किर्लपाल-दाभाळ येथे काल रात्री १० वाजता कोंबडी वाहून नेणार्या गाडीने एका दुचाकीला जोरदार धकड दिल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. तर त्याच्या मागे बसलेला गंभीर जखमी झाला. त्याच्यावर बांबोळी येथील गोवा मेडिकल कॉलेजमध्ये उपचार चालू आहेत.
काल रात्री १० वाजण्याच्या सुमारास वाघोण येथील अमित रामचंद्र गावकर (३०) हा आपल्या डिओ (जीए ०९ जे ३१३९) या दुचाकीवरून आपला मित्र दयेश गावकर याच्या सोबत वाघोण येथे घरी जात होता. कीर्लपाल येथे पोहोचताच दाभाळ मार्गे सावर्डेच्या दिशेने येणार्या कोंबड्याच्या बोलेरो गाडीने (जीए ०९ यु ५१८३) जोराची धडक दिल्याने दुचाकीवरील दोघेही रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाले. मात्र अपघात झाल्याचे माहीत असूनही जखमींना तेथेच टाकून कोंबड्यांच्या गाडीने पळ काढला. या अपघाताची माहिती मिळताच कुडचडे पोलिसांनी १०८ गाडीला बोलावून दोघांनाही काकोडा हॉस्पिटलमध्ये नेले. तेथून त्याना मडगावला पाठविले. मडगावमध्ये उपचार चालू असतानाच अमित गावकर याचा मृत्यू झाला. तर जखमी दयेश गावकरला बांबोळीला पाठविण्यात आले. याप्रकरणी चालक संदेश नारायण वेळीप (२८) तुडव वेर्ले-नेत्रावळी याला अटक केली. पोलीस निरीक्षक सिद्धांत शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अशोक देसाई तपास करीत आहेत.