ऍड. आयरिश रॉड्रिग्स यांनी यासंदर्भात दाखल केलेल्या तक्रारीची पडताळणी भारतीय निवडणूक आयोगाकडून सुरू असून न्यायिक तसेच आचारसंहितेच्या दृष्टीने या तक्रारीचा विचार केला जात आहे. त्यासंदर्भात अंतिम निर्णय ७ मे रोजी दिला जाणार आहे.
कुठ्ठाळीतील पोटनिवडणूक येत्या दोन जून रोजी होणार असल्याने व एलिना या त्या निवडणुकीतील भाजपच्या संभाव्य उमेदवार असल्याने, त्यांचा मंत्रिमंडळातील समावेश मतदारांना प्रभावित करू शकेल असा दावा आयरिश यांनी केला आहे. सध्या राज्यात आचारसंहिता लागू असल्याने अशा प्रकारे एलिना यांचा मंत्रिमंडळात समावेश करणे हे आचारसंहितेचे उल्लंघन ठरेल असेही आयरिश यांचे म्हणणे आहे. मोकळ्या वातावरणात निवडणुका घेणे हे निवडणूक आयोगाचे कर्तव्य असल्याने सरकारला एलिना साल्ढाणा यांना मंत्रिपद देण्यास तूर्त सरकारला मनाई करावी अशी मागणीही आयरिश यांनी आपल्या तक्रारीत केली आहे.
या तक्रारीसंदर्भात राज्य निवडणूक अधिकारी एस. कुमारस्वामी यांनी राज्याचे मुख्य सचिव तसेच राजभवनला पत्र पाठवले असून एलिना साल्ढाणा यांचा मंत्रिमंडळातील समावेश कुठ्ठाळी पोटनिवडणूक आटोपेपर्यंत पुढे ढकलावा अशी मागणी केली आहे. त्यामुळे निवडणूक आयोग यासंदर्भात काय फैसला देते त्याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.
दरम्यान, संयुक्त मुख्य निवडणूक आयुक्त नारायण नावती यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना यासंदर्भात नोटीस बजावली आहे. २४ एप्रिल पासून राज्यात निवडणूक आचारसंहिता लागू झालेली असल्याकडे त्यात लक्ष वेधण्यात आले आहे.