Home बातम्या अंतरीचा ‘दिवा’ मालवू नको रे…!

अंतरीचा ‘दिवा’ मालवू नको रे…!

0

– रमेश सावईकर, डिचोली

दिवाळी हा हिंदूंचा एक प्रसिद्ध उत्सव. ‘दीपावली’ म्हणूनही संबोधला जातो. शुभाचा अशुभावर, पावित्र्याचा अ – पावित्र्यावर नि मंगलाचा अमंगलावर विजय प्राप्त झाल्याचे प्रतीक मानून दिवाळी उत्सव एक आनंदोत्सव किंवा विजयोत्सव म्हणून साजरा केला जातो. ज्योतीचा प्रकाश अंधःकार दूर करतो. म्हणून दीपमाळा लावून दिवाळी साजरी करतात आणि त्यासाठीच दिव्यांचा हा उत्सव ‘दीपावली’ संबोधला जातो.

आश्‍विन वद्य त्रयोदशीपासून कार्तिक शुद्ध द्वितीयेपर्यंत आनंददायक घटना घडल्या असल्यामुळे पाचही दिवस दीपमाळा लावून हा उत्सव साजरा करतात. पावसाळा संपून शरद ऋतू सुरू झाल्यावर हा सण येतो. त्यामुळे या उत्सवाला धार्मिक महत्त्वासह सामाजिक महत्त्वही आले आहे. नवे धान्य तयार होते म्हणून शेतकरीवर्गासाठी आनंदोत्सव साजरा करण्याचा हा काळ. त्यामुळे दिवाळीला कृषीविषयक महत्त्वही प्राप्त झाले आहे.

आश्‍विन वद्य चतुर्दशी, नरकचतुर्दशी म्हणजेच दिवाळी म्हणून साजरी करण्यात येते. भगवान श्रीकृष्णाने नरकासूराचा पहाटे वध केला व त्याच्या बंधनात असलेल्या सोळा हजार स्त्रियांना मुक्त केले. नरकासूराच्या रक्ताचा टिळा लावून कृष्ण सूर्योदयापूर्वीच परतला. त्यावेळी त्यास मंगलस्नान घालून ओवाळण्यात आले. सत्यभामेने श्रीकृष्णाच्या सहाय्याने नरकासुराचा वध केला अशीही एक कथा आहे. नरकासुराचा वध केल्याच्या आनंदाची स्मृती म्हणून सूर्योदयापूर्वी स्नान करून हिंदू लोक घरात, घरासमोर व अंगणात दिवे लावतात. श्रीकृष्णाची पूजा करून नंतर त्याला पोह्यांचा नैवैद्य दाखवतात. नंतर विविध प्रकारचे पोहे करून त्यांचे सेवन करतात. दिवाळीतील सणांचा हा प्रमुख दिवस अशा पद्धतीने गोव्यात साजरा करण्यात येतो. आश्‍विन शुद्ध अमावास्येच्या रात्री लक्ष्मीपूजन करतात. अष्टदल कमलावर लक्ष्मीची स्थापना करून तिची पूजा करतात. लक्ष्मी हे सौंदर्याचे, प्रेमाचे व वैभवाचे प्रतीक आहे. संयमपूर्वक धन संपादन केले तर, मनुष्याचे कल्याण होते. म्हणूनच तर लक्ष्मीची पूजा केली जाते. या दिवशी लक्ष्मी सर्वत्र संचार करते. जेथे स्वच्छता, मांगल्य, प्रकाश आढळेल तेथे ती वास्तव्य करते, अशी समजूत आहे. म्हणूनच या रात्री दीपमाळा लावून रोषणाई करण्यात येते.

