कावा

0
155
  • दत्ताराम प्रभू-साळगावकर

अशा लोकांचं वागणं प्रामाणिकपणाचं म्हणजे जणू ‘साधू’सारखं वाटतं. पण ते असतात पक्के संधी‘साधू’! आपण महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्यायचे असतात म्हणजे मागाहून पश्‍चात्ताप करण्याची पाळी येत नाही.

कावेबाज लोक दुसर्‍यांना गंडवण्यासाठी काय काय करतात त्याची गणती नसते. अशांचा कावा ओळखणे कधीकधी कठीण असते; तो गोष्ट घडून गेल्यावर कळतो. पण त्यावेळी उपाय नसतो. असले लोक मैत्री करतात, सलगी करतात, वेळप्रसंगी धावून पण येतात व संधी मिळाली की फायदा घेतात. अशा लोकांचं वागणं प्रामाणिकपणाचं म्हणजे जणू ‘साधू’सारखं वाटतं. पण ते असतात पक्के संधी‘साधू’! त्यांच्या मोहिनीत सापडलं तर वाताहातच! महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्यायचे असतात म्हणजे मागाहून पश्‍चात्ताप करण्याची पाळी येत नाही. पण अट्टल कावेबाज विचार करायला वेळच देत नाहीत. कारण दिला तर कावा फसतो व ते उघडे पडतात. ऐकलेली गोष्ट अशी…
एक मनुष्य होता. चांगल्या आस्थापनात नोकरी व चांगला पगार. त्याला एक मुलगा होता. त्याला चांगलं शिक्षण द्यायचं, मोठं करायचं असे मनसुबे तो बाळगून होता. मुलगा कसाबसा मॅट्रिकपर्यंत पोहोचला; पण मॅट्रिकला नापास झाला. पुढचे मार्गच बंद. एकच मार्ग म्हणजे त्याला कसलातरी धंदा काढून द्यायचा म्हणजे कदाचित तो सुधारेल! अर्थात धंदा करायला पण कौशल्य, धमक लागते; त्याच्यात काहीच नव्हतं. तरीही त्याने ठरवलं की एक भुसारी दुकान काढून द्यायचं. सुरुवातीला भांडवल आपण घालायचं, धंद्यात रूळेपर्यंत धंदा आपल्या हाती ठेवायचा. फायद्यातून आपलं भांडवल जमेल तसं काढून घ्यायचं व एकदा ते काढून झालं की मुलाला सांगायचं, आता तुझा धंदा व तू!

दरम्यान, कर्मधर्मसंयोगाने त्याच्या पथ्यावर पडणारी एक गोष्ट घडली… त्याच्या बायकोची एक बहीण होती- वयस्क होती. ती व तिचा नवरा एका गावात राहत होती. त्यांना अपत्य नव्हतं. घर होतं, आजूबाजूला पुरेशी जमीन होती, झाडापेडांचं उत्पन्न होतं. नवरा-बायको सुखात नसतील पण समाधानात जगत होती… आणि अचानकपणे नवरा वारला. बाई एकटी पडली. अशा एकट्या पडलेल्या व तशात वयस्क बाईला कोणाचा तरी आधार लागतो. रात्री-अपरात्री काय झालं तर? तिच्या नवर्‍याचं मरण या मनुष्याच्या पथ्यावर पडलं. हळूहळू तिच्याकडं येणं-जाणं वाढलं. आपल्या मुलाला तिच्याकडे गरजेच्या, आवश्यक अशा वस्तू घेऊन पाठवणं वाढलं. तो तिला काय हवं-नको ते पाहू लागला. अर्थात बापानं दिलेल्या पैशातून! मावशी खूश होऊ लागली की मुलगा मावशीवर आईएवढीच माया करतो म्हणून! पण ही ‘माया’ मायाजालातली होती. ते मायाजाल पुढे होतं!
एकदा या मनुष्याच्या घरात कसलातरी उत्सव होता. जवळचे नातेवाईक आले होते. ती बाई पण आली होती. कार्यक्रम झाल्यावर सर्व मंडळी बोलत बसली. बाईविषयी जमलेल्यांना एक प्रकारची आपुलकी होती. तिचं एकटीचं पुढं कसं होणार, काय होणार असा काहीसा विषय निघाला. बाईच्या डोळ्यांत खरोखरच पाणी आलं. म्हणाली, ‘‘जन्माचा आधार गेला खरा पण देवानं मला दुसरा आधार दिला, माझ्या बहिणीचा मुलगा! तो माझ्यावर आपल्या आईएवढीच माया करतो!’’ भावनावेगात तिनं सर्वांसमक्ष सांगून टाकलं की माझी सर्व मालमत्ता माझ्यानंतर त्याचीच, मला आणखी आहे कोण?
‘आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन’ असंच झालं! सर्व नातेवाईक निघून गेल्यावर यानं विषय उकरून काढला. म्हणाला, ‘‘तुमची मालमत्ता तुमच्यामागं माझ्या मुलाची असं तुम्ही म्हणालात. पण माझ्या मुलाला ती फुकटात नको. त्याची बाजारभावाने नसेल पण मला योग्य वाटते ती किंमत मी तुम्हाला देतो. आपण विक्रीपत्रच करूया ना! त्यासाठी लागणारा पैसा माझा. मी तुमच्या मालमत्तेचे पैसे रुपये पन्नास हजार आजच तुम्हाला देतो. विक्रीपत्र करायला पंधरा दिवस तरी लागतील, लागो. माझा विश्‍वास आहे तुमच्यावर, फक्त कच्ची रिसीट तेवढी सही करून द्या. पैसे तुमच्या कामी येतील. आणखी महत्त्वाचं वचन मी तुम्हाला देतो की, तुम्ही जिवंत असेपर्यंत तुम्ही तुमच्याच घरात राहणार, तुम्हाला कोणच बाहेर काढणार नाही व तुमच्या मालमत्तेतून मिळालेलं उत्पन्न पण तुम्हीच खाणार, कोण अडवणार नाही. कबूल?’’
बाईनं मान हालवली. लगेच तो आतल्या खोलीत गेला. पंधरा-वीस मिनिटांनी हातात पैशांचं पुडकं व एक स्टॅम्पपेपर घेऊन आला. स्टॅम्पपेपरवर ‘जमीन-जुमल्याचे रुपये पन्नास हजार मिळाले, विक्रीपत्र महिन्याभरात केलं जाईल’ असं काहीसं आपल्या पद्धतीनं लिहिलं. बाईच्या हाती पन्नास हजार रुपयांचं पुडकं दिलं व स्टॅम्पपेपरवर तिची सही घेतली. भोळीभाबडी बाई पैसे घेऊन आपल्या घरी निघून गेली.

