शिर्डीतील श्री साईबाबा मंदिर, मुंबईचे शिवसेना भवन आणि बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक बॉम्बद्वारे उडवून देण्याची धमकी अज्ञाताने दिल्याने शिर्डी व मुंबईतील सुरक्षा कडक करण्यात आली आहे. शिर्डी संस्थानला धमकीचे पत्र मिळाले असून ९ नोव्हेंबर रोजी मंदिर बॉम्बस्फोटाद्वारे उडवून दिले जाईल अशी धमकी देण्यात आली आहे.
शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे यांचे प्रस्तावित स्मारक, वांद्रे येथील मातोश्री बंगला आणि शिवसेना भवन उडवून देण्यात येईल असेही पत्रात म्हटले आहे. हे पत्र हिंदीत लिहिलेले आहे. इंदूरमधील खजराना येथील प्रसिद्ध गणेश मंदिरही उडवून देण्याची धमकी पत्रात दिली गेली आहे.