कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची १७ ऑक्टोबर रोजी निवडणूक

0
20

>> १९ ऑक्टोबरला होणार मतमोजणी

कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची निवडणूक येत्या १७ ऑक्टोबरला होणार असून मतमोजणी १९ ऑक्टोबर रोजी होणार आहे. याबाबतची अधिसूचना २२ सप्टेंबरला जारी करण्यात येणार आहे.
अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया २४ ते ३० सप्टेंबरदरम्यान होणार आहे. कॉंग्रेसचे केंद्रीय निवडणूक समितीचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री यांनी ही माहिती दिली आहे.

दरम्यान, कॉंग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांचे राजीनामा देण्याचेही सत्र दुसर्‍या बाजूने सुरूच असून काल तेलंगणामधील कॉंग्रेसचे माजी खासदार आणि ज्येष्ठ नेते एम. ए. खान यांनीदेखील पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. खासदार राहुल गांधी यांनी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारावे अशी विनंती ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली असून हे आपले वैयक्तिक मत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

आणखी एका नेत्याचीकॉंग्रेसला सोडचिठ्ठी

जम्मू-काश्मीरमधील पक्षाचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी नुकताच कॉंग्रेसला रामराम ठोकला असतानाच पाठोपाठ तेलंगणामधील कॉंग्रेसचे माजी खासदार आणि ज्येष्ठ नेते एम. ए. खान यांनी देखील पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. या दोन्ही नेत्यांनी पक्ष सोडताना राहुल गांधीवर टीका करताना राहुल गांधींची विचारसरणी अत्यंत वेगळी आहे. ती पक्षातल्या सामान्य कार्यकर्त्यापासून बूथ पातळीपर्यंत कुणाशीच जुळत नसल्याची टीका केली आहे.