गुलाम नबींचा गोळीबार

0
43

कॉंग्रेस पक्षासाठी आपले अवघे आयुष्य दिलेले गुलाम नबी आझाद यांनी नुकतीच पक्षाला औपचारिक सोडचिठ्ठी दिली. त्यांनी नुसताच राजीनामा दिला नाही, तर त्या चार पानांच्या खरमरीत पत्रामध्ये पक्षनेतृत्वाला अत्यंत बोचरे खडेबोलही सुनावले आहेत. खरे तर पक्षाचे दुसरे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांच्या राजीनाम्याआधीच गुलाम नबींचा पक्षत्याग निश्‍चित झालेला होता, परंतु कॉंग्रेस पक्षात पन्नास वर्षे पूर्ण होण्याचा दिवस त्यांनी औपचारिक राजीनाम्यासाठी निवडला होता, त्यामुळे २६ ऑगस्टला त्यांनी पक्षाला औपचारिक रामराम ठोकला. दोन वर्षांपूर्वी सोनिया गांधींना पत्र लिहून पक्षसंघटनेमध्ये आमूलाग्र बदलाची अपेक्षा करणारी ही सगळी मंडळी पक्षात बाजूला फेकली गेली आहेत आणि त्यामुळे एक तर अपमान पचवत पक्षात राहणे किंवा पक्षाला रामराम ठोकणे हे पर्याय त्यांच्यापुढे राहिले आहेत. त्यामुळे आनंद शर्मा, गुलाम नबी आझाद यांच्याप्रमाणेच या २३ बंडखोरांपैकी उरलीसुरली मंडळीही लवकरच बाहेरची वाट धरतील.
कॉंग्रेसला लागलेल्या या गळतीचा सविस्तर उहापोह आम्ही यापूर्वीही अनेकदा केला आहे. एखादा नेता बाहेर पडतो तेव्हा पक्षनेतृत्वाच्या सगळ्या मर्यादा समोर येतात. गुलाम नबींनी आपल्या राजीनामापत्रात तर राहुल गांधींच्या अकार्यक्षमतेची लक्तरेच वेशीवर टांगली आहेत. गेली आठ वर्षे गंभीर नसलेले नेतृत्व पक्षाच्या अधोगतीस कारणीभूत ठरले आहे एवढेच सांगून ते थांबलेले नाहीत, तर पक्षातील महत्त्वाचे निर्णय राहुल गांधी यांच्या जवळचे कोंडाळे आणि अगदी त्यांचे स्वीय सहायक आणि सुरक्षा रक्षक घेऊ लागले आहेत अशीही घणाघाती टीका त्यांनी केलेली आहे.
खरे तर कॉंग्रेसचे पुनरूज्जीवन करण्याची भीमगर्जना करीत राहुल गांधी यांनी येत्या सप्टेंबरपासून आपल्या महत्त्वाकांक्षी भारत जोडो यात्रेची घोषणा केलेली आहे. देशात कॉंग्रेसने आजवर कधीही काढली नाही अशी २२ राज्यांतून जाणारी ही यात्रा काढण्याची घोषणा केलेल्या राहुल यांना भारत जोडायला निघण्याआधी कॉंग्रेस जोडा असे सुनवायलाही गुलाम नबींनी कमी केलेले नाही.
पक्षातील आपल्या आणि जी -२३ संबोधल्या जाणार्‍या बंडखोरांच्या गटातील सहकार्‍यांच्या उपेक्षेला त्यांनी राहुल आणि त्यांच्याभोवतीच्या कोंडाळ्याला जबाबदार धरले आहे. आम्ही केलेल्या सूचनांवर पक्षात चिंतन होण्याऐवजी अपशब्द, मानखंडना, अपमान आणि बदनामी केली गेली इथपासून ते राहुल गांधींची भेटही दुरापास्त झाली आहे इथपर्यंत त्यांनी जे जे आरोप लगावले आहेत, त्यातून भारतीय जनता पक्षाच्या अश्‍वमेधापुढे गलितगात्र झालेल्या कॉंग्रेसमध्ये नेमके काय चालले आहे ते सगळ्या जगासमोर आले आहे.
राजकीयदृष्ट्या तर कॉंग्रेसची धुळधाण झाली आहेच. देशात एकेकाळी अधिराज्य गाजवणारी कॉंग्रेस आज केवळ दोन राज्यांत सत्तेवर उरली आहे आणि अन्य दोन राज्यांत सत्ताधारी आघाडीत सामील आहेत. नरेंद्र मोदींचा केंद्रीय राजकारणात उदय झाल्यापासून लोकसभेच्या २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकांत तर कॉंग्रेस पक्षाचा मानहानीकारक पराभव झालाच, परंतु २०१४ पासून २०२२ पर्यंतच्या या काळामध्ये कॉंग्रेस पक्ष त्याने लढवलेल्या ४९ विधानसभा निवडणुकांपैकी तब्बल ३९ निवडणुका हरला आहे.
दुसरीकडे संघटनात्मकदृष्ट्याही पक्षाची पडझड चालली आहे.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर जी विस्तारीत कार्यसमितीची बैठक झाली, ती अर्ध्यावर सोडून तत्कालीन पक्षाध्यक्ष राहुल गांधी बाहेर पडले होते. पराभवाची जबाबदारी स्वतःवर न घेता त्यांनी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनाच आपल्या संघर्षात सामील न झाल्याचा दोष दिला होता. या सार्‍या विषयाला असलेली राहुल यांची दुसरी बाजूही विचार करण्यासारखी आहे. नरेंद्र मोदींविरुद्ध राहुल गांधींनी जेव्हा जेव्हा आक्रमक भूमिका घेतली तेव्हा कॉंग्रेसमधील ह्या ज्येष्ठ नेत्यांनी स्वतः त्यापासून अलिप्त ठेवणेच पसंत केले हेही तितकेच खरे आहे. भाजप आपल्यामागे हात धुवून लागेल, ईडीपासून सीबीआयपर्यंतचा ससेमिरा सोसावा लागेल ही भीतीही अर्थात त्यामागे असावी. पी. सी. चिदंबरम सारखे जे नेते आक्रमक झाले, त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागले. त्यामुळे कॉंग्रेस नेतृत्वाला सल्ले देणारी आणि राजकीय संघर्षात मात्र स्वतः सावध भूमिका घेत कुंपणावर राहिलेली ही सगळी मंडळी आहेत हेही येथे लक्षात घ्यावे लागते. परंतु त्यांनी पक्षनेतृत्वाच्या ज्या मर्यादा जगापुढे उघड केल्या आहेत, त्याचा परिणाम म्हणून कॉंग्रेसच्या पुनरूज्जीवनाची आशा बाळगून जे लोक पक्षात राहिले आहेत, तेही बहुधा आता पक्षापासून दूर जाण्याचा विचार करू लागतील. कॉंग्रेसचे पुनरूज्जीवन आता आणखी कठीण बनले आहे हे निश्‍चित!