Home बातम्या उपासमारीची पाळी आल्याने ‘मूनलाईट’ आता कुडाळात

उपासमारीची पाळी आल्याने ‘मूनलाईट’ आता कुडाळात

0
अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणप्रकरणी मालकासह अन्य काहींना अटक झाल्यामुळे संकटात सापडलेल्या मूनलाईट सर्कसला येथून गाशा गुंडाळावा लागला असून ही सर्कस आता कुडाळ येथे सुरू होणार असल्याचे वृत्त आहे. अल्पवयीनांच्या लैंगिक छळाबरोबरच मानवी तस्करीही या घटनेमुळे उघडकीस आली आहे.

या प्रकरणी गुन्हा अन्वेषण विभाग व मडगाव पोलिसांनी सर्कसचे मालक अब्दुल खान, कॅशियर व व्यवस्थापकला अटक केली होती. त्यामुळे सर्कशीत काम करणार्‍या ५० पेक्षा जास्ती कामगारांवर उपासमारीची पाळी आली. कालपासून सर्कशीतील सामान भरून कुडाळ येथे नेले जात होते. दि. १० मार्चपासून सर्कस तेथे सुरू होणार आहे.
लैंगिक अत्याचारांना बळी पडलेल्या १० मुलींची अपना घरमध्ये रवानगी केली आहे. त्यानंतर कामगार व प्राण्यांच्या पोटापाण्याचा प्रश्‍न निर्माण झाला. गेले तीन चार दिवस सर्कसच्या कॅन्टिन मालकाने मदतीचा हात दिला. या सर्कसमध्ये ४ हत्ती, ५ घोडे, १ उंट, १४ कुत्रे, ३ बकर्‍या, १७ पोपट आहेत.
पोलिसांनी छापा मारल्यानंतर प्रयोगांचे ५७ हजार रुपयेही पोलिसांनी जप्त केले होते. त्यामुळे सर्कस कामगारांची अत्यंत बिकट स्थिती निर्माण झाली. गेल्या दोन दिवसांत सर्व प्राण्यांना ट्रकमधून कुडाळला रवाना केले. कुडाळ येथे सर्कस सुरू करण्याचे कामगारांनी ठरविले आहे. या सर्कसमध्ये आईबाप काम करीत होते व त्यांची मुलेही तेथेच काम करू लागली. त्याचबरोबर अनाथ मुलींना बालपणात आणून सर्कशीत प्रशिक्षण दिले. सर्कशीतील काम हेच त्यांचे जीवन बनले. त्यांना बाहेर पडता येत नव्हते. मतदान करण्यासाठी त्यांची नावे मतदार यादीत नाहीत. धड जेवण नाही व विश्रांती नाही. वीस तास काम करावे लागते. सर्कशीतील वीज व पाण्याचे बील थकलेले होते. अधिकारी पैशासाठी तेथे हेलपाटे मारीत होते. या सर्कशीत काम करणारे कामगार आसाम, ओरिसा तसेच ईशान्य भारतातील अत्यंत गरिब कुटुंबातील तर बरेच बेघर, अनाथ आहेत. त्यांचे जीवनच सर्कशीत गेल्याने अन्य काम त्यांना करता येत नाही.