Home बातम्या कोकणी अकादमीच्या अध्यक्ष व पदाधिकार्‍यांच्या नियुक्तीस आक्षेप

कोकणी अकादमीच्या अध्यक्ष व पदाधिकार्‍यांच्या नियुक्तीस आक्षेप

0

आचारसंहितेचा भंग करून आदेश काढल्याची एन. शिवदास यांची तक्रार

विधानसभा निवडणुकीमुळे राज्यात आचारसंहिता लागू झालेली असताना सरकारने गोवा कोकणी अकादमीच्या अध्यक्षांसह चौघांची नेमणूक केली असल्याचा आरोप करून अकादमीचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ कोकणी साहित्यिक एन. शिवदास यांनी निवडणूक आयोगाकडे यासंदर्भात लेखी तक्रार नोंदवली आहे.

सरकारने एका आदेशाद्वारे येत्या एक जानेवारीपासून गोवा कोकणी अकादमीवर अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ कोकणी साहित्यिक व ‘बिंब’चे संपादक दिलीप बोरकर यांची नियुक्ती केलेली असून सदस्य म्हणून ज्योती कुंकळ्येकर, प्रकाश पर्येकर व आग्नेल अल्कासोईस यांची निवड केलेली आहे.

हा आदेश निवडणूक आचारसंहितेचा भंग करणारा असल्याचा आरोप एन. शिवदास यांनी निवडणूक आयोगाकडे केलेल्या तक्रारीत केला आहे. सरकारच्या सदर आदेशावर २१ डिसेंबरची म्हणजे निवडणूक आचारसंहिता लागू होण्याच्या केवळ दोन दिवस आधीची तारीख असली, तरी प्रत्यक्षात हा आदेश कोकणी अकादमीकडे २६ डिसेंबर रोजी अजय सावळ या अकादमीच्या शिपायाच्या हाती सुपूर्द केला गेला, असे एन. शिवदास यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे या नियुक्तीमध्ये गोलमाल असून सरकारच्या या आदेशाची निवडणूक आयोगाने चौकशी करावी असेही शिवदास यांनी पुढे म्हटले आहे.

आपल्या तक्रारीसोबत शिवदास यांनी भाषा सचिवांच्या आदेशाची प्रत जोडली असून ज्या तारखेने आदेश काढला गेला आहे, त्या दिवशी भाषा संचालक गोपाळ पार्सेकर हे सरकारी कामकाजासाठी बाहेरगावी होते व ते २३ रोजी संध्याकाळी सहानंतर परतले अशी माहिती आपल्याला मिळाली असल्याचे शिवदास यांनी तक्रारीत नमूद केले आहे. सदर आदेशावर खाडाखोड केलेली असून जावक संदर्भ क्र. ५/१२/२०११/डीओएल जीकेए/जन. कौ./६९६ मध्ये खाडाखोड केल्याचे स्पष्ट दिसत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. निवडणूक आयोगाकडून या तक्रारीची शहानिशा होईपर्यंत सदर आदेशाची कार्यवाही स्थगित ठेवावी अशी मागणीही शिवदास यांनी केली आहे.

यासंदर्भात कोकणी अकादमीचे नवनियुक्त अध्यक्ष दिलीप बोरकर यांच्याशी संपर्क साधला असता, सदर नियुक्तीचा आदेश आपल्याला २१ डिसेंबर रोजीच मिळाल्याची माहिती त्यांनी दिली. आपण सदर आदेश २१ डिसेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजता भाषा संचालक गोपाळ पार्सेकर यांच्याकडून प्रत्यक्ष स्वीकारली असे श्री. बोरकर यांनी सांगितले. गोवा कोकणी अकादमीला आदेश उशिरा मिळाला असेल तर त्याची आपल्याला माहिती नाही, असे त्यांनी पुढे सांगितले. आपल्या आदेशात येत्या एक जानेवारीपासून अकादमी अध्यक्षपदाचा ताबा घ्यावा असे सरकारने नमूद केलेले असल्याचे श्री. बोरकर यांनी पुढे सांगितले.