>> मुख्यमंत्र्यांचे सुतोवाच; रायबंदर-चोडण जलमार्गावर ‘गंगोत्री’ आणि ‘द्वारका’ सेवेत दाखल
राज्यातील पहिल्या अत्याधुनिक साधनसुविधांनी युक्त अशा ‘गंगोत्री’ आणि ‘द्वारका’ या दोन रो-रो फेरीबोटींच्या सेवेला रायबंदर ते चोडण या जलमार्गावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते काल प्रारंभ करण्यात आला. राज्यातील इतर जलमार्गांवर जुन्या फेरीबोटींच्या जागी पर्यावरणपूरक नवीन रो-रो फेरीसेवा सुरू करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे, असे मुख्यमंत्र्यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले.
राज्य सरकार नाविन्यपूर्ण सेवा देण्यावर भर देत आहे. राज्यातील सर्व जलमार्गांवर पर्यावरणपूरक रो-रो फेरीबोट सेवा उपलब्ध करण्यावर विचार केला जाणार आहे. रायबंदर ते चोडण या मार्गावरील रो रो फेरीबोट सेवेमुळे नागरिकांचा वेळ वाचणार आहे. रो रो फेरीबोटीच्या साहाय्यातून एक शिस्तबद्ध जलवाहतूक केली जाणार आहे. एका बाजूने वाहने फेरीबोटीमध्ये घेतल्यानंतर दुसऱ्या बाजूने बाहेर नेली जाणार आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
5 रुपये शुल्क वाढ
सहन करा : फळदेसाई
राज्य सरकारकडून मोठे नुकसान सहन करून जलमार्गावर फेरीबोट सेवा उपलब्ध करून दिली जात आहे. खात्याला केवळ वार्षिक 60 लाखांचा महसूल प्राप्त होते, तर खात्याचा खर्च 75 कोटी रुपयांच्या आसपास आहे. त्यामुळे नवीन फेरीबोट सेवेसाठी नाममात्र पाच रुपये शुल्क वाढ प्रवाशांनी सहन करून सरकारला सहकार्य करावे. प्रवासी आणि दुचाकी वाहनांसाठी शुल्क आकारला जात नाही, असे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी सांगितले. यावेळी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, अंतर्गत जलवाहतूकमंत्री सुभाष फळदेसाई, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट, जलवाहतूक खात्याचे संचालक विक्रमसिंग भोसले व इतर मान्यवर उपस्थित होते.
फेरीबोटींच्या नावांवरून काँग्रेसची टीका
गोवा प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी नवीन रो-रो फेरीबोटींना देण्यात आलेल्या गंगोत्री आणि द्वारका या नावांच्या विषयावरून राज्य सरकारवर टीका केली आहे. रो-रो फेरीबोटी गोव्यात चालविण्यात येणार आहेत. त्यामुळे गोव्यातील कुठल्याही गावाचे नाव द्यायला हवे होते, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पाटकर यांचे म्हणणे आहे.
श्रीपाद नाईकांचे प्रत्युत्तर
गंगोत्री आणि द्वारका या आपल्या संस्कृतीचा भाग आहेत. त्यांची नावे नवीन रो-रो फेरीबोटीना देणे ही एक अभिमानाची गोष्ट आहे. अमित पाटकर यांना ही दोन्ही नावे बाहेरील वाटत असल्यास त्यांना भारतीय म्हणणे योग्य होणार नाही, अशी टीका केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी केली.
दोन्ही नावे मीच सुचवली : सुभाष फळदेसाई
रो रो फेरीबोटी ह्या विजय मरीन या खासगी कंपनीच्या मालकीच्या आहेत. गोवा सरकारने या दोन्ही फेरीबोटी भाडेपट्टीवर घेतलेल्या आहेत. गंगोत्री आणि द्वारका या दोन्ही नावांची आपण शिफारस केली होती, असे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी स्पष्ट केले आहे. आमची गंगा ही पवित्र नदी असून, हिमालयात तिचे उगमस्थान आहे. ह्या नावाला आक्षेप घेण्याचे काहीच काम नाही. सरकारने केलेल्या चांगल्या कामाला कमी लेखण्यासाठी विरोधकांकडून अनावश्यक टीका केली जात आहे, असे फळदेसाई यांनी म्हटले आहे.