- रमेश सावईकर
‘बाप’ कोणाला कळणं तसं सोपं नसतं. बाप म्हणजे काय हे समजायला, उमजायला ‘बाप’ व्हावं लागतं. बाप स्वभावाने तापट, रागे भरणारा, वेळप्रसंगी मुलांवर खेकसणारा, शिक्षा करणारा असतो अशीच सर्वसाधारण त्याची ओळख असते. बापाचं मुलांवरील प्रेम केव्हा शब्दातून व्यक्त होत नाही; त्याच्या कृतीतून ते व्यक्त होतं.
आपण कसं जगावं हे प्रत्येकजण स्वतःहून ठरवतो नि तसं जीवन जगतो. जीवन फक्त जगणं वेगळं आणि ते अर्थपूर्ण, सार्थकी बनवणं वेगळं. यशस्वी जीवनाचा मार्ग सापडायला मार्गदर्शक लागतो. तशी व्यवस्था लागते. प्रत्येकजण आपल्या कुटुंबाचा एक घटक असतो. कुटुंब व्यवस्थित चालण्यासाठी तशी व्यवस्था म्हणा किंवा पद्धतीची गरज असते. कुटुंबच नव्हे तर गाव, राज्य, देश व्यवस्थित चालण्यासाठी पद्धत किंवा व्यवस्थेची गरज असते. जगात हुकूमशाही, लष्करशाही, अध्यक्षीय राजवट आणि लोकशाही अशा पद्धती आहेत. प्रत्येक पद्धतीत गुण-दोष हे आहेतच. आपल्या देशात लोकशाही पद्धती आहे. जनता हा केंद्रबिंदू या पद्धतीत मानला आहे.
ज्याप्रमाणे देशासाठी लोकशाही पद्धत-व्यवस्था आहे, तशी राज्य, गाव आदींसाठी व्यवस्था आहे. या सर्व व्यवस्थेचा शेवटचा घटक म्हणजे कुटुंब! ते व्यवस्थित चालण्यासाठी आपसूक व्यवस्था आलीच. देश स्वतंत्र होण्याअगोदर म्हणजे साधारणतः 70-80 वर्षांपूर्वी हिंदुधर्मीयांमध्ये एकत्र कुटुंबपद्धती होती. काळ बदलत गेला. सामाजिक स्थित्यंतरे झाली. त्याच्याबरोबर माणसाची जीवनशैली, पद्धती बदलत गेली. त्याचा परिणाम कुटुंबपद्धतीवर झाला. एकत्र कुटुंबपद्धती जाऊन विभक्त कुटुंबपद्धती आली. एकत्र कुटुंबपद्धतीत कर्ता पुरुष हा कुटुंबाचा प्रमुख. कुटुंबाची पूर्ण जबाबदारी त्याच्यावर असायची. कुटुंबातील सर्व माणसांच्या गरजा भागविणे, त्यांचे पालन-पोषण करणे त्याच्यावर अवलंबून असायचे. ही जबाबदारी निभावून नेताना अथक कष्ट, परिश्रम करणं, संकटांना सामोरं जाणं, अडथळे दूर करणं म्हणजे मोठी कसोटी हा प्रमुख निमूटपणे, कोणालाही त्याची झळ लागू न देता स्वतःवर जबाबदारी घेऊन ती पार पाडायचा.
कोणत्याही बाबतीत त्याचा निर्णय अंतिम. तो ठरवील तेच व्हायचं. कुटुंबातील माणसांना व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य होतं, पण त्यांच्या मतानुसार निर्णय होत नसे. कुटुंबप्रमुखाचा घरात एक दरारा असायचा. आदरयुक्त भीती असायची. त्याच्याकडे अनुभवाची शिदोरी असायची. त्याच्या बळावर तो कुटुंबाचा रहाटगाडा हाकायचा. सर्वांची मनं राखून हे सारं करणं म्हणजे एक दिव्यच असायचं!
कुटुंबातील प्रत्येकजण त्याला मान द्यायचा, आदर राखायचा. तितकंच प्रेमही करायचा. सुखात सर्वजण सहभागी व्हायची, तशी दुःखातही सहभागी होऊन एकमेकांना धीर द्यायची. कोणा एखाद्यावर मानसिक ताण आला तर तो इतर माणसं कमी करायची. आजारीपणात आस्था, माया, आपलेपणानं आजारी माणसांची सेवा इतर माणसं करायची. कुटुंबातील सर्वजण नात्याच्या नाजूक रेशमी अनुबंधांनी एकमेकांना घट्ट बांंधून एकत्र असायची.
