- पौर्णिमा केरकर
‘मी’चा सुजाण प्रगल्भ विचारच ‘कोरोना’ला हरवू शकतो! ‘कोरोना’सोबत जगण्याची सवय तर आता करावीच लागेल. हा नवा प्रवाह जीवनशैली बनून आत्मसात केला तरच अनलॉक जगण्याचा भरभरून आनंद घेता येईल!
‘आज पुरे देश में अनलॉक की प्रक्रिया शुरू हो गयी हैं| ऐसे में बाहर जाते समय चेहरे पर मास्क लागाना जरुरी हैं| सार्वजनिक स्थानों पर दो गज की जरुरी रखना| समय समय पर हात धोते रहना| खासी, जुकाम हो गया तो नाजदीकि स्वास्थ्य केंद्र में जाकर जॉंच करना अनिवार्य है| याद रहे, हमे कोरोना से शारीरिक दुरी रखनी है, अपने लोगों से मन की दुरी नहीं रखनी है|’ अशा आशयाची सूचना आजकाल आपल्या सर्वांच्याच ओळखीची झाली आहे. ‘कोरोना’ची सुरुवात झाली तेव्हा तर कोणालाही फोन लावला तर सर्वप्रथम खोकला ऐकू यायचा. एकदम दचकायला व्हायचे. आपल्या माणसालाच ‘कोरोना’ची लागण झाली आहे की काय? ही शंका मनात डोकावून जायची.
लॉकडाऊन, अनलॉक, दो गज की दुरी, चेहर्यावर मास्क हे सगळेच शब्द आता एवढे अंगळवणी पडले आहेत की ‘गो कोरोना गो’ असे म्हणण्याऐवजी ‘गो कोरोना यो, तुझ्यावाचून जमेना, तुझ्याशिवाय करमेना’ असे म्हणण्याची वेळ आलेली आहे. वेळ आलेली आहे असे म्हणण्यापेक्षा आपणच ती आणलेली आहे. संपूर्ण देश अनलॉक झालेला आहे. जेव्हा गरज होती त्यावेळी कडक बंदोबस्त केलाही होता. याबाबतीत पोलिसांनी खूप चांगली जबाबदारी पेलली होती. पण बरेच जण असे आहेत की ते कोणत्याही सिस्टीमला मानायला तयार नसतात. आता देश मोकळा झाला तरीही त्यांच्या प्रतिक्रिया असतातच की, ज्यावेळी ‘कोरोना’चा प्रसार नव्हता त्यावेळी लॉकडाऊन! आता सर्वत्रच पसरत आहे तर मात्र काहीही काळजी घेत नाहीत. आता बंदोबस्त करायला हवा होता. एकूणच ‘कोरोना’ जास्तच फैलावत आहे. त्याची संपूर्ण जबाबदारी सरकारचीच आहे. सरकारनेच कोरोनाला अडवून ठेवायला हवे होते. विविध भागांत पसरविण्यापासून त्याला प्रतिबंध घालायला हवा होता. परंतु यात सरकार कसे अपयशी ठरले याचाच पाढा वाचणारे या काळात स्वतः या देशाचे जबाबदार नागरिक कसे वागत आहेत का? याचा विचार कधी आणि कोण करीत आहे. काही मोजक्या आघाड्यांवर सरकार कदाचित कमी पडले असेलही, पण शेवटी सरकार म्हणजे तरी कोण? सर्वसामान्य नागरिक म्हणून आम्ही सरकारचे अविभाज्य घटक नाही आहोत का? संकटाच्या काळात सुजाण नागरिकांनी, विरोधी पक्षनेत्यांनी फक्त विरोधासाठी विरोधच करायचा का? जीवन-मरणाचा संघर्ष येथे सुरू आहे. करोडोंनी लोकांच्या नोकर्या गेल्या. उपजीविकेची साधनेच हरवलीत. कौटुंबिक संघर्ष, महिलांच्या बाबतीत वाढलेला मानसिक हिंसाचार, मनोविकाराच्या समस्या, खून, लुटालूट, मारामार्या, एक ना अनेक संकटे हा तर जीवनाचा अविभाज्य घटकच आहे. ती येतील तशी निघूनही जातील. समस्या, संघर्ष, संकटे यांच्याशिवाय जगण्याला चव नाही असे म्हणतात. निसर्ग नियम तर असाच आहे ना!
