इराण – अमेरिकेदरम्यान पाकिस्तानात होणार असलेली चर्चेची दुसरी फेरी डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांना भीक न घालता इराणचे नेतृत्व न फिरकल्याने होऊ शकली नाही, परंतु तरीही ट्रम्प यांनी तूर्त युद्धविराम स्वतःहूनच वाढविला आहे. ह्या युद्धात अमेरिकेची झालेली कोंडी त्यातून स्पष्ट दिसते. इराणचा आक्रमक पवित्रा अजूनही कायम आहे आणि ट्रम्प मात्र परस्परविरोधी उलटलसुलट विधाने करून गोंधळ वाढवीत आहेत. होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्याच्या गमजा अमेरिका करीत आली असली, तरी प्रत्यक्षात पाहता इराणने तेथे आपली मनमानी सुरूच ठेवली आहे आणि अमेरिका त्यांचा केसही वाकडा करू शकलेली नाही. इराणी कमांडोंनी भारताकडे निघालेले एक जहाज ताब्यात घेतले. इतर काही जहाजांवर गोळीबार केला. परंतु हे सगळे डोळ्यांदेखत घडत असूनही महासत्ता अमेरिका ते रोखू शकलेली नाही, कारण अमेरिकेने इराणचे नौदल जरी बुडवले असले, तरी होर्मुझच्या सामुद्रधुनीतील जलवाहतूक बंद पाडण्याएवढे सामर्थ्य इराणपाशी अजूनही आहे. मशीनगन लावलेल्या छोट्याछोट्या स्पीडबोटींतून गोळीबार करून जलवाहतूक बंद पाडण्याचे तंत्र इराणला चांगलेच अवगत आहे आणि अमेरिकेला त्यांचा नायनाट करण्यास वेळ लागेल. इराणच्या बंदरांची नाकेबंदी जरी अमेरिकेने केली असली, तरी त्यातून पळवाटा काढून जहाजे बाहेर पडताना दिसत आहेत. सध्या तरी इराण अमेरिकेच्या धमक्यांना पुरून उरला आहे असे दिसते. सध्याच्या युद्धाचा मोठा फटका अर्थव्यवस्थेला बसत असल्याने स्वतःच लादलेले युद्ध थांबवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर मोठा दबाव आहे. परंतु आपण कोणत्याही दबावाखाली नाही, दबाव इराणवर आहे असे पत्रकार परिषदेत सांगत ट्रम्प ‘पडलो तरी नाक वर’ असल्याचेच दर्शवीत आहेत. हा संघर्ष थांबवायचा असेल तर सध्या ट्रम्प यांच्यापुढे दोन मार्ग आहेत. एक पाकिस्तानच्या मध्यस्थीतून चाललेल्या वाटाघाटींचा आणि दुसरा बळाचा वापर करून होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्याचा. होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्याच्या कामी आता जर्मनीसारख्या काही देशांनी अमेरिकेची साथ देण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, ही सामुद्रधुनी खुली करणे तसे सोपे नाही. ठिकठिकाणी इराणने पेरलेले पाणसुरुंग हटवण्याबरोबरच इराणच्या ताब्यातील असंख्य छोट्या सशस्त्र स्पीडबोटी नष्ट करणारी मोहीम ह्यासाठी राबवावी लागेल. इराणमधील एका गटाशी अमेरिकेने जरी बोलणी चालवली असली, तरी प्रत्यक्षात तेथील सामरिक निर्णय कोण घेते हे स्पष्ट नाही. इस्लामिक रेव्हल्युशनरी गार्ड कॉर्पस्चे काही जनरल अजूनही लष्करी सूत्रे आपल्याकडे ठेवून लढत आहेत असे दिसते. अमेरिकेशी वाटाघाटी करणाऱ्या नेत्यांना ते कितपत जुमानतील, त्यांच्यात एकवाक्यता आहे का ह्याविषयी मोठी साशंकता आहे. खामेनेई यांच्या खात्म्यानंतर मोज्तबा यांच्याकडे औपचारिकरीत्या सूत्रे सोपवली गेली, परंतु ते जखमी आहेत, होरपळले आहेत, अशा बातम्या मध्यंतरी आल्या. आता ते पत्रे लिहून सर्वांपर्यंत आपला संदेश पोहोचवत आहेत अशा बातम्या आहेत. इराणची लष्करी सूत्रे नेमकी कोण हलवत आहे हेच अमेरिकेला अद्याप माहीत नाही. इस्रायलच्या मदतीने त्यांनी नेत्यांमागून नेत्यांना ठार मारले, परंतु तरीही इराण लढतोच आहे. त्याची ताकद कमी झाली म्हणावे तर तसेही दिसत नाही. क्षेपणास्त्रांचा वेचीव परंतु प्रभावी वापर त्याने नंतरच्या टप्प्यात केला. चीन आणि रशियाकडून इराणला मदत मिळत असल्याचा दाट संशय आहे आणि स्वतः ट्रम्प यांनीही तो व्यक्त केला आहे. सध्या युद्धविरामामुळे जी उसंत मिळाली, त्या काळात इराणने नक्कीच आपली सामरिक ताकद पुन्हा वाढविण्याचा आटोकाट प्रयत्न केलाच असेल. त्यामुळे ट्रम्प यांच्यासाठी चर्चेतून काही सवलती देऊन लवकरात लवकर तोडगा काढणेच अधिक इष्ट ठरणारे आहे. जो पाकिस्तानवर विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला अशी सध्याची स्थिती आहे. युद्धविराम आम्ही मागितला नव्हता असे इराण आता म्हणतो आहे. तिकडे इस्रायलने लेबनॉनवर ट्रम्प यांनी तीन आठवडे वाढवलेल्या युद्धविरामाची पर्वा न करता हल्ले सुरू ठेवले आहेत. त्यामुळे एकूणच हा विषय फार गुंतागुंतीचा बनत चालला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचे बेताल वागणे बोलणे सुरूच आहे. भारताविषयी ‘हेलहोल’ म्हणजे नरक असा हेटाळणीजनक करणाऱ्या ट्वीटचा अप्रत्यक्ष पुरस्कार नुकताच ट्रम्प यांनी केला. एखाद्या राष्ट्रप्रमुखाला शोभणारे हे वर्तन निश्चितच नाही. त्यांची युद्धखोरी आता पुरती अंगलट आली आहे. इराणबाबत आपले दांडगाईचे धोरण बासनात गुंडाळून नरमाईची भाषा पुढे करून त्यांना चर्चेला आमंत्रित करून काही सवलती देऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न ट्रम्प करणार की आपल्या हडेलहप्पीने पुन्हा युद्धाला निमंत्रण देणार याचीच आता प्रतीक्षा आहे.