खाणींच्या ठिकाणी लोहखनिजावर प्रक्रियेस मनाई

0
9

>> 31 मार्चपूर्वी खनिज उचला; खाण खात्याकडून पुन्हा आदेश जारी

27 ई-लिलावांतून विकत घेतलेले लोहखनिज संबंधितांनी येत्या 31 मार्चपूर्वी उचलण्याचा आदेश गोवा सरकारच्या खाण खात्याने जारी केला आहे. ज्या ठिकाणचे लोहखनिज ई-लिलावात विकत घेण्यात आले आहे, त्या ठिकाणी लोहखनिजावर प्रक्रिया करण्यास मान्यता दिली जाणार नाही, असे खाण खात्याचे संचालक डॉ. सुरेश शानभोगे यांनी जारी केलेल्या आदेशात स्पष्ट केले आहे.
खाण खात्याने राज्यातील खाण लीजेस ताब्यात घेण्याच्या प्रक्रियेला गती दिली आहे. खाण खात्याने गेल्या 31 जानेवारी रोजी एक आदेश जारी करून संबंधितांना ई-लिलावात विकत घेतलेले लोहखनिज येत्या 31 मार्चपर्यंत उचलण्याची सूचना केली होती. आता, खाण खात्याने पुन्हा एकदा ई-लिलावात लोहखनिज विकत घेतलेल्यांना सतर्क केले आहे.

ई-लिलावाच्या वेळी किंवा त्यापूर्वी लॉटच्या मूळ स्थानावरील लोहखनिज क्रिशिंग किंवा स्क्रिनिंग करण्यास मान्यता दिली जाणार नाही. त्या ठिकाणी असलेले लोहखनिज उचलावे लागेल. मूळ जागी लोह खनिजाचे क्रशिंग आणि स्क्रीनिंगसाठी देण्यात आलेली मान्यता तात्काळ प्रभावाने मागे घेण्यात येत आहे, असेही आदेशात म्हटले आहे.

राज्य सरकारने खनिज व्यवसाय सुरळीत करण्यासाठी खनिज लिजांच्या लिलावाची प्रक्रिया सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात चार खाणपट्ट्यांचा लिलाव यशस्वीपणे करण्यात आला होता. येत्या मार्च 2023 मध्ये आणखीन 5 खाणपट्ट्यांचा लिलाव करण्यात येणार आहे. या लिलावामध्ये उत्तर गोव्यातील पाच खाणपट्ट्यांचा समावेश आहे.