अंधार आहे म्हणून उजेड महत्त्वाचा हे पटते. दुसर्या दिवशी उगवणार्या सूर्याची त्याचसाठी तर आतुरतेने वाट पाहिली जाते. जीवनाला मृत्यूच्या रूपाने शेवट आहे म्हणून तर नवीन जन्माचा सोहळा साजरा करण्याचा उत्साह मनात भरतो. हे असे वास्तव आहे म्हणून काय रोजचे जगणे कुढत कुढत जगायचे? आज जीवन-मृत्यूच्या उंबरठ्यावर आपण उभे आहोत. असे असतानाही आपल्याला आणि काही पडलेलेच नाही या भावनेतून बेफिकिरी दाखविणे अजिबात शोभा देत नाही. सरकार विविध मार्गानी सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचून या रोगापासून स्वतःचा, कुटुंबीयांचा, पर्यायाने प्रदेश-देशाचा कसा बचाव आपण करू शकतो याच्या सूचना देत आहे. मोबाईलचा वापर त्यासाठी महत्त्वाचा आहे. प्रसारमाध्यमे लोकांनी ‘कोरोना’पासून बचाव कसा करायचा याची जागृती करीत आहेत. सामाजिक भान असलेली व्यक्तिमत्वे, स्वयंसेवी संस्था यांचा कोरोनामुक्तीसाठीचा वावर, याची जाणीव तरी ठेवून आपण वागणार आहोत की नाही?
देश अनलॉक झाला आणि खरं तर आपली प्रत्येकाचीच जबाबदारी वाढलेली आहे. ‘कोरोना’चा प्रसार रोखणे हे प्रत्येक नागरिकावर अवलंबून आहे. चेहर्यावर मास्क, हात परत परत स्वच्छ धूत राहणे, सामाजिक अंतर राखणे, ही त्रिसूत्री अजूनपर्यंत लहानांपासून थोरांपर्यंत पाठ होऊन ती जीवनशैली बनायला हवी होती. पण तसे होत नाही. जणू काही खूप वर्षांच्या बंदिवासातून आपल्याला मोकळीक मिळालेली आहे ती मुक्त फिरण्यासाठीच, हाच आविर्भाव आज बाजार, बसस्टॉपसारख्या सार्वजनिक स्थळांवर दिसत आहे. विलगीकरणात ठेवलेली कुटुंबे, व्यक्तिमत्वे आम्हाला जणू काही झालेलेच नाही, आम्ही कोठे घाबरतो कोरोनाला? या तोर्यात मिरवतात. कोरोना झालेल्यांना वाळीत टाकण्यात येते, जणूकाही कोरोना होणे म्हणजे मोठा गंभीर गुन्हा आहे अशा नजरेने पाहिले जाते. हे असे विचार तथाकथित उच्च शिक्षित, सुशिक्षित, साक्षर समाजाचे जर आहेत- तेही आता एकविसाव्या शतकातील डिजिटल युगात… तर मग आम्ही ग्लोबल कसे काय होतो? सोशल मीडियाद्वारे जगभर जोडलं जाणं याचपुरतं ग्लोबलायझेशन? विचारांची प्रगल्भता, आचरणातील सौहार्द, संस्कार आणि माणसाला माणूस म्हणून जोडून घेणं, त्याला समजून घेणं हे कधी कळणार?
काळ कठीण आहे याचा अर्थ आपण संकटावर मात करू शकत नाही असे अजिबात नाही. त्यासाठी समज येणं गरजेचं आहे. मान्य आहे की आम्ही सर्वजण आपापल्या कुटुंबात जन्माला आलो म्हणून कुटुंबाचे अविभाज्य घटक आहोत. मात्र कुटुंब ज्या समाजात राहते, वावरते, ज्या प्रदेशाने त्याला आसरा दिला, ज्या देशाचे नागरिकत्व ते मिरवीत आहे, त्याच्याप्रति या कुटुंबांचे, त्यातील सदस्यांचे, एकूणच नागरिकांचे काहीच का कर्तव्य नाही?
आपण सर्वच या विशाल विश्वाचे काहीतरी देणे लागत आहोत. मी माझाच आहे! असं नाहीच होत. नागरिक या नात्याने काही कर्तव्ये आहेत आपली, ती पालन करूया ना! घरदार सोडून समाजसेवा करा असं काही नाही सांगत, पण निदान या संकटकाळात सार्वजनिक ठिकाणी कोणकोणत्या गोष्टी टाळायच्या, कोरोनापासून कसा बचाव करायचा, या घालून दिलेल्या नियमावलीचा विचार करून त्याप्रमाणे आचरण तर करू शकतो ना? कितीतरी लोक आहेत खुशाल… मास्क न लावता फिरतात… कोठेही थुंकतात… नियम-अटींचे पालनच करीत नाहीत. मग आम्ही नाही लावला चेहर्यावर मास्क तर काय मोठसे बिघडेल? ही बेफिकीर वृत्तीच आहे वेगाने फैलावत जाणार्या या कोरोनाच्या प्रसारामागे! कोणी नाही लावत म्हणून मी लावणार नाही, यापेक्षा नको लावू दे कोणाला पण मी लावणार! असा प्रत्येक ‘मी’चा सुजाण प्रगल्भ विचारच ‘कोरोना’ला हरवू शकतो! ‘कोरोना’सोबत जगण्याची सवय तर आता करावीच लागेल. हा नवा प्रवाह जीवनशैली बनून आत्मसात केला तरच अनलॉक जगण्याचा भरभरून आनंद घेता येईल!