युद्धाच्या सहाव्या दिवशीही धमासान युद्ध चालूच
भारताला रशियाकडून तेल पुरवठा
इराणकडून अमेरिका आणि इस्रायलवर सातत्याने क्षेपणास्त्र, ड्रोन हल्ले सुरु आहेत. आखाती देशांमधील अमेरिकेच्या तळांवर इराणने जोरदार हल्ले चढवले आहेत. त्यामुळे आता अमेरिका, इस्रायलसह आखाती देशांसमोर गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. इराण करत असलेले हल्ले असेच सुरू राहिले तर पाश्चात्य देशांसमोर हवाई सुरक्षा प्रणालीसाठी वापरल्या जाणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या तुटवड्याची शक्यता असून इराणकडे मात्र अद्याप बराच ड्रोन्स आणि क्षेपणास्त्रांचा साठा शिल्लक असल्याचे मानले जाते.
इस्रायलचा ड्रोन, क्षेपणास्त्र साठा विरुद्ध अमेरिका, इराण आणि आखाती देशांकडे असलेला इंटरसेप्टर क्षेपणास्त्रांचा साठा असा संघर्ष मध्यपूर्वेत पाहायला मिळत आहे. सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतर हे युद्ध लगेच संपेल असे अमेरिका मानत होती. मात्र इराण सध्या कोणतेही नेतृत्व नसताना अधिक जोमाने हल्ले करत असल्याचे दिसून येत आहे. इराणकडून अमेरिकेच्या नौदल आणि हवाई तळांवर हल्ले सुरु असल्यामुळे अमेरिकेची कोंडी झाली आहे.
अमेरिका आणि मित्र देश क्षेपणास्रे आणि ड्रोन हवेतच नष्ट करण्यासाठी विविध प्रकारच्या हवाई सुरक्षा यंत्रणांचा वापर करतात. यामध्ये थाड इंटरसेप्टर, पॅट्रियट क्षेपणास्त्र यंत्रणा यांचा प्रामुख्यानं समावेश आहे. इस्रायल प्रामुख्याने एरो इंटरसेप्टर प्रणालीचा वापर करतो. त्याशिवाय आयर्न डोमचाही आधार घेतो. सध्याच्या घडीला इंटरसेप्टर क्षेपणास्त्रांचा साठा मर्यादित आहे. त्यामुळे युद्धकाळात अडचण निर्माण झाली आहे.
भारताकडून खामेनेई
यांच्या मृत्यूवर शोकसंदेश
इराणचे सर्वोच्च नेते अय्यातुल्ला खामेनेई यांच्या मृत्यूनंतर भारताने त्याचा निषेध केला नाही किंवा त्यावर कोणतेही भाष्य केले नव्हते. त्यावरून काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी भारताच्या परराष्ट्र धोरणावर टीका केली होती. त्यानंतर आता भारताने अधिकृतरित्या खामेनेई यांच्या मृत्यूवर शोकसंदेश जारी केला. भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी नवी दिल्लीतील इराणच्या दूतावासात जाऊन शोकपुस्तिकेवर स्वाक्षरी केली खामेनेई यांना श्रद्धांजली वाहिली.
रशियाकडून भारताला तेल पुरवठा
मध्य पूर्वेत सुरू असलेल्या इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल युद्ध काल सहाव्या दिवशीही सुरू होते. त्यामुळे संपूर्ण जगावर तेलाचे संकट उभे राहिले आहे. त्यातच इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतून होणारी तेल वाहतूक रोखली आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून भारताला होणाऱ्या एकूण तेल पुरवठ्याच्या 20 टक्के तेलाचा पुरवठा होतो. पण मध्य पूर्वेत युद्ध सुरु झाल्यापासून इराणने सामुद्रधुनीतून होणारी वाहतूकच रोखली आहे. तेलाचे टँकर्स उडवण्याची धमकी दिली आहे. अशा स्थितीत रशियन खनिज तेलाचे 2 टँकर्स या आठवड्यात भारतीय बंदरांवर तेलाचा साठा उतरवतील. या टँकर्समध्ये 14 लाख बॅरेल खनिज तेल आहे.
शांतता आणि संवाद महत्वाचा ः मोदी
सध्या जगभरात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, अस्थिरतेच्या या काळात सैन्य नव्हे, तर शांतता आणि संवाद हाच भविष्याचा एकमेव मार्ग आहे. कोणत्याही मुद्द्याचे किंवा समस्येचे समाधान केवळ लष्करी कारवाईने होऊ शकत नसल्याचे म्हटले आहे. पंतप्रधान मोदी यांनी, इराण-अमेरिका आणि रशिया-युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीवर बोलताना शांततेचे आवाहन केले आहे.
पंतप्रधान मोदी हे काल गुरुवारी दिल्लीत फिनलँडचे राष्ट्रपती अलेक्झांडर स्टब यांच्यासोबत आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत बोलत होते. या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी, फिनलँडसोबत धोरणात्मक भागीदारीवर भर दिला. दोन्ही देशांमध्ये अनेक महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षरी करण्यात आली.