एकत्र कुटुंबपद्धती जाऊन स्वतंत्र कुटुंबपद्धती आली. हीच पद्धत आता प्रचलित झाली आहे. सामाजिक स्थित्यंतरे, आधुनिकता, शिक्षणामुळे विचारसरणीत झालेला बदल, स्वातंत्र्याचा उपभोग घेण्याची लालसा, स्वैर-मुक्तछंदी जीवन जगण्याकडे कल असे विविधांगी जीवनपैलू बदलून गेले आहेत.
अर्थात स्वतंत्रपद्धतीनं काही वेगळं कमावलेलं नाही असं म्हणणं चुकीचं ठरेल. माणसं शिक्षित झाली. विचारदृष्टीनुसार विचार-आचार स्वतःच्या मनलहरीनुसार अवलंबणं हा जीवनाचा एक भाग बनून गेला. स्वतंत्र कुटुंब म्हटलं म्हणजे आई-बाप आणि त्यांची मुलं किंवा मूल असा मर्यादित संसार. बाप हा कुटुंबप्रमुख. साऱ्या कुटुंबाची जबाबदारी त्याच्यावर. आई घरची अन्नपूर्णा. आणि शिक्षित असून नोकरी करणारी असेल तर चूल-मूल नि नोकरी सांभाळण्याची जबाबदारी पेलणं आलंच.
आजच्या आधुनिक जीवनात शिक्षणाचं महत्त्व एवढं वाढलंय की पदरी शिक्षण नसेल तर माणसाचं जीवन व्यर्थ! अर्थहीन! म्हणून आपल्या मुलांना अधिकाधिक शिकवून मोठं बनवणं हे नुसतं स्वप्न उराशी बाळगून भागत नाही; ते प्रत्यक्षात उतरविण्यासाठी उभयतांना (आई-बापांना) विशेषतः बापाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. क्षमतेपेक्षाही जास्त परिश्रम करावे लागतात.
बालपणी आई-बाबा मुलांवर प्रेम करतात. त्यांचे लाड करतात. हट्ट पुरवितात. बालपण सरून कधी जातं ते मुलांना कळतच नाही. मुलं शाळेत जाऊ लागली की त्यांच्या शैक्षणिक गरजा वाढतात. कुटुंबाचा खर्च वाढतो. बापाला सर्व बाबींची जबाबदारी शिरावर घ्यावी लागते. त्यासाठी जीवनात खस्ता खाव्या लागतात. पण त्याच्या कष्टी, श्रमी जीवनाची पुसट रेषही चेहऱ्यावर मुलांना पाहायला मिळत नाही.
आई मुलांना प्रेम देते. त्यांच्यावर माया करते. मुलांना कडेवर घेण्याकरिता स्वतःहून मुलांपुढे वाकते. मुलांना जखम झाली, कुठं लागलं, खरचटलं की आईला तेवढ्याच वेदना होतात. आपणाला काही झालं तरी त्याची तिला पर्वा नसते, ना खंत. अनेक प्रसंगांतून, कृतीतून आईचं मुलांवर असलेलं अतुलनीय, निस्सीम प्रेम दिसून येतं. वेळप्रसंगी तिच्याकडून ते व्यक्तही होतं.
आई मुलांवर संस्कार करते. त्यांना लाडिकपणे बरं काय, वाईट काय हे समजावून सांगते. मुलांसाठी तिचा मायेचा पान्हा म्हणजे निखळपणे वाहणारा, न आटणारा पाण्याच्या स्रोतावत असतो. म्हणून मुलांना ‘आई’ म्हणजे काय हे समजतं, उमजतं! आईची थोरवी गायली जाते- ‘आई थोर तुझे उपकार…’ तिचे मांगल्यरूप, प्रेमसिंधू अशा स्वरूपात वर्णन करून तिचे ऋण आपण फेडू शकत नाही असे म्हटले जाते.
