पेडणे (न. प्र.)
मांद्रेचे कॉंग्रेसचे आमदार दयानंद सोपटे यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केल्यामुळे मांद्रे मतदारसंघातून सहा महिन्यात पोटनिवडणूक होणार आहे. त्यासाठी कॉंग्रेसतर्फे उमेदवारी चाचपणी सुरू आहे. मात्र आता पोटनिवडणुकीसाठी उमेदवार कोण असावा हा प्रश्न जरी निर्माण झाला तरीही उमेदवार कोण असावा हे स्थानिक मांद्रेवासीयच ठरवतील असे गोवा कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी सांगितले.
जो आजपर्यंत पक्षाशी प्रामाणिक राहिला त्यालाच उमेदवारी दिली जाईल. मात्र त्या उमेदवाराने कधीही पक्षांतर करणार नाही अशी ग्वाही द्यावी. लोकांनीच आपला उमेदवार ठरवावा आणि ही जबाबदारी पूर्ण मतदारसंघातील कार्यकर्ते व जनतेची असल्याचे श्री. चोडणकर म्हणाले. तसेच आगामी लोकसभेसाठीही उत्तर गोव्यातून एक चांगला उमेदवार देण्याचा प्रयत्न केला जाईल असे श्री. चोडणकर पुढे म्हणाले.
मांद्रे मतदारसंघातून आतापर्यंत संगीता परब, दयानंद सोपटे आदींनी कॉंग्रेस पक्ष सोडून खिंडार पाडण्याचा प्रयत्न केला आहे. मांद्रे पोटनिवडणुकीत आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी आता अनेकांनी प्रयत्न सुरू केलेले आहेत. त्यांनी त्याप्रमाणे मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मात्र पक्षाशी जो एकनिष्ठ राहील त्यालाच उमेदवारी दिली जाईल याचा पुनरुच्चार श्री. चोडणकर यांनी केला.
विकास खोळंबला
मांद्रे मतदारसंघाच्या इतिहासात प्रथमच आमदार दयानंद सोपटे यांनी राजीनामा दिल्यामुळे आता पोटनिवडणूक सहा महिन्यांत होणार आहे. जर या दोन महिन्यांच्या कालावधीत विकासाला गती मिळाली नाही तर परत एकदा विकासाला आचारसंहितेमुळे खीळ बसणार आहे. त्यामुळे विकास खोळंबून रहाणार आहे.
संगीता परब यांच्यानंतर मांद्रेतून कॉंग्रेसचे दुसरे आमदार म्हणून २०१७ साली दयानंद सोपटे हे तत्कालीन मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा पराभव करून जायंट किलर ठरले. मात्र ज्या पक्षाच्या उमेदवाराचा पराभव केला, त्याच पक्षाने सोपटे यांना पक्षात घेतले.
बूथ कार्यकर्त्यांची उद्या बैठक
मांद्रे मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांचे नेते अद्याप तरी पार्सेकर हेच आहेत. त्यांचे समर्थक त्यांची भेट घेऊन तसेच फोन करून पार्सेकर यांनी आपली भूमिका आता स्पष्ट करावी अशी मागणी करत आहेत. त्यासाठी मांद्रे मतदारसंघातील सर्व बूथ प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक उद्या शुक्रवार दि. १९ रोजी आयोजित केल्याने या बैठकीत ठोस निर्णय होणार आहे. यावेळी पार्सेकर आपली भूमिका स्पष्ट करतील.