Home बातम्या कर्नाटक विधानसभेची ठाकूर यांना ताकीद

कर्नाटक विधानसभेची ठाकूर यांना ताकीद

0

कर्नाटकमधील दोन आमदारांविरोधात आधारहीन वृत्त प्रसिद्ध केल्याप्रकरणी बेळगाव ‘तरुण भारत’चे संपादक किरण ठाकूर यांना कर्नाटक विधानसभेने सोमवारी हक्कभंगाबाबत सक्त ताकीद दिली. याप्रकरणी कर्नाटक विधानसभेच्या समितीसमोर हजर राहिलेले ठाकूर यांनी विधानसभेची माफी मागितली.

भाजपचे अभय पाटील आणि कॉंग्रेसचे एस. बी. घाटगे यांनी ‘तरुण भारत’ मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराबाबत तक्रार केल्यानंतर कर्नाटक विधानसभेने एकमताने ठाकूर यांना दोषी ठरवणारा ठराव मंजूर केला होता. याप्रकरणी ठाकूर यांनी कर्नाटक विधानसभेच्या समितीसमोर उपस्थित राहावे असे सांगण्यात आले होते.

विधानसभा अध्यक्ष के. जी. बोपय्या यांनी ठाकूर यांच्याविरोधातील विधानसभेचा ठराव वाचून दाखवला व त्यांना सक्त ताकीद दिली. त्यावर ‘आय एम सॉरी’ अशा शब्दांत ठाकूर यांनी माफी मागितली. त्याचवेळी दोन्ही आमदारांनी या गोष्टीचा वाजवीपेक्षा जास्त गाजावाजा केला, असेही ते म्हणाले. विधिमंडळ आणि पत्रकारितेचे स्वातंत्र्य यांच्यात हा संघर्ष अनावश्यक होता, असे सांगतानाच विधानसभा आणि त्यातील सदस्यांबाबत आपल्याला खूप आदर आहे, असेही ते म्हणाले.