‘बाप’ कोणाला कळणं तसं सोपं नसतं. बाप म्हणजे काय हे समजायला, उमजायला ‘बाप’ व्हावं लागतं. बाप स्वभावाने तापट, रागे भरणारा, वेळप्रसंगी मुलांवर खेकसणारा, शिक्षा करणारा असतो अशीच सर्वसाधारण त्याची ओळख असते. बापाचं मुलांवरील प्रेम केव्हा शब्दातून व्यक्त होत नाही; त्याच्या कृतीतून ते व्यक्त होतं.
बाप हा कुटुंबाचा आधारस्तंभ. कुटुंबाचा सगळा भार स्वतःवर घेणारा. मुलांना लहानपणापासून मोठं होईपर्यंत जीवनाचा मार्ग दाखविणारा मार्गदर्शक! लहान मुलांचा हात हातात घेऊन पुढं नेणारा. शिस्तीचे धडे अंगी भिनविणारा. जीवनातील संकटाची झळ कुटुंबाला लागू न देता त्यांचा समर्थपणे सामना करणारा, अडथळ्यांना न घाबरता, अडखळता पावलं पुढं टाकीत कुटुंबाचा गाडा पुढं रेटणारा ‘बाप’ असतो. स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवून मुलांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी बाप अविश्रांतपणे राबतो, परिश्रमांची पराकाष्ठा करतो, अथक श्रम करून आर्थिक स्थिती सुधारतो. कुटुंबाला, विशेषतः मुलांना कसलीच उणीव भासता कामा नये, त्यांचं शिक्षण व्यवस्थित पूर्ण व्हायला हवं म्हणून बाप ईर्षेला पेटून उठतो. मोडेन पण वाकणार नाही असा करारी बाणा स्वीकारून विरोधकांवर मात करून कुटुंबाला सुखी ठेवतो.
बापाचा कुटुंबासाठीचा त्याग, कष्ट आणि जबाबदारी घेण्याची क्षमता याला तोड नाही आणि नसते. त्यांना मुलांच्या भवितव्याची नेहमीच काळजी असते. वरकरणी तो कठोर वाटतो, पण त्याचं मन मृदू असतं. बाप मुलांना जीवनमूल्यांची शिकवण देतो. आयुष्याकडे पाहण्याची दृष्टी त्याच्या जीवनकार्यातून मुलांना शिकायला मिळते. ‘बाप’ हा मुलांच्या जीवनाचा ‘दीपस्तंभ’ असतो… प्रकाश देत, मार्ग दाखविणारा!
सुखाचा वारा, दुःखाचा पाऊस… त्याला छत बनून सारं झेलावं लागतं. सगळ्यांवरती आभाळमाया करून स्वतः निरभ्र राहावं लागतं. त्याला आपली स्वप्ने, इच्छा, आकांक्षा आदींना मुरड घालून मुलांची स्वप्ने जगावी लागतात. कुटुंबाचा, मुलांचा भार स्वतःवर घेण्यासाठी त्याचे दणकट बाहू सज्ज असतात. तो स्वतःहून कधीच व्यक्त होत नाही म्हणून तो सहजासहजी ‘कसा’ आहे हे समजत नाही, उमजत नाही. मुलांना मोठं झाल्यावर, विचारसरणी परिपक्व झाल्यावर, जीवनाचा अर्थ उलगडू लागल्यावर आपला ‘बाप’ म्हणजे ऐसपैस छाया देणारा ‘आधारवड’ आहे हे कळतं. बापाच्या आधारवडाच्या छायेच्या सावलीत त्याची मुलं ‘माणसं’ बनून जग न्याहाळत जीवनाची परिक्रमा करतात.
या आधारवडाची सावली असेपर्यंत आपणाला ना भीती, ना खंत. ना काळजी कोणाची, ना तमा-पर्वा संकटांची- शत्रूंची याची मनोमन खात्री असते. या आधारवडाचा विस्तार किती, उंची किती हे मात्र तो उभा असेपर्यंत आपणाला कळत नाही. कधीकाळी त्याच्या आयुष्याच्या अंती तो उन्मळून पडतो त्यावेळी त्यांची ‘प्रचंडता’ म्हणजे खरा मोठेपणा आपणाला कळतो. पण ते कळण्यापूर्वीच वेळ निघून गेलेली असते आणि आपण अवाक् होऊन मनःचक्षूंनी आधारवडाची सावली शोधत असतो.