बाईच्या नवर्‍याच्या एका मित्राला या व्यवहाराची कुणकुण लागली. त्याच्या व बाईच्या कुटुंबात घरोबा होता. तो मुद्दाम शहानिशा करण्यासाठी तिच्या घरी हजर झाला आणि खरी परिस्थिती ऐकून चकित झाला. म्हणाला, ‘‘अगं तू या व्यवहारात फसलीस. एक म्हणजे तुझ्या मालमत्तेची बाजारभावानं किंमत दीड-दोन लाख रुपये आहे, तू ती जवळजवळ फुकटात फुंकतेस! विक्रीपत्र करून झाल्यानंतर त्यांनी तुला घराबाहेर काढलं तर जाशील कुठं? बहिणीचा नवरा असला म्हणून काय झालं? माझा तुला सल्ला, ते पन्नास हजार परत दे. विक्रीपत्र करू नकोस, फसशील! याकामी तुला कसली मदत लागली तर मी करेन!’’
ऐकून बाई टरकलीच! म्हणणं तिला पटलं.
म्हणाली, ‘‘पैसे घेऊन, स्टॅम्पपेपरवर सही करून तर मी मोकळी झाले, आता माघार कशी घेऊ?’’
म्हणाला, ‘‘मी सांगतो. तुझ्या भावोजीला तुझ्या घरी बोलाव व ते केव्हा येणार तो दिवस मला कळव, मी येतो.’’
झालं, तिनं तसंच केलं. दिवस ठरला. नवर्‍याचा तो मित्र पण आला. तिघेजणं बसली व त्याने मालमत्ता विक्रीचा विषय काढला. तिनं सांगितलं की मला माझी मालमत्ता विकायची नाही, मी माझा निर्णय बदलला आहे. तुमचे पन्नास हजार रुपये मी परत करते. मी दिलेली स्टॅम्पपेपरची रिसिट मला परत करा.’’ ऐकून बहिणीचा नवरा भडकला. म्हणाला, ‘‘मी तुमची मालमत्ता फसवून फुकटात घेतलेली नाही. आता व्यवहार रद्द करणं शक्य नाही. तुम्ही विक्रीपत्र करणार नसाल तर तुम्हाला वकिलाची नोटीस पाठवेन व कोर्टात खेचेन.’’
तिला काय बोलावं ते कळेना. तिने नवर्‍याच्या मित्राच्या तोंडाकडे पाहिले. त्याला आता तोंड घालावंच लागलं. म्हणाला, ‘‘नोटीस पाठवा, कोर्टात खेचा, आम्ही बघून घेऊ.’’ यावर भावोजी आणखी भडकला. म्हणाला, ‘‘तुम्ही मध्ये बोलणारे कोण? व्यवहार आमच्या दोघातला आहे. तुम्ही चोंबडेपणा करू नका, गप्प बसा.’’ नवर्‍याचा मित्र म्हणाला, ‘‘निमूट ती स्टॅम्परिसीट तिला परत करा व पन्नास हजार रुपये घेऊन चालते व्हा, नाहीतर पन्नास हजार परत मिळणार नाहीत व विक्रीपत्रही होणार नाही. पाहूया काय होतं ते!’’
नवर्‍याचा मित्र खमका भेटला. कावा उघड केला. फुकटात मालमत्ता नको हा सभ्यतेचा बुरखा फाडला.
त्याने बॅगेतून निमूट स्टॅम्परिसीट काढली व तिच्या हाती दिली, आणि तिनं परत केलेले पन्नास हजार रुपये घेऊन त्यानं तोंड काळं केलं…