कार्तिक शुद्ध प्रतिपदेला ‘बलिप्रतिपदा’ म्हणतात. गोव्यात हा दिवस ‘पाडवा’ म्हणून साजरा करतात. या दिवशी भगवान विष्णूने वामनावतार घेऊन बळीराजाला पाताळात नेले. या दिवशी जो दीपदान करेल त्याला यमयातना भोगाव्या लागणार नाहीत, असा वामनाने त्याला वर दिला. म्हणून बळीची पूजा करण्याची प्रथा रूढ झाली असावी. ही तिथी बलिप्रतिपदा म्हणून संबोधली गेली. या दिवसापासून विक्रम संवत सुरू होते, म्हणून याला दिवाळी पाडवा असेही म्हणतात. हिंदूंच्या साडेतीन शुभमुहूर्तांपैकी हा अर्धा मुहूर्त आहे. या दिवशी गोवर्धन पूजा करण्याची प्रथाही काही प्रांतांत आढळते. कार्तिक शुद्ध द्वितीयेला यमराज आपल्या बहिणीकडे गेला. त्यावेळी यमाला ओवाळून तिने आपला आनंद व्यक्त केला. कित्येक वर्षानंतर बहिणीकडे जाऊन यमराजाने आपल्या भगिनीप्रति असलेली माया, प्रेम व अतूट बहीण-भावाच्या बंधनाचे नाते प्रकट केले आणि तिला ओवाळणी म्हणून भेटवस्तू दिल्या. तेव्हापासून ‘भाऊबीज’ उत्सव (सण) साजरा करण्याची प्रथा रूढ झाली.

आश्‍विन वद्य त्रयोदशी ते कार्तिक शुद्ध द्वितिया असे पाच दिवस साजरा होणारा हा उत्सव दिवाळी किंवा दीपावली या नावाने दिवे लावून साजरा करतात. भगवान शिव, विष्णू, यम आदी देव संतुष्ट होऊन संपत्ती देतात असे पुराणात सांगितले आहे. दीर्घ आयुष्य लाभावे, जीवन मंगलमय, आनंदी, सुखमय व्हावे म्हणून पाचही दिवस त्या त्या दैवतांची विधिवत् पूजा करून त्यांच्या आवडीचे मिष्टान्न नैवैद्य म्हणून दाखवणे आणि त्या दैवताची प्रार्थना करणे हा या उत्सवाचा एक प्रमुख भाग आहे. परस्परांबद्दल असणारा स्नेह व्यक्त करण्याचा हा उत्सव आहे. दीपावलीच्या निमित्ताने एकमेकांना शुभेच्छा देऊन आनंद व्यक्त करण्याची प्रथा ही सर्वच भागात आढळते.

गोव्यात दिवाळीला नरकासुराच्या प्रतिमा करून त्यांच्या मिरवणुका काढणे, नरकासुरांच्या स्पर्धा आयोजित करणे या बाबींनाच अनावश्यक महत्त्व प्राप्त झाले आहे. त्या ऐवजी श्रीकृष्णाची मोठ्या थाटात पूजा करण्याचा उत्सव अभिप्रेत आहे. सामाजिक उत्सव म्हणून साजरा होत असताना, मूळ धार्मिक बाबींना फाटा दिला जाता कामा नये.

गोव्यात कित्येक हिंदू कुटुंबांमध्ये धार्मिक विधींसह पाचही दिवस हा उत्सव यथासांग साजरा केला जातो. ग्रामीण भागात सवत्स गो पूजा, पाडव्याच्या दिवशी बैलांची पूजा, गोवर्धन पूजा करणार्‍या शेतकर्‍यांची कुटुंबे आढळतात. दिवाळीला खरे स्वरूप प्राप्त व्हावे.

जीवनातील अंधःकार दूर होण्याकरीता अंतर्यामीचे दीप प्रज्ज्वलित होऊन त्यांच्या प्रकाशाने मांगल्य, पावित्र्य, सहिष्णूता, सात्विकता आदी भाव-भावना अभिवृद्धीत होऊन वाईट विचार, दुष्टाचार, नष्ट होवोत नि सर्व मनुष्यमात्राचे जीवन आनंदमय नि सुखकर होवो, याच या दिवाळीच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा.