30 C
Panjim
Monday, September 28, 2020

उत्सव साजरा करताना

 

कोरोनाचे विघ्न सर्वत्र फैलावत चालले असताना विघ्नहर्त्या गणरायाच्या आगमनाचे वेध गोमंतकाला लागले आहेत. हा शुभंकर श्रीगणेश येईल आणि कोरोनाचा कहर दूर सारील अशी जनतेला आशा आहे, कारण सद्यपरिस्थितीत त्याचाच आधार तिला राहिलेला आहे. मात्र, गोमंतकाचा हा सर्वांत मोठा उत्सव साजरा करीत असताना भोवतालची परिस्थिती लक्षात घेऊन काही दंडकांचे पालन प्रत्येकाने करणे आवश्यक असणार आहे. सरकारने एकदाची ही नियमावली जारी केली. खरे तर राज्यामध्ये चित्रशाळा खुल्या झाल्या आणि मूर्ती आरक्षित करण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली, तेव्हाच ही नियमावली जारी होणे जरूरीचे होते. परंतु वेळेत कामे झाली तर ते सरकारी प्रशासन कसले?
जी नियमावली जारी करण्यात आली आहे, तिच्यात काही बाबतींमध्ये तर कमालीची विसंगती दिसते. या नियमावलीतील पहिलेच कलम सांगते की राज्याबाहेरून जर गणेशमूर्ती विक्रीसाठी किंवा स्वतःच्या वापरासाठी आणणारी व्यक्ती २४ तासांत परत जाणार असेल तर तिला होम क्वारंटाईनची गरज नसेल. विक्रीसाठी मूर्ती आणणार्‍यांचे एकवेळ ठीक, परंतु ‘स्वतःच्या वापरासाठी’ प्रथेनुसार प्रतिष्ठापनेच्या आधल्या दिवशी बाहेरून गणेशमूर्ती घेऊन येणारी व्यक्ती तिच्या विसर्जनाआधीच २४ तासांत परत कशाला जाईल? बाहेरून येणारी ही व्यक्ती घरातल्यांशी मिसळेल, घरातील उत्सवात सहभागी होईल त्याचे काय? दुसरीकडे, बाहेरून येणार्‍यांना कोविड प्रमाणपत्र, कोविड चाचणी किंवा चौदा दिवसांचे घरगुती विलगीकरण या त्रिसूत्रीपैकी एका पर्यायाचा अवलंब करावा लागेल असेही ही नियमावली सांगते. नियमावली जारी झाली रविवारी नऊ तारखेच्या रात्री. गणेश चतुर्थी आहे २२ ऑगस्टला. म्हणजे जो चौदा दिवसांचा विलगीकरणाचा काळ सांगितला आहे, तो पूर्ण व्हायच्या आधीच चतुर्थीचा सण येतो. प्रशासनाचा हा असला भंपक कारभार घातक आहे.
अशीच विसंगती या नियमावलीमध्ये सार्वजनिक गणेशोत्सवासंदर्भात दिसून येते. सार्वजनिक स्वरूपामध्ये गणेशोत्सव करू द्यायचा की नाही ते स्थानिक स्वराज्य संस्था ‘केस टू केस बेसीसवर’ म्हणजे प्रकरणनिहाय ठरवील असे ही नियमावली सांगते. अशा प्रकारचा भेदभाव करण्याचे आणि लोकप्रतिनिधींच्या हाती सूत्रे सोपवण्याची गरज नव्हती. कंटेनमेंट झोनमधील व्यक्तींना हव्या असलेल्या वस्तू पैसे देऊन स्थानिक पंच अथवा नगरसेवकामार्फत घ्याव्यात असेही नियमावलीत म्हटले आहे. म्हणजे तेथेही पुन्हा राजकारण्यांना फुकटचे श्रेय आले! ही असली श्रेयासाठीची धडपड कोरोनाविरुद्धच्या लढ्यामध्ये घातक ठरत आली आहे. लोकप्रतिनिधींनीच जर सगळी कामे करायची तर प्रशासकीय यंत्रणा कशासाठी आहेत?
जनतेने परिस्थितीचे भान ठेवून स्वतःहून यंदाच्या गणेशोत्सवामध्ये काळजी घेणे गरजेचे आहे. सरकारी नियमावलीमध्ये गोमंतकीयांच्या गरजेच्या माटोळीच्या सामानाच्या विक्रीसंदर्भात अवाक्षर नाही. त्याच्या खरेदीसाठी दरवर्षी बाजारपेठांतून उडणारी झुंबड यंदा होऊ नये यासाठी विशेष व्यवस्था यंदा झाली पाहिजे. चतुर्थीच्या निमित्ताने दरवर्षी खरेदीसाठी होणारी बाजारपेठांतील गर्दी यंदाही उसळली तर सामाजिक दूरीच्या निकषांचा बोजवारा उडण्यास वेळ लागणार नाही. एखाद्या बाजारपेठेत कोरोनाने शिरकाव केला तर काय घडू शकते त्याचे उदाहरण म्हापशाच्या मासळी बाजाराने दिलेलेच आहे. तेथे तब्बल १८ मासेविक्रेत्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आलेले आहे. अशा परिस्थितीत गणेशचतुर्थीसारखा मंगल सण कोरोनाचा फैलाव होण्यासाठी निमित्तमात्र ठरू नये यासाठी चित्रशाळांमधून गणेशमूर्ती घरी नेण्यापासून प्रत्यक्ष विसर्जनापर्यंत प्रत्येक टप्प्यावर अधिक दक्षता, जागरूकता जनतेनेच बाळगावी. घरगुती गणेशोत्सव अनावश्यक बाह्य संपर्क येऊ न देता स्वतःच साजरा करावा. यंदा उत्सवापेक्षा त्याला उपचाराचे स्वरूप अधिक असणार आहे, परंतु त्याला इलाज नाही. राज्यातील पुरोहितवर्गाने परिस्थिती लक्षात घेऊन स्वतःहून तंत्रज्ञानाची मदत घेत आपल्या यजमानांना ऑनलाइन पूजेचे पर्याय दिलेले आहेत हे प्रशंसनीय आहे. इतर अनेकांनी आपल्या कल्पकतेने गणेश चतुर्थी उत्सव सुलभ करण्यासाठी पावले उचललेली दिसतात. त्यामध्ये माटोळीच्या सामानाच्या होम डिलिव्हरीपासून ऑनलाइन पूजेपर्यंतच्या अनेक गोष्टींचा समावेश आहे. यंदाचा गणेशोत्सव वेगळा जरूर असेल, परंतु त्यामागील भक्तिभाव मात्र तोच असावा. कोरोनाच्या विघ्नाला दूर सारण्यास साह्यभूत ठरावा!

STAY CONNECTED

845FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

संत मोहनदास

ऍड. रमाकांत खलप अशा या संताची १५० वी जयंती २ ऑक्टोबर २०२० रोजी जगभर साजरी केली जाईल. सत्याग्रह...

ततो युद्धाय युज्यस्व…

मीना समुद्र कोरोनाचे संकट हे पूर्णपणे माणसाने आपल्या करणीमुळे ओढवून घेतलेले आहे. स्वतःच्या स्वार्थापायी आणि भोगवादी, चंगळवादी, बेदरकार...

सृष्टीच्या रहस्याचा वेध

डॉ. सोमनाथ कोमरपंत रूढार्थाने हे क्रमिक पुस्तक नसून त्याचे उद्दिष्ट काहीसे निराळे आहे. विद्यार्थ्यांना काव्यमाधुरी स्वतंत्र चाखता यावी;...

आश्विन

पौर्णिमा केरकर भातकापणी करून ती पेंडके खळ्यावर तर कधी घराच्या पडवीत आडवी करून ठेवली जायची. त्यावेळी आश्विन घरात...

ALSO IN THIS SECTION

उपेक्षिताचा अंत

अटलबिहारी वाजपेयी यांच्या सत्तापर्वाचा एक जवळचा साक्षीदार काल राजधानी दिल्लीत असूनही एकाकी निजधामाला गेला. जसवंतसिंह गेले. राजस्थानच्या बारमेरसारख्या ओसाड, वाळवंटी जिल्ह्यातल्या जसोलचा...

विदारक साटेलोटे

सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या तपासातून बाहेर निघालेली अमली पदार्थ व्यवहाराची भुते आता बॉलिवूडमधील बड्या बड्यांचे बुरखे फाडत निघालेली आहेत. आतापर्यंत दीपिका पडुकोण,...

आत्मनिर्भर?

येत्या गांधी जयंतीपासून गोव्यामध्ये ‘आत्मनिर्भर गोवा’ मोहीम राबवण्याची घोषणा सरकारने नुकतीच केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भरते’च्या हाकेनुसार राज्य सरकार फार मोठे...

विमा कवच द्या

राज्यातील खासगी इस्पितळांकडून कोरोना रुग्णांची लूटमार होत असल्याची चौफेर टीका जनतेमधून झाल्यानंतर सरकारने तत्परतेने हे शुल्क काही प्रमाणात कमी करण्याचे आणि या...

उपेक्षित‘मत्स्यगंधा’

गोमंतकाच्या ‘मत्स्यगंधे’चा कोरोनाने घास घेतला. आशालताबाई गेल्या. सहा दशके रंगभूमी, रुपेरी पडदा आणि छोट्या पडद्याला व्यापून राहिलेल्या या गुणी अभिनेत्रीचे हे अशा...