ट्रक चोरणारी टोळी गजांआड

0

वास्को पोलीस स्थानकाचे निरीक्षक राहूल परब यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे ट्रकचे मालक किशोर चंद्रकांत पेडणेकर यांनी १५ नोव्हेंबर रोजी ट्रक गायब झाल्याची तक्रार दिली होती. त्यानंतर वास्को पोलिसांनी ट्रकाचा शोध घेणे सुरू केले.

याप्रकरणी तिघांना सुरूवातीस ताब्यात घेण्यात आले. जितेंद्र यादव (२३, खाप्रेश्वर मंदिराजवळ राहणारा, मूळ बिहारचा), दुसरा श्रीराम जैसल (२७, देस्तेरो इथे राहणार, मूळ उत्तर प्रदेश येथील), तिसरा महम्मद समियान खालहास (२१, बनारसी डेरी वास्को येथे राहणारा, मूळ लखनऊ येथील) या संशयित आरोपींची कसून चौकशी केल्यानंतर पोलिसांना समजले की ट्रक चोरण्याची कल्पना दुर्गेश शिरोळ याची होती व तो तो गुलबर्ग (कर्नाटकात) येथे रहातो. जितेंद्र व श्रीराम हे दोघे चालक तर महम्मद हा मॅकेनिक. हे तिघे शक्यतो कुठल्याही ट्रकात आसरा घ्यायचे. यासाठी वास्को पोलिसांनी दुर्गेश याला शिताफीने पकडून कसून चौकशी केली तेव्हा त्याने ट्रक नांदेड महाराष्ट्रात राहणारा बलविंदर सिंग याला दिल्याचे सांगितले.

त्यानंतर उपनिरीक्षक फिलोमेना कोस्ता यांनी पोलीस पथकासह नांदेड गाठले आणि तिथे बलविंदर उर्फ बल्ली (४०) याला ताब्यात घेतले. संशयिताकडून योग्य ती माहिती न मिळाल्याने पोलिसांना वास्को, फोंडा, बेळगाव, हुबळी, नांदेड असा शोध घ्यावा लागला. बलविंदर सिंग याने तिन्ही संशयित आरोपींच्या मदतीने ट्रक मुंबई येथे जागृती ट्रक ट्रान्स्पोर्ट वाशी येथे विकल्याचे सांगितले. वास्को पोलिसांनी सदर कार्यालयावर छापा टाकला तर जागृती ट्रक ट्रान्सपोर्टचा मालक हरिश ठकूर हाती लागला नसल्याने पोलिसांनी त्याच्या मुलूड येथील घरावर छापा टाकला. तेथेही तो मिळू शकला नाही. शेवटी मुंबई पोलिसांना सदर माहिती दिली. इथे चोरीस गेलेला ट्रक सूरत कच्छ येथे पाठवल्याचे समजले. वास्को पोलिसांनी सरळ गुजरात गाठले आणि सुरत इथे उबल भागात चोरीस गेलेला ट्रक पार्क केलेल्या स्थितीत सापडला. ट्रकचे मालक पेडणेकर यांनी सांगितले की, ट्रकाची किंमत १८ लाख असून दहा लाखांचा विमा उतरवलेला आहे. पोलिसांनी हा ट्रक ट्रान्स्पोर्ट कंपनीने तीन लाख चाळीस हजाराला विकत घेतल्याचे सांगितले. त्यातले १ लाख ५० हजार संशयितांच्या नावावर बँकेत घातल्याचे सांगितले. या ट्रकाचा शोध घेण्यासाठी गेलेल्या पथकात वास्को पोलीस ठाण्याचे निरीक्षक दुला परब, उपनिरीक्षक फिलोमेना कोस्ता, पुरुषोत्तम नाईक, वासुदेव कोरगावकर, प्रज्योत फडते, दीपक नाईक, संतोष भाटकर, उमेश नाईक, मिंगेल वाझ यांचा सहभाग होता. सदर कारवाई उपअधीक्षक महेश गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वास्को पोलीस अधिक चौकशी करीत आहेत.