ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना भारतरत्न किताबाने सन्मानित केले जावे, अशी मागणी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केली आहे. ‘‘अमिताभ बच्चन हा बॉलिवूडचा शेवटचा शहेनशहा आहे. जगातील अनेक देशांतील लोकांना भारताचा पंतप्रधान किंवा राष्ट्रपती कोण आहे हे ठाऊक नसते, परंतु त्यांना बच्चन ठाऊक असतात’’ अशा शब्दांत ठाकरे यांनी अमिताभचे ‘सामना’ मधील अग्रलेखात कौतुक केले आहे.
अमिताभ बच्चन हे भारताचे खरे हिरे असून त्यांना भारतरत्न किताब मिळायला हवा असे अग्रलेखात पुढे म्हटले आहे. काही वर्षांपूर्वी लता मंगेशकर यांनीही बच्चन यांना भारतरत्न दिले जावे अशी मागणी केली होती त्याची आठवणही ठाकरे यांनी करून दिली आहे. सचिन तेंडूलकरइतकेच बच्चन हेही या किताबास पात्र आहेत, परंतु कॉंग्रेसने बच्चन आणि गांधी कुटुंबातील तणावामुळे त्यांना आजवर भारतरत्न किताब दिला नाही अशी टीका ठाकरे यांनी केली आहे.