निघाले होते. तत्पूर्वी ग्रॅण्ड लिओनी हॉटेलचा रुमबॉय तथा ड्रग्ज पेडलर दत्तप्रसाद गावकर याला त्यांनी ड्रग्जची व्यवस्था करण्याची विनंती केली होती. हे अमली पदार्थ घेऊन ते क्लबमध्ये गेले. तिथेच त्यांनी पेयात ते मिसळून सोनाली यांना पाजले अशी कबुली संशयितांनी दिली होती.

संशयितांविरोधात गुन्हा
पोलिसांनी क्लबमधील शौचालयात तपास केला असता क्लबच्या शौचालयात २.२० ग्रॅम मेथांफेटामाईन सापडला. याची दखल घेऊन पोलिसांनी शनिवारी पहाटेच्या सुमारास दत्तप्रसाद आणि तुनीस यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. दत्तप्रसाद गावकर याच्याकडे हणजूण येथील रामदास मांद्रेकर याने ड्रग्ज आणून दिल्याचे समोर आल्यानंतर शनिवारी रात्री चौकशी करून रामदास यालाही अटक करण्यात आली आहे. त्यानंतर क्लबमध्ये ड्रग्ज सापडणे, तेथे ड्रग्जचा खुलेआम वापर करण्यास देणे आणि ड्रग्जचा पुरवठा करणे या आरोपांखाली गुन्हा नोंदवत अटक केली.

कर्लिसचा मालक, ड्रग्ज पेडलर्सना पाच दिवसांची पोलीस कोठडी
सोनाली फोगट यांचा खून ड्रग्ज देऊन केल्याचे उघड झाले आहे. हे ड्रग्ज पुरवल्याप्रकरणी हणजूण येथील कर्लीस बीच क्लब रॉकचा मालक एडवीन नुनीस याच्यासह ड्रग्ज पेडलर्स दत्तप्रसाद गावकर (रा. सोनाळ, वाळपई) आणि रामदास मांद्रेकर (रा. हणजूण) यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पाचजणांना अटक
भाजप नेत्या तथा अभिनेत्री सोनाली फोगट यांच्या खूनप्रकरणी पोलिसांनी काल पाचव्या संशयिताला अटक केली आहे. रामदास मांद्रेकर याला काल रविवारी सकाळी पोलिसांनी रुमबॉय दत्तप्रसाद गावकर याला ड्रग्ज पुरवल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. दत्तप्रसाद गावकर याला रामदास याने अमली पदार्थ पुरवल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी दत्तप्रसाद याला ताब्यात घेऊन अटक केली. यापूर्वी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. सुधीर सांगवान आणि सुखविंदर हे या प्रकरणात आरोपी आहेत.